विविध संस्था आणि मंडळांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद
दुष्काळाशी सामना करत असलेल्या मराठवाडय़ातील जनतेसाठी पुणेकरांच्या दातृत्वाचा ओघ सुरू असून, विविध संस्था आणि मंडळांकडून उत्स्फूर्तपणे ही मदत केली जात आहे. धान्य, कपडे आणि संसारोपयोगी वस्तूंपासून पाण्याच्या टँकपर्यंत, रोख रकमेपासून किराणामालापर्यंत आणि पिठाच्या गिरण्यांपासून ते जनावरांच्या चाऱ्यापर्यंत.. जी जी मदत दुष्काळग्रस्त भागाला करणे शक्य आहे, ती मदत पुण्यातून अखंडपणे पाठवली जात आहे.
पुणे जिल्ह्य़ालगत असलेल्या सोलापूर जिल्ह्य़ात पुण्यातील अनेक स्वयंसेवी संस्था आणि मंडळांकडून केली जात असलेली मदत उल्लेखनीय असून, अनेक मंडळांच्या कार्यकर्त्यांनी पुणेकरांकडून मदत गोळा करून ती थेट मराठवाडय़ातील खेडय़ापाडय़ात जाऊन गरजूंच्या हाती सोपवली आहे. दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन करताच पुणेकरांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. कपडे देण्याचे आवाहन करून ते ठिकठिकाणी संकलित करण्याची मोहीम धोर्डे पाटील चॅरिटेबल ट्रस्टने राबवली. या मोहिमेत पाच हजार शर्ट, पाच हजार पॅन्ट, दोन हजार साडय़ा आणि पाच हजार लहान मुला-मुलींचे कपडे गोळा झाले. शिवाय अडीच हजार किलो धान्यही या उपक्रमात जमले. हे सर्व कपडे आणि धान्य वाटपाचा कार्यक्रम हिंगोली व जालना जिल्ह्य़ात करण्यात आला.
जनकल्याण समितीतर्फे मराठवाडय़ासह एकूण ११ जिल्ह्य़ात दुष्काळ निवारणाची विविध कामे सुरू असून, या कामांना शहरवासीयांनी निधीच्या रुपाने मदत करावी असे आवाहन समितीने केले होते. या आवाहनाला सर्व घटकांकडून जो प्रतिसाद मिळाला तो कार्यकर्त्यांचे बळ वाढवणारा ठरला. समितीने आवाहन करताच लक्षावधी रुपयांचा निधी पुणेकरांनी उत्स्फूर्तपणे दिला. महर्षी कर्वे शिक्षण संस्थेतील सर्व कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचा पगार आणि परिसरात फिरुन गोळा केलेली रक्कम असा १६ लाखांचा निधी समितीकडे सुपूर्द करून सामाजिक जाणिवेचे दर्शन घडवले.
मराठवाडय़ातील २०० कुटुंबांची आर्थिक परिस्थिती सावरण्याच्या हेतूने २०० कुटुंबांना पिठाची गिरणी देण्याचा उपक्रम पुण्यातील आदिशक्ती फाउंडेशनने सुरू केला आहे. एका गिरणीत दिवसाला सुमारे २०० किलो धान्य दळणे शक्य आहे. त्यामुळे ज्या कुटुंबाला ही गिरणी दिली जाणार आहे त्यांना उदरनिर्वाहासाठी तसेच मुलाबाळांच्या संगोपनासाठी ही गिरणी चालवून मिळणारे उत्पन्न उपयोगी पडणार आहे.
संस्थेचे अध्यक्ष दत्ता पवार यांनी ही माहिती दिली. एका गिरणीची किंमत २७ हजार रुपये असून उपक्रमासाठी ५४ लाख रुपये खर्च येणार आहे.
पुण्यातील अनेक छोटय़ा-मोठय़ा संस्था, ज्येष्ठ नागरिक मंडळेही मदतीत आघाडीवर असून ऑल इंडिया सेंट्रल गव्हर्नमेंट पेन्शनर्स असोसिएशनने सेवानिवृत्तांकडून दररोज एक रुपया असा उपक्रम केला. त्यातून जमा झालेले ५१ हजार रुपये दुष्काळग्रस्त निधीसाठी देण्यात आले.
डॉ. अपर्णा गोसावी यांच्या आकांक्षा सोशल वेलफेअर फाउंडेशनने उस्मानाबाद जिल्ह्य़ातील येडशी येथे आठ हजार किलो तांदळाचे वितरण केले.या संस्थेने गावाला एक महिनाभर टँकर पुरवण्याची व्यवस्था केली आहे.

सोलापुरात ५१ टॅंकर
सिंहगड रस्ता भागातील गणेश मंडळांचे कार्यकर्ते एकत्र आले आणि त्यांनी राबवलेल्या उपक्रमामुळे सोलापूर जिल्ह्य़ातील खेडेगावांना टँकर उपलब्ध झाले. या कार्यकर्त्यांनी स्वत:च मोठी रक्कम उभी केली. त्यातून सोलापूर जिल्ह्य़ातील गावांमध्ये ५१ टँकरचा पुरवठा केला. या गावांमध्ये कार्यकर्ते स्वत: टँकर घेऊन गेले होते.