‘मोका’ अंतर्गत गुन्ह्य़ातील फरारी आरोपीकडून वाघाचे कातडे, वाघनखे तसेच दात हस्तगत करण्यात आले. या गोष्टी आरोपी विक्रीसाठी घेऊन आला असताना गुरुवार पेठेतील कृष्णा हट्टी चौक येथे त्याला बुधवारी पोलिसांनी सापळा रचून पकडले. न्यायालयाने त्याला २६ ऑक्टोबपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. आरोपीकडून जप्त करण्यात आलेले कातडे व इतर गोष्टींची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे वीस लाख रुपये असल्याचे वनाधिकाऱ्यांनी सांगितले.
दीपक प्रकाश बोराटे (वय १९, रा. मु. बोराटे वस्ती, मोशी, ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खडक पोलीस ठाण्यातील हवालदार विजय कांबळे यांना आरोपीबाबत माहिती मिळाली होती. तो वाघाचे कातडे विकण्यासाठी येत असल्याचेही कळाले. त्यानुसार वनपरिक्षेत्र अधिकारी महेश पुरुषोत्तम भावसार यांच्यासह पोलिसाच्या पथकाने गुरुवार पेठेतील कृष्णा हट्टी चौक परिसरात सापळा लावून बोराटे याला अटक केली.
बोराटे याच्याकडून ४५ इंच लांब व १९ इंच रुंदीचे वाघाचे कातडे, आठ दात व पाच नखे असलेला वाघाचा पंजा हस्तगत करण्यात आला आहे. त्याच्यावर यापूर्वी शिक्रापूर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल आहे. ‘मोका’चाही त्यात समावेश आहे. या गुन्ह्य़ामध्ये तो फरार होता. आरोपीने वाघाचे कातडे कुठून आणले, वाघाची शिकार कुठे केली, त्याचे आणखी साथीदार आहेत का, याबाबतच्या तपासासाठी त्याला पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
अप्पर पोलीस आयुक्त (दक्षिण विभाग) चंद्रशेखर दैठणकर, पोलीस उपायुक्त एम. बी. तांबडे, सहायक पोलीस आयुक्त जगदिश लोहाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शशिकांत चव्हाण, निरीक्षक सुनील दोरगे, उपनिरीक्षक संजय गायकवाड, सहायक फौजदार सुरेश गेंगजे, हवालदार सुरेश सोनवणे, एकनाथ कंधारे, महेंद्र पवार, दिलीप शिंदे, संतोष मते, विजय घिसरे, शरद झांजरे यांनी ही कामगिरी केली.