मध्य पुणे आणि उपनगरांमधील वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी आखण्यात आलेला ३५ किलोमीटर लांबीचा रिंग रोड सत्तावीस वर्षांनंतर अखेर मार्गी लागला आहे. या रस्त्यासाठी जे भूसंपादन करावे लागणार आहे, त्यासाठीची संयुक्त मोजणी सोमवार (२८ एप्रिल) पासून सुरू केली जाणार असून रस्त्याच्या कामासाठी अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय गुरुवारी स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला. याच रस्त्याचा काही भाग मोनोरेलसाठीही वापरला जाणार आहे.
पुणे शहरासाठी १९८७ साली तयार करण्यात आलेल्या विकास आराखडय़ात हा रस्ता प्रस्तावित करण्यात आला होता. मात्र, गेल्या सत्तावीस वर्षांत या रस्त्यासाठी अवघे सहा टक्के जागेचे भूसंपादन होऊ शकले. वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा व आवश्यक असला, तरी या रस्त्याबाबत गेली अनेक वर्षे फक्त चर्चाच सुरू होती.
या रस्त्याचे काम मार्गी लागण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी तसेच दर आठवडय़ाला या रस्त्याच्या प्रगतीचा आढावा सादर करावा, असे दोन प्रस्ताव काँग्रेसचे नगरसेवक आबा बागूल यांनी स्थायी समितीला दिले होते. हे प्रस्ताव गुरुवारी स्थायी समितीत चर्चेला आल्यानंतर त्यावर प्रदीर्घ चर्चा झाली. या रस्त्याला छोटे-मोठे साठ रस्ते जोडलेले असल्यामुळे रस्त्याचे महत्त्व लक्षात घेऊन कार्यवाही झाल्यास शहराचा वाहतुकीचा प्रश्न सुटू शकतो, असे बागूल यांनी या वेळी सांगितले. त्यानंतर उपायुक्त माधव जगताप यांनी रस्त्याबाबतची माहिती सादर केली. रस्त्याच्या संपूर्ण प्रकल्पाचे सादरीकरण या वेळी करण्यात आले. रस्त्याच्या भूसंपादनासाठी १,०५० कोटी रुपये लागतील, अशी माहिती या वेळी देण्यात आली.
या रस्त्याचे महत्त्व लक्षात घेऊन भूसंपादनाची प्रक्रिया व अन्य प्रक्रिया वेगाने पूर्ण होण्यासाठी अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बोकारिया यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्याचाही निर्णय स्थायी समितीमध्ये घेण्यात आला. अतिरिक्त आयुक्त तसेच नगर अभियंता प्रशांत वाघमारे, पथ विभागाचे प्रमुख प्रमोद निरभवणे आणि तीन अभियंते या समितीमध्ये असून भूसंपादनासाठीची आवश्यक मोजणी जिल्हाधिकाऱ्यांच्या बरोबर केली जाणार आहे. मोजणीची ही प्रक्रिया सोमवारी सुरू होणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
मोनोरेलचेही नियोजन
हा रस्ता २४ मीटर रुंदीचा असून त्याची लांबी ३५ किलोमीटर आहे. याच रस्त्यातील काही भागाचा उपयोग मोनोरेलसाठी देखील होऊ शकतो. त्यामुळे रस्त्याचा काही भाग वापरून मोनोरेलही सुरू करण्याचे नियोजन करावे अशी चर्चा बैठकीत झाली. त्यानुसार या रस्त्यावर मोनोरेलचेही नियोजन केले जाणार आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष बापूराव कर्णे गुरुजी, तसेच अशोक येनपुरे, चेतन तुपे, शंकर केमसे, मुकारी अलगुडे यांची या विषयावर भाषणे झाली.
वाहतुकीच्या प्रश्नाबाबत चांगला निर्णय
वाहतुकीचा प्रश्न सुटावा यासाठी गेली अनेक वर्षे मी पाठपुरावा करत होतो. त्यासाठी आयुक्तांना आजपर्यंत एकशेवीस पत्रे दिली. अखेर रिंग रोडच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्याचा अतिशय चांगला निर्णय झाला असल्याची प्रतिक्रिया नगरसेवक आबा बागूल यांनी स्थायी समितीच्या बैठकीनंतर व्यक्त केली.