देशातील आघाडीचे विद्यापीठ म्हणून शेखी मिरवणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला रोजगारभिमुख विद्यापीठांच्या जागतिक क्रमवारीत स्थानही मिळवता आलेले नाही. मुंबई विद्यापीठ वगळता या यादीत राज्यातील एकाही विद्यापीठाचा समावेश नाही.

जगातील विद्यापीठांची वेगवेगळ्या पातळ्यांवरील क्रमवारी ‘क्यूएस’ या संस्थेकडून जाहीर करण्यात येते. या संस्थेने नुकतीच विद्यापीठाच्या पदवीधर विद्यार्थ्यांना मिळालेल्या रोजगारानुसार ‘रोजगारक्षम विद्यापीठांची’ जागतिक क्रमवारी जाहीर करण्यात आली.

जगातील पाचशे विद्यापीठांची यादी या संस्थेने जाहीर केली. देशात अव्वल स्थानी असल्याचे सांगणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला या क्रमवारीत स्थानही मिळालेले नाही. म्हणजेच विद्यापीठातील पदवीधरांना नोकरी मिळेल असे शिक्षण देण्याच्या जागतिक स्पर्धेत विद्यापीठ जगातील पाचशे विद्यापीठांमध्येही नाही.

विद्यापीठातील पदवीधरांना नोकरी मिळण्याचे प्रमाण, मिळालेल्या नोकरीचा दर्जा, नोकरी देणाऱ्या कंपन्यांचा दर्जा, माजी विद्यार्थ्यांना मिळालेल्या नोकऱ्या आणि त्याचा दर्जा अशा निकषांवर क्रमवारी निश्चित करण्यात आली. त्याचबरोबर पदवीधरांना नोकरी मिळण्यासाठी विद्यापीठाकडून करण्यात येणारे प्रयत्न म्हणजेच उद्योग किंवा कंपन्यांशी करार, विद्यार्थी आणि कंपन्यांचा संवाद घडवून आणण्यासाठी करण्यात आलेले प्रयत्न हे देखील पाहण्यात आले.

मुंबई विद्यापीठाला स्थान

क्यूएसने जाहीर केलेल्या या क्रमवारीत मुंबई विद्यापीठ हे राज्यातील एकमेव विद्यापीठ आहे. २०१ ते २५० या क्रमवारीत विद्यापीठाचे स्थान आहे. या यादीत स्थान मिळालेल्या देशातील बाकी शिक्षणसंस्थांमध्ये केंद्रीय विद्यापीठे आहेत. जागतिक क्रमवारीत स्थान मिळाले नाही की ‘या क्रमवारीचे निकष हे देशांतील विद्यापीठांसाठी योग्य नाहीत’, ‘पुणे विद्यापीठातील विद्यार्थिसंख्या खूप आहे त्यामुळे आकडेवारीच्या निकषांवर विद्यापीठाचा टिकाव लागत नाही,’ अशी कारणे विद्यापीठाकडून देण्यात येत होती. मात्र पुणे विद्यापीठाशी बहुतांशी प्रमाणात साधम्र्य असलेल्या मुंबई विद्यापीठाला स्थान मिळाल्यामुळे क्रमवारीचे निकष खरे की विद्यापीठाचे म्हणणे असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

देशातील शिक्षणसंस्थांचे स्थान

क्रमवारी              शिक्षणसंस्था

१९१ – २०० :   आयआयटी, मुंबई, आयआयटी दिल्ली

२०१ – २५० :   आयआयटी, चेन्नई,  दिल्ली विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ

२५१ – ३०० :   आयआयटी, खरगपूर

३०१ – ५०० :   इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ बंगळुरू, इंडियन  इन्स्टिटय़ूट ऑफ कानपूर