प्रचाराची मुदत संपली असल्यामुळे उमेदवारांनी सोशल मीडियाद्वारे प्रचार करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, तरीही उमेदवारांकडून प्रचार होत आहेत याकडे लक्ष वेधले असता प्रचाराचे ‘एसएमएस’ उमेदवारानेच केले हे सिद्ध करणे अवघड असल्यामुळे त्यावर कारवाई करता येणे शक्य नसल्याचे सौरभ राव यांनी स्पष्ट केले. जिल्ह्य़ातील १०८ मतदान केंद्रे संवेदनशील आहेत, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी सौरभ राव यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत निवडणुकीच्या मतदान तयारीविषयीची माहिती दिली. लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची तयारी पूर्ण झाली असून बुधवारी (१६ एप्रिल) एका प्रशिक्षणानंतर मतदान बूथवर काम करणारे कर्मचारी आपापल्या मतदान केंद्रांकडे जाण्यासाठी रवाना होणार आहेत. जिल्ह्य़ातील चार लोकसभा मतदारसंघांसाठी ७ हजार ९९० मतदान यंत्रे (इव्हीएम) लागणार आहेत.
सौरभ राव म्हणाले, की संपूर्ण मतदान प्रक्रियेवर एसएमएसच्या माध्यमातून नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. कर्मचारी आपापल्या मतदान केंद्रांकडे जाण्यासाठी रवाना होणार आहेत. तेथे पोहोचल्यावर कर्मचाऱ्यांनी एसएमएस करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मतदानाच्या दिवशी (१७ एप्रिल) सकाळी सहा वाजता सर्व मशिन्स व्यवस्थित कार्यरत असल्याचे पोलिंग एजन्टना दाखवल्यानंतर दुसरा एसएमएस पाठवायचा आहे. मतदान सुरू झाल्यानंतर आणि दर दोन तासांनी एसएमएस पाठविणे आवश्यक आहे. सायंकाळी सहा वाजता मतदान संपल्यावर रांगेत किती लोक आहेत याचीही माहिती देणे अपेक्षित आहे. जिल्ह्य़ातील चार लोकसभा मतदारसंघातील १ हजार ४१ मतदान केंद्रे पहिल्या मजल्यावर आहेत. तेथे रॅम्पची सुविधा उपलब्ध होऊ शकत नाही. अशा केंद्रांवर विशिष्ट गरजा असलेल्या मतदारांना खुर्चीमध्ये बसवून मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठी दोन मदतनिसांची नियुक्ती करण्यात आली आहे.
निवडणुकीतील गैरप्रकार आणि आचारसंहिता भंगाच्या ५५ तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यापैकी पुण्यातील १८ तक्रारी आहेत. बारामतीमध्ये केवळ दोन तक्रारी दाखल झाल्या आहेत. प्रचारादरम्यान पुणे लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत पाच गैरप्रकार दाखल झाले असून ६८ लाख ३ हजार ६६० रुपये जमा करून घेतले आहेत, असेही सौरभ राव यांनी सांगितले.
 
मतदारसंघ     :    जिल्ह्य़ातील मतदारांची संख्या
पुणे :        १८ लाख ३३ हजार ८५९
बारामती :        १८ लाख ०९ हजार ९२०
शिरुर :        १८ लाख २० हजार ४२४
मावळ :        १० लाख ९७ हजार ०७६