पौराणिक, सामाजिक, धार्मिक, ऐतिहासिक देखावे सादर करण्याची परंपरा असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा कल आता ज्वलंत सामाजिक विषयावरील देखावे तसेच त्यावर परखड भाष्य करण्याकडे दिसून येत आहे.
शहरात अलीकडे काही वर्षांत भव्य-दिव्य देखाव्ये करण्याची स्पर्धा मंडळांमध्ये आहे. त्यातही जिवंत देखावे आणि ज्वलंत सामाजिक विषयांवर भाष्य करणाऱ्या देखाव्यांमध्ये वाढ होते आहे. भोसरी, फुगेवाडी, चिंचवड, आकुर्डी भागातील मंडळांची प्रबोधनात्मक देखावे सादर करण्यात चढाओढ दिसून येते. विविध संस्था, संघटनांकडून होणाऱ्या सजावट स्पर्धेत याच भागातील मंडळे बक्षिसे घेण्यात आघाडीवर असतात. दिल्लीतील बलात्काराच्या घटनेने देश ढवळून निघाला. याशिवाय, स्त्रीभ्रूण हत्या, महिलांवरील अत्याचार, एकतर्फी प्रेम व अॅसिड हल्ले अशा विषयांवर देखावे करण्याचा कल बहुतांशी मंडळांनी व्यक्त केला आहे.
गेल्या ३५ वर्षांपासून मंडळांसाठी देखावे तयार करणाऱ्या कासारवाडीतील ‘एसकुमार स्टुडिओज’चे संचालक सुनील लांडगे यांनी सांगितले की, पूर्वी मंडळांचा धार्मिक देखाव्यांसाठी आग्रह होता. आता सामाजिक विषयांचे देखावे करण्याचा कल आहे. दिल्लीतील बलात्काराची घटना तसेच महिलांवरील अत्याचार, दारूची नशा, भ्रष्टाचार, अण्णांचे आंदोलन आदी विषयावरील देखाव्यांची विचारणा मंडळे करत आहेत. पुणे, िपपरी-चिंचवडसह पिरंगूट, वडगाव, लोणावळा या भागातील मंडळे आपल्या संपर्कात आहेत. दहीहंडीनंतर गणेशोत्सवाच्या कामांना वेग येईल, असे ते म्हणाले.