स्थायी समितीच्या अध्यक्षांकडून तयार केले जाणारे महापालिकेचे अंदाजपत्रक म्हणजे चमकदार आणि आकर्षक घोषणांची सरबत्ती; पण प्रतिवर्षी घडणाऱ्या या प्रकाराला यंदाचे अध्यक्ष बापूराव कर्णे गुरुजींनी फाटा दिला आहे. लोकप्रिय घोषणांपासून गुरुजी चार हात दूर राहिले आणि कोणत्याही घोषणेचा सोस न धरता त्यांनी फक्त विविध विकासकामांना अधिकाधिक निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न अंदाजपत्रकात केला आहे.
महापालिकेचे आगामी आर्थिक वर्षांचे (सन २०१५-१६) अंदाजपत्रक शुक्रवारी कर्णे गुरुजी यांनी सादर केले. महापालिका आयुक्तांनी अंदाजपत्रक तयार करून ते स्थायी समितीला सादर केले की स्थायी समितीमार्फत त्यात अनेक फेरबदल केले जातात, अंदाजपत्रक वाढवले जाते आणि अखेर त्याला अंतिम स्वरूप देण्याचे सर्वाधिकार अध्यक्षांना दिले जातात. हे अधिकार प्राप्त झाल्यानंतर स्थायी समितीच्या अध्यक्षांकडून पुणेकरांसाठी अनेक घोषणांची सरबत्ती त्यांच्या अंदाजपत्रकात केली जाते. अशा योजनांसाठी आर्थिक तरतुदी केल्या जातात आणि मग चर्चा होऊन अंदाजपत्रक मुख्य सभेमार्फत मंजूर केले जाते.
यंदाच्या अंदाजपत्रकाचे वैशिष्टय़ म्हणजे अध्यक्ष कर्णे गुरुजी यांनी त्यांच्या अंदापत्रकात पुणे शहरासाठी वाय-मॅक्स सुविधा सुरू करणे, गोपाळ कृष्ण गोखले यांच्या नावाने उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार सुरू करणे, कात्रज-कोंढवा भागात इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करणे, तमिळ समाज मंदिराचे बांधकाम अशा अगदी मोजक्याच योजना जाहीर केल्या आहेत. अंदाजपत्रकाच्या माध्यमातून शहराचा विकास कसा होईल याचा विचार केला आहे आणि वास्तववादी अंदाजपत्रक मांडण्याचा प्रयत्न केला आहे, असे कर्णे गुरुजी यांनी अंदाजपत्रक सादर करताना सांगितले.
आजवर काय होत होते..?
स्थायी समितीचे अध्यक्ष या नात्याने अध्यक्षांकडून त्यांच्या अंदाजपत्रकात आकर्षक व चमकदार अशा तीस ते चाळीस घोषणा आतापर्यंत केल्या जात असत. प्रत्यक्षात वर्ष संपताना त्यातील फारच थोडय़ा घोषणांची अंमलबजावणी झाल्याचे चित्र वेळोवेळी दिसते.
यंदा काय झाले..?
स्थायी समितीच्या अंदाजपत्रकात यंदा चमकदार घोषणा करण्यात आलेल्या नाहीत. चारपाच नव्या योजनांचा या अंदाजपत्रकात समावेश आहे. महापालिका आयुक्तांनी प्रस्तावित केलेल्या योजनांना पुरेसा निधी मिळेल अशा तरतुदी करण्यात आल्या आहेत.
वास्तवात न येणाऱ्या घोषणा केल्या नाहीत
अनेक अंदापत्रकातून मी बघितले आहे की अनेक घोषणा पुणेकरांसाठी केल्या जातात. अंदाजपत्रकाचे वर्ष संपले, तरी त्या घोषणा पूर्ण होतच नाहीत. त्यामुळे त्या घोषणांना काही अर्थ नसतो. अशा घोषणा करण्यापेक्षा प्रशासनाने सादर केलेल्या योजनांना, विकासकामांना अधिकाधिक निधी देण्याचे काम मी केले आहे. पूर्ण होऊ न शकणाऱ्या घोषणा करण्यापेक्षा प्रत्यक्ष विकासकामे करून दाखवण्याला मी महत्त्व दिले.
बापूराव कर्णे गुरुजी अध्यक्ष, स्थायी समिती