तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त केलेल्या गुन्ह्य़ात अटक केलेल्या आरोपीला न्यायालयात हजर करताना तरुणीच्या दोघा भावांनी सोमवारी न्यायालयातच आरोपीवर चाकूहल्ला केला. मात्र, आरोपीसोबत असलेल्या पोलिसांच्या सतर्कतेमुळे हल्ला करणाऱ्यांना पकडण्यात आले आहे. यामध्ये आरोपीच्या गळ्यावर निसटता वार झाला असून त्याला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे शिवाजीनगर न्यायालयाच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
अरुण मच्छिंद्र चकाले (वय २३, रा, मीनाताई ठाकरे वसाहत, गुलटेकडी) असे जखमीचे नाव आहे. या प्रकरणी महेश गुलाब पंडित आणि (वय २५) आणि सुंदर गुलाब पंडित (वय २७, रा. दोघेही- इंदिरानगर खड्डा, गुलटेकडी) यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरुण याने पंडित बंधूंच्या बहिणीला लग्नाची मागणी घातली होती. आपल्या प्रेयसीने मावशीकडे राहावे यासाठी तो सक्ती करत होता. त्याच्या छळाला कंटाळून तिने राहत्या घरात आत्महत्या केली होती. या प्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यावर अरुणला अटक झाली होती. त्याला सोमवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यासाठी पोलीस घेऊन आले होते.
शिवाजीनगर न्यायालयाच्या नवीन इमारतीमध्ये मोकळ्या जागेतून आरोपीला घेऊन जात असताना सुंदर याने अरुणवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्याला पोलिसांनी बाजूला ओढले असता महेश याने त्याच्यावर चाकू मारण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखत पोलिसांनी अरुणला बाजूला घेतले. पण, महेशने केलेला वार निसटता त्याच्या गळ्यावर लागला. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून दोन सुऱ्या जप्त केल्या आहेत. जखमीला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी हल्ला करणाऱ्या दोघांना अटक केली आहे.
या हल्ल्याच्या प्रकरणामुळे शिवाजीनगर न्यायालयाच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. न्यायालयामध्ये जाणाऱ्याची चौकशी होत नाही. शहरातील काही टोळी प्रमुखांचे खटले सुरू असल्यामुळे न्यायालयाच्या आवारात सराईत गुन्हेगारांचा वावर असतो. मात्र, त्यांना न्यायालयात सहज प्रवेश मिळतो. न्यायालयाच्या क्रमांक एक व तीन या प्रवेशद्वांरावर पोलिसांचा कडक बंदोबस्त असतानाही न्यायालयात आरोपी चाकू घेऊन कसा आला, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
न्यायालयाबाहेर गुन्हे शाखेच्या पोलिसांचे गस्त बंद!
शिवाजीनगर न्यायालयाच्या बाहेर एका खटल्यातील साक्षीदारावर गोळीबार झाल्यानंतर गुन्हे शाखेच्या प्रत्येक पथकाला न्यायालयाच्या बाहेर गस्त घालण्याचे नेमून देण्यात आले होते. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या ठिकाणी गस्त घालताना काही सराईत गुन्हेगारांना अटक केली होती. पण, काही दिवसांनंतर ही गस्त बंद झाली. एखादी घटना घडल्यानंतर त्या ठिकाणी तात्पुरती सुरक्षा पुरविण्यात येते. त्यानंतर ही आपोआप बंद होते.