पोलिसांकडून जवानांना अटक करण्याची धमकी

महाराष्ट्र सुरक्षा दलातील जवानांनी विविध मागण्यांसाठी सुरू केलेले आंदोलन पोलिसांकडून दडपण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे उघडकीस आले. सुरक्षा दलाच्या जवानांनी बुधवारी (२० सप्टेंबर) त्यांच्या मागणीसाठी मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांकडून आंदोलनात सहभागी झालेल्या जवानांना ताब्यात घेण्यात आले आणि त्यांना अटक करण्याची धमकी देण्यात आली. ताब्यात घेण्यात आलेल्या जवांनाना सोडून देण्यात आल्याचे समजते.

महाराष्ट्र सुरक्षा दलातील जवानांना विशेष पोलीस अधिकाऱ्यांचा दर्जा देण्यात आला आहे. मुंबईवर ‘२६/११’ला झालेल्या हल्ल्यानंतर नेमण्यात आलेल्या राम प्रधान समितीच्या शिफारशीनुसार राज्यातील संवेदनशील ठिकाणांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र राज्य सुरक्षा दलाची स्थापना करण्यात आली. या दलातील जवानांना पोलिसांप्रमाणेच काही अधिकार देण्यात आले आहेत. २०१४ पासून पोलीस भरतीत प्रतीक्षा यादीत असलेल्या जवानांची या दलात निवड करण्यात आली असून, त्यांना पोलीस प्रशिक्षण केंद्रातून खडतर प्रशिक्षण देण्यात आले आहे. मुंबईसह औरंगाबाद, नाशिक, पुणे, नागपूर या शहरांमध्ये संवेदनशील ठिकाणी जवानांची नेमणूक करण्यात आली. जवानांना अतिशय कमी वेतन दिले जात असून तेरा ते चौदा हजारांमध्ये त्यांना कुटुंब चालवावे लागत आहे, अशी माहिती जवानांनी दिली.

पोलिसांप्रमाणे वेतन देण्यात यावे तसेच पोलिसांप्रमाणेच दर्जा देण्यात यावा, या मागणीसाठी जवानांकडून गेल्या तीन ते चार दिवसांपासून काम बंद करण्यात आले आहे. जवानांकडून त्यांच्या मागणीसाठी पुण्यात मोर्चा काढण्यात आला. पोलिसांकडून आंदोलन करणाऱ्या जवानांना ताब्यात घेण्यात आले. एकंदर शांततापूर्ण मार्गाने सुरू असलेले आंदोलन पोलिसांकडून दडपण्यात येत आहे, असा आरोप जवानांनी नाव न सांगण्याच्या अटीवर केला. पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलेल्या जवानांना नंतर सोडून देण्यात आले. एकीकडे तुटपुंजे पगार आणि अकरा महिन्यांच्या करारावरील नियुक्ती अशा दुहेरी संकटात जवान सापडले आहेत. जवानांच्या मागण्या मान्य होईपर्यंत कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि महाराष्ट्र सुरक्षा दलाचे कार्यकारी संचालक संजय बर्वे यांना निवेदन देण्यात आले आहे.