पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) मुख्य कार्यकारी अधिकारीपदावर नियुक्ती झाल्यानंतर महेश झगडे यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारला. पुणे जिल्ह्य़ातील ग्रामीण भागाचा विकास हा केंद्रस्थानी राहील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
शुक्रवारी सायंकाळी आकुर्डी-प्राधिकरणातील मुख्यालयात येऊन झगडे यांनी सुधाकर नागनुरे यांच्याकडून सूत्रे स्वीकारली. १९९३ पासून झगडे प्रशासकीय सेवेत आहेत. अलीकडेच त्यांनी पुणे महापालिका आयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त आणि परिवहन आयुक्त या पदांवर काम केले आहे. नव्याने स्थापन झालेल्या पीएमआरडीएच्या मुख्य कार्यकारीपदावर त्यांची नियुक्ती झाली. शुक्रवारी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, जिल्ह्य़ातील ग्रामीण भागाचा विकास केंद्रस्थानी राहील. काम करताना पर्यावरणाचे संतुलन राखू. नागरिकांच्या गरजा पूर्ण करण्यावर भर राहील. खरेतर हे काम आव्हानात्मक आहे. परंतु आजपर्यंत केलेल्या सेवाकाळातील अनुभव गाठीशी आहे. सरकारने दिलेली जबाबदारी योग्य रितीने पार पाडू.