गुंड टोळय़ांमधील वर्चस्वाचा वाद आणि त्यातून बळी पडणारे सराईत गुंड यांच्याविषयी सर्वसामान्यांना आस्था असण्याचे काही कारण नाही, मात्र गेल्या काही वर्षांपासून टोळय़ांमधील वर्चस्वाच्या वादाची झळ सामान्यांना बसण्याच्या अनेक घटना पुणे शहरात घडल्या आहेत. भरदिवसा पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात वाहनांची मोडतोड आणि जाळपोळही झाली आहे. वाहने पेटविण्याचे सत्र शहरात सुरू आहे. नवनियुक्त पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्यापुढे पुण्यातील वाढती गुंडगिरी रोखण्याचे आव्हान आहे आणि सामान्यांचीदेखील हीच अपेक्षा आहे.
रश्मी शुक्ला यांनी पोलीस आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारण्यापूर्वी एकच दिवस आधी कात्रज आणि सहकारनगर पोलीस ठाण्याच्या आवारालगत असलेली वाहने पेटवून देण्याच्या घटना घडल्या. या दोन्ही घटनांमध्ये ३३ वाहने पेटवून देण्यात आली. या गुन्हय़ांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले. आरोपी पकडले गेले असले तरी अशा घटना रोखण्यासाठी शहरात कठोर पावले उचलण्याची गरज आहे. पुण्याचे पोलीस आयुक्तपद भूषविणाऱ्या रश्मी शुक्ला या दुसऱ्या महिला अधिकारी आहेत. मीरा बोरवणकर यांनी पोलीस आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर पोलीस दलाला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला होता. पोलीस दलासाठी कल्याणकारी योजना राबविण्याचे निर्णय घेतले होते. ‘बोरवणकर मॅडम’चा पोलीस दलात दरारा होता. नवनियुक्त पोलीस आयुक्त शुक्ला यादेखील शिस्तीच्या भोक्त्या आहेत.
पुणे पोलीस दलाची विस्कटलेली घडी बसविण्याची धमक त्यांच्यात आहे, तसेच गुंडगिरी आणि अवैध धंदे मोडून काढण्याचे आव्हानही त्यांच्यापुढे आहे. या कामात त्यांना सहपोलीस आयुक्त सुनील रामानंद यांची मदत होणार आहे. रामानंद हे दीर्घकालीन रजेवर गेले होते. पोलीस आयुक्त के. के. पाठक गुरुवारी (३१ मार्च) सेवानिवृत्त झाले. त्यानंतर रामानंद यांनी तातडीने सहपोलीस आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली. पोलीस आयुक्त शुक्ला यांनी दहशतवादाचा धोका कायम असल्याचे सूत्रे स्वीकारताना सांगितले. मात्र, सामान्य पुणेकरांपुढे गुंडांची दहशत हीच मोठी समस्या आहे. शाळा, महविद्यालयांच्या बाहेर थांबून छेड काढणारी टोळकी, गुंडांच्या वादातून सामान्यांच्या घरांवर होणारी दगडफेक, वाहनांची मोडतोड या घटना सामान्यांच्या दृष्टीने दहशतवादी घटना आहेत. नव्या पोलीस आयुक्तांनी गुंडांचा बंदोबस्त करावा, अशीच सामान्यांची अपेक्षा आहे.
शहरालगत असलेल्या मोकळय़ा जागांवर कब्जा करणे हा गुंड टोळय़ांचा अधिकृत व्यवसाय आहे. काही बांधकाम व्यावयायिक अशा टोळय़ांना आर्थिक रसद पुरवतात. जागामालकाला जमिनीची किंमत देऊन तेथून हुसकावून लावले जाते. गुंड टोळय़ा आणि पोलीस दलातील काही अधिकाऱ्यांचे साटेलोटे आहे. अवैध धंदे आणि त्यातून मिळणाऱ्या मलिद्यामुळे अधिकारी अशा धंद्याकडे काणाडोळा करतात. नव्या पोलीस आयुक्तांनी अशा आधिकाऱ्यांना वठणीवर आणावे, अशी अपेक्षा पोलीस दलातून व्यक्त केली जात आहे.

अवैध धंदे बंद करण्याचे आदेश
सहपोलीस आयुक्त सुनील रामानंद हे दीर्घ रजेवरून गुरुवारी परतले. त्यांनी लगेचच शहरातील अवैध धंदे बंद करण्याचे आदेश सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना दिले. रामानंद हे रजेवर गेल्यानंतर अवैध धंदे करणाऱ्यांचे फावले होते. पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला आणि रामानंद हे शिस्तीचे भोक्ते आहेत. ही जोडगोळी पोलीस दलातील नाठाळांना वठणीवर आणेल, अशी चर्चा पोलीस दलात आहे.