स्टेट बँक ऑफ इंडियाची ३३ बनावट क्रेडिट कार्ड तयार करून त्याद्वारे एक कोटी एकेचाळीस लाखांची खरेदी करणाऱ्या तिघांना सायबर गुन्हे शाखेने गजाआड केले.

देवीलाल वीरेंद्र यादव (वय २४, सध्या रा. शिवणे, मूळ रा. औरंगाबाद, बिहार), सागर भूदेवसिंद फौजदार (वय २८, रा. शिवणे ), उमेश अजित निबरे (वय २९, रा. हॅपी कॉलनी, कोथरूड) अशी अटक करण्यात आलेल्या भामटय़ांची नावे आहेत. स्टेट बँकेच्या फसवणूक नियंत्रण विभागातील (फ्रॉड कंट्रोलर) अधिकारी स्वप्नील राऊत (रा.दहिसर, मुंबई) यांनी या संदर्भात सायबर गुन्हे शाखेकडे तक्रार दिली होती. सन २०१३ ते २०१५ मध्ये ग्लोबल इनोव्हा कंपनीने बँक ऑफ महाराष्ट्राच्या डेक्कन शाखेतील खातेधारकांना स्टेट बँक ऑफ इंडियाची क्रेडिट कार्ड दिली होती.

त्यापैकी ३३ खातेधारकांना क्रेडिट कार्डची सुविधा पुरवण्यात आली होती. ३३ कार्डधारकांनी क्रेडिट कार्ड सुविधेसाठी लागणारे शुल्क देखील भरले नव्हते. त्यामुळे क्रेडिटकार्ड धारकांचे पत्ते शोधण्यात आले. तेव्हा पत्ते बनावट निघाले. त्यामुळे शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती.

सायबर गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक मनीषा झेंडे यांनी या गुन्ह्य़ाचा तपास सुरू केला. तेव्हा आरोपी यादव, फौजदार, निबरे यांनी ३३ बनावट नावाने क्रेडिट कार्ड काढली होती. त्यासाठी लागणारे पत्ते बनावट दिले होते.

सन २०१३ ते २०१५ या कालावधीत त्यांनी यंत्रसामग्री खरेदी केली होती. त्याद्वारे त्यांनी एक कोटी ४१ लाख रुपयांचा गंडा घातल्याचे निष्पन्न झाले. पोलीस उपायुक्त दीपक साकोरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक झेंडे, सहायक निरीक्षक सागर पानमंद, उपनिरीक्षक प्रवीण स्वामी, नितीन खामगळ, दीपक भोसले, शिरीष गावडे, नितीन चांदणे, भास्कर भारती, नितेश शेलार, राहुल हंडाळ, नवनाथ जाधव, अमित औचरे यांनी ही कारवाई केली.