पिंपरी महापालिकेच्या बहुचर्चित ‘सारथी’ योजनेच्या माध्यमातून दोन वर्षांत तब्बल २६ हजार तक्रारींचे निवारण करण्यात आले असून आतापर्यंत चार लाख २७ हजार नागरिकांनी ‘सारथी’ चा लाभ घेतला आहे.
डॉ. श्रीकर परदेशी यांच्या पुढाकाराने सुरू केलेल्या ‘सारथी’चे १५ ऑगस्ट २०१३ मध्ये अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन झाले. राज्य शासनाकडील राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानात ‘सारथी’ला १० लाखांचे बक्षीस मिळाले आहे. १५ मे अखेर ‘सारथी’च्या माध्यमातून विविध विभागांशी संबंधित एकूण २७ हजार ३४० तक्रारी प्राप्त झाल्या, त्यापैकी २६ हजार ५८१ तक्रारींचे निराकरण झाले, त्याची टक्केवारी ९७.२२ इतकी आहे. आतापर्यंत चार लाखांहून अधिक नागरिकांनी ‘सारथी’ चा लाभ घेतला आहे. संकेतस्थळ व वेब लिंकच्या माध्यमातून एक लाख ८७ हजार, हेल्पलाइन ९१ हजार ९८९, पीडीएफ पुस्तिका ८७ हजार ३६०, ई-बुक ४५ हजार १६, मोबाइल ८ हजार ५२३, छापील पुस्तिका सात हजार ६२५ अशी त्याची वर्गवारी आहे, अशी माहिती महापालिकेने प्रसिद्धीस दिली आहे.