कांद्याची परिस्थिती सध्या अत्यंत गंभीर असून, अशी स्थिती कधीच नव्हती. नाफेडमार्फत कांदा खरेदी करण्याचा निर्णय झाला असला, तरी राज्य सरकारने त्याबाबत केंद्राकडे प्रस्तावच पाठविला नाही. त्यामुळे राज्य सरकार कांद्याबाबत गंभीर नसल्याचे दिसते आहे, अशा शब्दांत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी टीका केली.

पुण्यात कृषी व पणनविषयक बैठकीनंतर पवारांनी गुरुवारी कांद्याच्या प्रश्नावर भाष्य केले. पवार म्हणाले, की कांद्याबाबत सध्या निर्माण झालेली स्थिती कधीच नव्हती. पंधरा दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या समवेत दिल्लीत बैठक झाली होती. राज्याचे मंत्री सुभाष देशमुख, सदाभाऊ खोत त्या वेळी उपस्थित होते. या बैठकीमध्ये कांद्याची खरेदी नाफेडमार्फत करण्याचा निर्णय झाला होता. त्याबाबत राज्य सरकारने केंद्राकडे प्रस्ताव पाठविणे आवश्यक आहे. मात्र, तसा प्रस्तावच पाठविण्यात आला नाही.

राज्य शासनाकडून याबाबत होणारी दिरंगाई शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त करणारी आहे. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने कांदा खरेदीचा प्रस्ताव पाठवावा किंवा दुसरा काहीतरी पर्याय द्यावा. तसे न झाल्यास परिस्थिती हाताबाहेर जाईल. पाच पैसे किलो भाव मिळालेला कांदा कसा होता, ते मला माहीत नाही. पण, कांद्याला भाव मिळत नाही, ही सद्य:स्थिती आहे.