चिंचवड-विद्यानगर येथील खाणीच्या जागेत सहल केंद्र उभारण्याचे महापालिकेचे नियोजन आहे, त्यासाठी आराखडाही तयार करण्यात आला. मात्र,प्रत्यक्षात या कामाची सुरूवातच झाली नसल्याची माहिती पुढे आली आहे. हैदराबादच्या धर्तीवर पर्यावरणपूरक बर्फवृष्टी प्रकल्प या ठिकाणी विकसित करावा, अशी मागणी माजी खासदार गजानन बाबर व नगरसेविका शारदा बाबर यांनी आयुक्त राजीव जाधव यांच्याकडे केली आहे.
विद्यानगर येथे आरक्षण क्रमांक ३०२ मध्ये महापालिकेने ‘बर्ड व्हॅली’ उद्यान प्रकल्प राबवला आहे. हजारो पर्यटक या ठिकाणी भेट देत आहेत. या उद्यानामुळे महापालिकेला मोठय़ा प्रमाणात उत्पन्नही मिळत आहे. या उद्यानाशेजारील खाणीची जागा सहल केंद्रासाठी आरक्षित आहे. ‘बर्ड व्हॅली’च्या कामाला सुरूवात करताना सहल केंद्रासाठी आराखडे तयार करण्यात आले होते. प्रत्यक्षात त्या कामांना सुरूवात झाली नाही. ही जागा पालिकेच्या बडय़ा ठेकेदारांना वापरण्यासाठी देण्यात आली आहे. त्यामुळे येथे प्रदूषणाची समस्या निर्माण झाली असून नैसर्गिक खाणीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. येथे हैदराबादच्या धर्तीवर पर्यावरणपूरक बर्फवृष्टी तसेच पाण्याखालील बर्फवृष्टी विकसित करावी, अशी मागणी बाबर यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केली आहे.