लाडक्या विठूरायाच्या दर्शनाची आस लागलेल्या हजारो वारकऱ्यांसह जगदगुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीने सोमवारी दुपारी देहूतून पंढरपूरसाठी प्रस्थान ठेवले. ज्ञानोबा-तुकोबाचा अखंड गजर आणि भक्तीच्या महासागराने संपूर्ण देहूनगरी न्हाऊन निघाली होती. देऊळवाड्याला प्रदक्षिणा घातल्यावर पालखीचा मुक्काम आज इनामदार वाड्यात असणार आहे.
राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे हे प्रस्थान सोहळ्यासाठी मंदिरात उपस्थित होते. दुपारी अडीचच्या सुमारास पालखी प्रस्थान सोहळ्याला सुरुवात झाली. वारकऱ्यांच्या हस्ते पादुकापूजन झाल्यानंतर दिंडीप्रमुख, मानकरी, सेवेकरी यांचा सत्कार करण्यात आला. यंदा ह.भ.प. सुनील दामोदर मोरे हे पालखी सोहळ्याचे प्रमुख असणार आहेत.
प्रस्थानाच्या कार्यक्रमासाठी हजारो वारकऱ्यांनी सकाळपासूनच देहूतील मंदिरात गर्दी केली होती. देऊळवाड्यामध्ये टाळ-मृदंगाच्या गजरात हरिनामाचा अखंड जप सुरू होता. दरवर्षीप्रमाणे वारकऱ्यांनी यावेळी विविध खेळही करून दाखवले. यावेळी तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यामध्ये ३२९ दिंड्या आहेत. प्रस्थान सोहळ्यावेळी मंदिर परिसरात कडेकोट सुरक्षा ठेवण्यात आली होती.