केंद्रीय मंत्र्यांशी संपर्क; संयुक्त बैठकीचे संकेत

िपपरीतील एचए कंपनीच्या विविध प्रश्नांची सखोल माहिती असलेले ज्येष्ठ खासदार शरद पवार यांनी ‘काही कारणास्तव’ स्वत:ला या विषयापासून दूर ठेवले होते. तथापि, ‘साहेब कंपनी वाचवा’ असे साकडे कामगारांनी त्यांना घातले आणि पवारांनी पुन्हा यात लक्ष घातले. गुरूवारी (३० जून) त्यांनी कामगार प्रतिनिधींना मुंबईत बोलावून घेतले आणि या विषयाशी संबंधित तीन केंद्रीय मंत्र्याशी संवाद साधला. वरिष्ठ पातळीवरील संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे.

एचए कामगार संघटनेच्या घटनेनुसार स्थानिक खासदार संघटनेचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. त्यानुसार, शरद पवार अनेक वर्षे संघटनेच्या अध्यक्षपदी होते. मतदारसंघांच्या पुनर्रचनेत िपपरी-चिंचवडला बारामती मतदारसंघातून वगळून नव्याने तयार केलेल्या मावळात समाविष्ट करण्यात आले. त्यानंतरच्या निवडणुकीत गजानन बाबर खासदार झाले, तेव्हा कंपनीतील पवारनिष्ठ पदाधिकाऱ्यांनी बाबर यांच्याऐवजी खासदार सुप्रिया सुळे यांना अध्यक्षपदी बसवले. कामगार संघटनेच्या निवडणुका झाल्या, त्यात पवारांच्या विचाराचे पॅनेल पराभूत झाले आणि नागपूर विचारसरणीचे पॅनेल निवडून आले. त्यांनी सुळे यांच्याऐवजी शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडे संघटनेच्या अध्यक्षपदाची धुरा दिली. तेव्हापासून एचए कंपनीच्या घडामोडींपासून पवार दूरच होते. विविध माध्यमातून सुळे यांचा एचए प्रकरणी पाठपुरावा दिसत होता. तथापि, पवार थेट सक्रिय नव्हते. या पाश्र्वभूमीवर, २४ जूनला थेरगावातील मेळाव्यासाठी पवार आले, तेव्हा ‘साहेब, एचए वाचवा, असे फलक घेऊन कामगार उभे होते. ते पाहून पवार भाषणात म्हणाले की, गेल्या १५ वर्षांत एचएचा पाठपुरावा केला नाही, असे झाले नाही. कंपनीच्या कारभारात आपण कधी राजकारण आणले नव्हते. मात्र, दिल्लीत सत्ता बदलली आणि कंपनीतही विचार बदलला, त्यांना ‘भगवा’ जवळचा वाटू लागला. प्रश्न सुटत असले तर जाऊ दे, अशी भूमिका आम्हीही घेतली. मात्र, ज्यांच्या मागे ते गेले, त्यांच्यात प्रश्न सोडवण्याची क्षमता नसल्याचे सर्वाच्याच लक्षात आले. कामगारांचा दोष नव्हता. कामगार संघटनांनी संधिसाधूपणा केला, तसे त्यांनी करू नये. दिवस बदलले तरी मूळ रस्ता सोडायचा नसतो, अशा सूचक शब्दात पवारांनी भाष्य केले. अलीकडे लक्ष देत नव्हतो, अशी कबुली देतानाच नव्याने पुन्हा कामगारांच्या समस्येत लक्ष घालण्याची ग्वाही त्यांनी मेळाव्यात दिली. त्यानुसार, गुरूवारी त्यांनी कंपनीच्या पदाधिकाऱ्यांना मुंबईत बोलावून घेतले. सद्य:स्थितीची माहिती घेतल्यानंतर त्यांनी केंद्रीय मंत्री अरूण जेटली, नितीन गडकरी, अनंतकुमार यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. कंपनी सुरू राहिली पाहिजे, कामगार जगला पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. त्यानुसार, सर्व तयारीनिशी पुढील आठवडय़ात वरिष्ठ पातळीवर संयुक्त बैठक लावण्याचे सूतोवाच त्यांनी केले. पवारांनी पुन्हा लक्ष घातल्याने कामगारांमध्ये समाधान दिसत असून कामगार संघटनेनेही बदललेला राजकीय विचार बाजूला ठेवण्याची मानसिकता ठेवल्याचे दिसून येते.