आधार केंद्रे पूर्ण क्षमतेने सुरू नसल्याने नागरिकांना फटका

प्राप्तिकर विवरण भरण्यासाठीची अंतिम मुदत केवळ पाच दिवसांवर आली असतानाही शहरातील आधार केंद्र पूर्ण क्षमतेने सुरू नसल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. प्राप्तिकर विवरणपत्र भरण्यासाठी आधार कार्ड आणि पॅन कार्ड जोडणी करणे केंद्र शासनाने बंधनकारक केले असून त्याची अंमलबजावणी सर्वत्र सुरू आहे. मात्र आधार कार्ड काढण्यासाठी आणि ते अद्ययावत करण्यासाठी (नाव, पत्ता, जन्म दिनांक यांतील चुकांची दुरुस्ती) केंद्र उपलब्ध नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत.

विवरणपत्र भरण्यासाठी शेवटचे काही दिवस उरले असताना आधार आणि पॅन जोडणी होत नसल्याने नागरिकांची धावपळ सुरू आहे. आधार आणि पॅन कार्डावरील नाव जुळत नसल्याने विवरण भरताना पॅन कार्ड अवैध दाखवले जात आहे. त्यामुळे आधार कार्ड अद्ययावत करण्यासाठी नागरिक हेलपाटे मारत आहेत. शहरातील सुरू असलेल्या आधार केंद्रांबाबत माहिती नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. तसेच आधार नोंदणी आणि आधार अद्ययावत करण्यासाठी गेल्यानंतर आधार केंद्रांकडून नोव्हेंबर महिन्यातील दिनांक दिले जात आहेत. त्यामुळे ३१ जुलैपूर्वी अनेक नागरिकांना प्राप्तिकर विवरणपत्र भरता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आधार आणि पॅन कार्डच्या घोळामुळे विवरणपत्र तयार असूनही ते भरता येत नसल्याने नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.

शहरातील अडतीस आधार केंद्र मंगळवारपासून सुरू करण्यात आली आहेत. मात्र, ज्या केंद्रांवर आधारसाठी नोंदणी करून घेतली जात आहे, तेथे चार महिन्यांच्या पुढचा दिनांक मिळत असल्याने प्राप्तिकर विवरणपत्र भरण्यात अडचणी येत आहेत. आधार यंत्रणेच्या घोळामुळे ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक त्रास होत असून अनेकांचे निवृत्तिवेतन दोन महिन्यांपासून मिळालेले नाही. uidai.gov.in या संकेतस्थळावर गेल्यानंतर ‘एन्रोलमेन्ट सेंटर रिसर्च’ या पर्यायावर शहर आणि जिल्ह्य़ातील सुरू असलेल्या आधार केंद्रांची माहिती नागरिकांना समजणार आहे.

दोन दिवसांत २०० आधार केंद्रे कार्यान्वित होणार

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रात जास्तीत जास्त आधार केंद्र असतील. महापालिकेच्या प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात आधार यंत्र देण्यात येणार आहेत. पंधरा यंत्र पुणे महापालिका क्षेत्रीय कार्यालयात आणि सहा यंत्र पिंपरी महापालिका क्षेत्रीय कार्यालयात कार्यान्वित होतील. महा ई सेवा केंद्रही कार्यान्वित होतील. शाळा आणि अंगणवाडय़ांमध्ये यंत्र तात्पुरत्या स्वरूपात पुरविण्यात येणार आहेत.

सौरभ राव, जिल्हाधिकारी