सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या क्षेत्रांतील विद्यार्थ्यांव्यतिरिक्त इतरही अनेक जिल्ह्य़ांतील विद्यार्थी येत असतात. विद्यापीठाच्या क्षेत्रात येणाऱ्या दुष्काळी भागांतील विद्यार्थ्यांना शुल्कमाफीची सवलत मिळाली. मात्र मराठवाडा किंवा इतर भागांतून पुण्यात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना शुल्क माफी मिळालेली नाही. त्यामुळे हे विद्यार्थी आता अडचणीत आले आहेत.
दुष्काळी भागांतील विद्यार्थ्यांना शुल्क माफी देण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्य़ातील दुष्काळी गावांची यादीही जाहीर केली. पुणे विद्यापीठाच्या कक्षेत पुणे, नगर, नाशिक हे जिल्हे येतात. या जिल्ह्य़ांतील दुष्काळी भागांतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क आणि परीक्षा शुल्क माफ करण्याच्या सूचना उच्च शिक्षण विभागाने विद्यापीठाला दिल्या. त्यानुसार या जिल्ह्य़ांतील साधारण ६ हजार ९०० विद्यार्थ्यांचे शुल्क विद्यापीठाने माफ केले. मात्र याबाबतचे परिपत्रक काढताना विद्यापीठाच्या क्षेत्रात येणाऱ्या जिल्ह्य़ांव्यतिरिक्त इतर भागांतूनही विद्यार्थी पुणे विद्यापीठात शिक्षणासाठी येतात, याबाबीचा विचारच झाला नाही. त्यामुळे या तीन जिल्ह्य़ांतील विद्यार्थी वगळता इतर भागांतून आलेल्या विद्यार्थ्यांना शुल्क माफी मिळू शकली नाही.
पुणे विद्यापीठांच्या विभागांमध्ये आणि महाविद्यालयांमध्ये मराठवाडय़ातील हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शुल्क माफ न झाल्यामुळे विद्यार्थी अडचणीत आले आहेत. विद्यार्थ्यांची अडचण कळत असूनही त्यांच्या शुल्काच्या प्रतिपूर्ती मिळण्याबाबत खात्री नसल्यामुळे महाविद्यालयेही शुल्क देऊ शकत नाहीत. याबाबत एका विद्यार्थ्यांने सांगितले, ‘मी गेली दोन वर्षे पुण्यात शिकत आहे. माझे मूळ गाव लातूरजवळ आहे. ते गाव दुष्काळी म्हणून जाहीरही झाले आहे. मात्र मी शिक्षणासाठी पुण्यात आलो म्हणून मला शुल्क माफी देण्यात आलेली नाही.’

‘‘विद्यार्थ्यांची अडचण होते आहे, ही खरी गोष्ट आहे. विद्यापीठाच्या क्षेत्रात अनेक बाहेरचे विद्यार्थी आहेत. याबाबत विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रकांनी उच्च शिक्षण संचालकांना माहिती दिली आहे. येत्या चार दिवसांमध्ये सुधारित परिपत्रक येणे अपेक्षित आहे.’’
– डॉ. वासुदेव गाडे, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ