वाहन चालविण्याचा शिकाऊ व पक्का परवाना काढण्यासाठी सध्या ऑनलाइन यंत्रणेतून अर्ज सादर करावे लागतात. या व्यवस्थेतून दिल्या जाणाऱ्या तारखेला संबंधिताची वाहन चालविण्याची चाचणी घेतली जाते. प्रत्येकाला ठरावीक कालावधीत हमखास परवाना मिळण्यासाठी ही यंत्रणा योग्य असली, तरी आता त्यातही घुसखोरी सुरू झाल्याच्या तक्रारी आहेत. वाहन चालविण्याची चाचणी घेण्याची तारीख पुढची असतानाही काहींना मध्येच घुसवून आधीच त्यांची चाचणी घेतली जात असल्याच्या तक्रारी आहेत. काही अधिकारी व एजंटांच्या युतीतून हे प्रकार घडत असून, त्यामुळे प्रामाणिकपणे ऑनलाइन यंत्रणेतून येणाऱ्या सर्वसामान्यांना त्याचा फटका बसत आहे.
चारचाकी व दुचाकी चालविण्यासाठी शिकाऊ परवाना काढताना ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करावी लागते. याच व्यवस्थेतून संबंधिताला परीक्षेची वेळ व तारीखही दिली जाते. परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्यांना पुन्हा ऑनलाइन यंत्रणेतूनच पक्का परवाना मिळविण्यासाठी वाहन चालविण्याची चाचणी देण्यासाठी वेळ व तारीख घ्यावी लागते. दिलेल्या तारखेला वाहन चालविण्याची चाचणी घेतली जाते. अशा पद्धतीने ही यंत्रणा असली, तरी वाहन परवाना मागणाऱ्यांची संख्या व आरटीओकडे असणारे मनुष्यबळ याचा ताळमेळ अद्यापही बसलेला नाही. अनेकदा शिकाऊ परवान्याची मुदत उलटूनही पक्क्य़ा परवान्यासाठी तारीख मिळत नाही. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो.
पक्क्य़ा परवान्याची चाचणी देण्यासाठी आलेल्या नागरिकांना अनेकदा दिलेल्या तारखेला चाचणी देता येत नाही. संध्याकाळपर्यंत चाचणी ट्रॅकजवळ थांबून घरी परतावे लागते. अशा सर्व अडचणी असताना आता ऑनलाइन यंत्रणेला छेद देण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. एजंटच्या माध्यमातून वाहन परवाना मिळविण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या बाबतीत हे प्रकार होत आहेत. आरटीओतील काही अधिकारी व एजंट मंडळींची युती एक उघड सत्य आहे. ऑनलाइन यंत्रणा नसताना सर्रासपणे एजंटांकडून आलेल्या अर्जदाराला प्राधान्य दिले जात होते. ऑनलाइन यंत्रणेमुळे या प्रकारांना काहीसा आळा बसला असतानाच आता वेगळी शक्कल लढवून पुन्हा एजंटाकडून आलेल्या अर्जदारालाच प्राधान्यक्रम देण्याचे प्रकार सुरू झाले आहेत.
चाचणीच्या ट्रॅकवर असणारे मनुष्यबळ व एका व्यक्तीच्या चाचणीची वेळ लक्षात घेऊन प्रत्येक दिवशी ठरावीक अर्जदारांना चाचणीची वेळ दिली जाते. मात्र, चाचणीची तारीख पुढची असणाऱ्या काहींना मध्येच घुसविले जात असल्याने रितसर तारीख मिळालेल्या अर्जदाराला संबंधित दिवशी चाचणी देता येत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. याबाबत वरिष्ठांनी तातडीने लक्ष घालून हे प्रकार थांबवावेत, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.