आंदोलक प्रवाशांनाच रेल्वेकडून दंडाची शिक्षा

बारामती व दौंड पट्टय़ातील अनेक प्रवाशांना नोकरी व शिक्षणाच्या निमित्ताने सकाळी पुण्यात येण्यासाठी उपयुक्त असलेल्या बारामती पॅसेंजरला रेल्वेच्या ढिसाळ नियोजनामुळे सातत्याने उशीर होत असल्याने बुधवारी या गाडीच्या प्रवाशांचा संताप समोर आला. हडपसर येथे ही गाडी थांबवून ठेवल्यानंतर प्रवाशांनी खाली उतरून तासभर लोहमार्ग रोखला. प्रवाशांपैकी १९ जणांना रेल्वे सुरक्षा दलाने ताब्यात घेतले व या आंदोलकांकडूनच प्रत्येकी दोन हजारांचा दंड वसूल करण्यात आला.

बारामती, दौंड, यवत, पाटस, केडगाव आदी भागातून मोठय़ा संख्येने प्रवासी सकाळी बारामती पॅसेंजरने पुण्यात नोकरी व शिक्षणासाठी येतात. ही गाडी नियोजित वेळेनुसार सकाळी दहा सव्वादहाला पुणे स्थानकावर पोहोचणे अपेक्षित आहे. मात्र, या गाडीला सातत्याने उशीर होतो. प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, लांब पल्ल्याच्या गाडय़ा त्याचप्रमाणे मालगाडय़ा पुढे सोडण्यासाठी ही गाडी सातत्याने बाजूला काढण्यात येते. या गाडय़ा पुढे पोहोचेपर्यंत पॅसेंजर थांबवून ठेवल्यामुळे रोजच तिला उशीर होतो. पर्यायाने अनेकांना वेळेत नोकरीच्या ठिकाणी पोहोचता येत नाही. विद्यार्थ्यांचे शाळा व कॉलेजचे नियोजनही कोलमडते. पॅसेंजरला उशीर होत असल्याने काहींना नोकरीही गमवावी लागली आहे. बुधवारी सकाळी ही गाडी सुटल्यानंतरही ठिकठिकाणी थांबविण्यात आली. हडपसर येथे आल्यानंतरही गाडी बाजूला काढून दुसऱ्या गाडय़ा पुढे सोडल्या गेल्या. त्यामुळे प्रवासी संतप्त झाले. त्यांनी याबाबत स्टेशन मास्तरांकडे विचारणा केली, मात्र त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे अनेकजण गाडीच्या खाली उतरले व त्यांनी थेट लोहमार्गच अडवून धरला. या प्रकाराबद्दल रेल्वे सुरक्षा दलाने १९ जणांना ताब्यात घेतले. त्यांना रेल्वे न्यायालयापुढे सादर करून प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या दंडाची वसुली करण्यात आली.

रेल्वेकडून पॅसेंजर गाडय़ांच्या प्रवाशांना जाणीवपूर्वक वेठीला धरले जात आहे. बारामती पॅसेंजर सातत्याने उशिरा धावते. त्यामुळे प्रवाशांना रोजच नाहक त्रास सहन करावा लागतो. हा प्रश्न मांडण्यासाठी प्रवाशांनी उत्स्फूर्तपणे आंदोलन केले. मात्र, त्यांनाच दंडाची शिक्षा करण्यात आली. मुंबईत पाच मिनिटे गाडीला उशीर झाला, तरी प्रवासी गाडय़ा अडवून धरतात. त्यांच्याकडून कधी दंड वसूल होत नाही. इथे प्रामाणिक प्रवाशाला शिक्षा केली जाते. सुविधा न देता उलट शिक्षा करण्याचा हा अनागोंदी प्रकार सुरू आहे.

हर्षां शहाअध्यक्षा, रेल्वे प्रवासी ग्रुप