मूल्यवर्धित कर भरणाऱ्या, मात्र एलबीटी न भरणाऱ्या शहरातील जवळपास ३५० व्यापाऱ्यांना पिंपरी पालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. याशिवाय, जे एलबीटी भरतच नाहीत, अशा सर्वाना तातडीने एलबीटी भरावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, अशी कठोर भूमिका पालिकेने घेतली आहे.
अशोक मुंढे यांची बदली झाल्यानंतर शिर्डी देवस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत माने यांनी पिंपरी पालिकेत एलबीटी प्रमुखपदाची सूत्रे स्वाकारली. प्रारंभी त्यांनी विभागाच्या कामाचा सर्व आढावा घेतला. त्यानंतर, महापालिकेच्या उत्पन्नाचे प्रमुख स्रोत असलेल्या एलबीटीच्या भरण्याकडे अधिक लक्ष केंद्रित केले आहे. यासंदर्भात माने यांनी पत्रकारांना सांगितले की, १ एप्रिलपासून एलबीटी लागू करण्यात आली. सप्टेंबरअखेर ३८० कोटींचे उत्पन्न मिळाले. जकातीच्या तुलनेत १०० कोटींहून अधिक रूपयांची तूट आली. सुरूवातीला एलबीटी भरण्यास व्यापारी व नागरिकांचा विरोध होता. मात्र, हळहूळू विरोध मावळला. तरीही अधिकाधिक व्यापाऱ्यांची चालढकल दिसून येते. त्यामुळे पालिकेने आता कठोर पवित्रा घेतला आहे. एलबीटी न भरणाऱ्यांचे खुलासे मागवण्यात येत आहेत. मूल्यवर्धित कर भरणाऱ्या मात्र एलबीटी न भरणाऱ्या ३५० व्यापाऱ्यांना नोटिसा बजावून त्यांचे म्हणणे सादर करण्यास सांगण्यात आले आहे. वारंवार आवाहन करूनही एलबीटी न भरणाऱ्या अन्य नागरिकांना कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. सध्या आव्हानात्मक परिस्थिती आहे. विकासकामांसाठी उत्पन्न आवश्यक आहे. त्यामुळे नियोजन आवश्यक असून उत्पन्नवाढीसाठी कठोर कारवाई करावी लागणार असल्याची भूमिका माने यांनी घेतली आहे.