मेट्रोच्या प्रकल्पावरून सरकारवर निशाणा साधल्यानंतर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात पुन्हा एकदा सरकारवर बोचरी टीका केली. देशात दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. आश्रमातील मुलींचे लैंगिक शोषण केले जात आहे. ऑक्सिजन अभावी बालकांचा मृत्यू झाला. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती अवाढव्य वाढल्या असताना काही मंत्री बेताल वक्तव्य करत आहेत. या सर्व घडामोडी घडत असताना सरकार भोंदूबाबांच्या चरणी लीन आहे, असे सांगत त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पुण्यातील अण्णाभाऊ साठे सभागृहात आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत हेाते.

पवार म्हणाले की, विविध भागात बुवाबाजी आणि अंधश्रद्धा वाढताना दिसून येते. या अंधश्रद्धेपासून शिक्षकांनी दूर राहिले पाहिजे. आदर्श शिक्षकांनी आदर्श विद्यार्थी घडविण्यासाठी प्रयत्न करायला हवे. रामरहिम याच्या कृत्यामुळे अंधश्रद्धेचे पितळ उघडे पडले असून, अंधश्रद्धा डोक्यातून काढून टाका. तसेच बुवाबाजीला थारा देऊ नका, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. बुवाबाजीपेक्षा आई-वडील आणि संस्कारक्षम विचारांच्या वरिष्ठांचे दर्शन महत्वाचे असल्याचे ते म्हणाले.