* ‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’चे उद्या प्रकाशन
* नामवंत ‘शेफ’कडून पाककृतींच्या ‘टिप्स’
राज्यातील विविध प्रांतांची खास तिथली अशी खाद्यसंस्कृती आणि त्यातील जिव्हा तृप्त करणारे नाना पदार्थ..! या पदार्थाची नुसती नावे ऐकली तरी खवय्यांना ते कधी चाखून पाहतो असे होऊन जाते! सहसा खायला न मिळणाऱ्या आणि पाककृतींच्या नेहमीच्या पुस्तकांमध्येही न सापडणाऱ्या अशा पदार्थाबद्दल त्या त्या भागातील अनुभवी ‘शेफ’च्या तोंडून ऐकण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. निमित्त आहे, ‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’ या खाद्यसंस्कृतीविषयक वार्षिकाच्या पुण्यातील प्रकाशनाचे.
कोकणी, पश्चिम महाराष्ट्रीय, खान्देशी, मराठवाडी आणि वैदर्भीय खाद्यपदार्थाची ओळख ‘लोकसत्ता’ने यंदाच्या ‘पूर्णब्रद्म’ या अंकात करून दिली आहे. ‘महाराष्ट्र तुमच्या ताटात’ अशी या अंकाची संकल्पना आहे. या निमित्ताने मोहसिना मुकादम (कोकण), मंजिरी कपडेकर (पश्चिम महाराष्ट्र), आशालता पाटील (खान्देश), सायली राजाध्यक्ष (मराठवाडा) आणि विष्णू मनोहर (विदर्भ) या नामांकित शेफबरोबर गप्पांच्या कार्यक्रमाचे मंगळवारी आयोजन करण्यात आले आहे. विविध प्रांतांतील खाद्यपदार्थाची पाश्र्वभूमी, विस्मरणात गेलेले पदार्थ आणि प्रत्यक्ष पाककृती याबद्दल शेफकडून ऐकायला मिळेल; शिवाय पदार्थ बनवण्याची आवड असणाऱ्या प्रत्येकाला उपयुक्त ठरणाऱ्या ‘टिप्स’देखील घेता येतील. या नामवंत शेफनी ‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’ अंकातून महाराष्ट्रातील रुचिसंपन्न खाद्यसंस्कृतीची ओळख करून दिली आहे.
खाद्यसंस्कृतीबरोबरच त्या त्या प्रांतातील चवदार, चटकदार, चमचमीत पाककृती अंकात वाचायला मिळणार आहेत. हा कार्यक्रम सर्वासाठी खुला असून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर रसिकांना प्रवेश दिला जाणार आहे.

पूर्णब्रह्म चविष्ट गप्पा
* कधी : मंगळवार, २८ जून
* कुठे : टिळक स्मारक मंदिर
* किती वाजता : सायं. ५ वा.
* प्रवेश सर्वासाठी खुला

‘विम’ने प्रस्तुत केलेल्या ‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’ या अंकाचे ‘एलजी’ हे सहप्रायोजक असून ‘टेस्ट पार्टनर’ रामबंधू आहेत. ‘बँक ऑफ महाराष्ट्र’, ‘केसरी’, ‘आयुशक्ती’ यांचे या कार्यक्रमाला पाठबळ लाभले आहे, तर ‘कलर्स मराठी’ हे टेलिव्हिजन पार्टनर आहेत.