मेट्रो प्रकल्प, विमानतळ आणि रिंग रोड यांसह पुण्याचे विविध प्रश्न केंद्र आणि राज्य सरकारकडे प्रलंबित असताना या प्रश्नांची सोडवणूक करण्याची जादूची कांडी नितीन गडकरी यांच्या हाती असल्याचे त्यांनीच शुक्रवारी येथे सूचित केले. ‘पुण्याचे सर्व प्रश्न मीच सोडवून टाकतो’, असे सांगत गडकरी यांनी या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठीचे विविध पर्यायही अगदी चुटकीसरशी सांगून टाकले.

मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रिकल्चरच्या वार्षिक सभेत नितीन गडकरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. देशाच्या आर्थिक विकासामध्ये पुणे मोठे योगदान देत आहे. मात्र, पुण्यामध्ये अजूनही पायाभूत सुविधांची कमतरता आहे. पाच महामार्गाना जोडणारा रिंग रोड आणि नवा विमानतळ या गोष्टी मार्गी लागल्या तर पुण्याचा विकास आणखी जलदगतीने होऊ शकेल, अशी भावना चेंबरचे अध्यक्ष सतीश मगर यांनी प्रास्ताविक मनोगतातून व्यक्त केली होती.

कार्यक्रमातील भाषण संपल्यानंतर नितीन गडकरी जागेवर जाऊन बसले. मात्र, आभारप्रदर्शन होण्यापूर्वी ते पुन्हा एकदा ध्वनिक्षेपकासमोर आले. सतीश मगर यांनी त्यांच्या भाषणात पायाभूत सुविधांबाबत ज्या अपेक्षा व्यक्त केल्या होत्या त्यासंबंधी सरकार काय करू शकते हे गडकरी यांनी या वेळी सांगितले. या निवेदनातून पुण्याचे प्रश्न सोडविण्याची जादूची कांडी आपल्याच हाती असल्याचे त्यांनी सूचित केले. गडकरी म्हणाले, ‘पुणे मेट्रो’ची फाईल अंतिम मंजुरीसाठी सार्वजनिक गुंतवणूक मंडळासमोर (पब्लिक इनव्हेस्टमेंट बोर्ड- पीआयबी) आली असून त्याला लवकरच मान्यता मिळेल. पुण्याच्या विमानतळासाठी संरक्षण मंत्रालयाने १७ एकर जागा दिली आहे. आता ३८ एकर जागा मिळवून देण्याचा प्रयत्न असून त्यालाही यश मिळेल. रिंग रोड विकसित करण्यासाठी केंद्र सरकार तयार आहे. राज्य शासनाने रिंग रोडचा प्रस्ताव तातडीने केंद्राला सादर केला तर रस्ते वाहतूक मंत्रालयामार्फत आम्हीच रिंग रोड बांधून देण्यास तयार आहोत.