विविध प्रभागांमधून तब्बल ९०९ हरकती व सूचना; अंतिम यादी शनिवारी प्रसिद्ध होणार

महापालिका प्रशासनाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीतील नावांबाबतच्या तब्बल ९०९ हरकती आणि सूचना महापालिकेच्या निवडणूक शाखेकडे आल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदारांची अंतिम यादी शनिवारी (२१ जानेवारी) प्रसिद्ध करावी लागणार असल्यामुळे प्रारूप मतदार यादी दुरुस्त करण्यासाठी प्रशासनाला अवघे दोन ते तीन दिवसच मिळणार आहेत. यातील सर्वाधिक हरकती या धनकवडी क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत असलेल्या प्रभाग क्रमांक ३८, ३९ आणि ४० मध्ये असल्याची माहिती निवडणूक शाखेकडून देण्यात आली.

महापालिकेच्या येत्या २१ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठीची मतदार यादी तयार करण्याच्या हालचाली प्रशासकीय पातळीवर सुरू झाल्या होत्या. त्याअंतर्गत २१ डिसेंबर रोजी पहिली मतदार यादी ऑनलाईन पद्धतीने प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यावर दीडशे हरकती नोंदविण्यात आल्या होत्या. त्यानंतर पाच जानेवारी रोजी प्रभागनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. ही यादी मतदारांसाठी प्रसिद्ध करतानाच त्यावर हरकती-सूचना मागविण्यात आल्या. त्यासाठी बारा जानेवारी ते सतरा जानेवारी अशी मुदत देण्यात आली होती. ही मुदत मंगळवारी संपुष्टात आली. त्यामध्ये ४१ प्रभागातून ९०९ हरकती प्रशासनाकडे आल्याची माहिती निवडणूक शाखेकडून देण्यात आली. हरकतींवर सुनावणी घेऊन त्यानंतर २१ जानेवारी रोजी अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात येणार आहे. दरम्यान, निवडणुकीसाठी २६ लाख ४६ हजार मतदारांची नोंदणी झाल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात आले. मतदारांच्या मूळ यादीमध्ये २४ लाख ८८ हजार एवढी संख्या होती. त्यानंतर नवमतदार आणि अन्य मतदार अशा एकूण १ लाख ५८ हजार मतदारांचा या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे.

तीन दिवसांत दुरुस्ती करण्याचे आव्हान

पदनिर्देशित अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत हरकतींवरील सुनावणी होणार आहे. त्यासाठी क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत सहायक पदनिर्देशित अधिकाऱ्यांची नियुक्तीही करण्यात आली आहे. त्यांना मदत करण्यासाठी एक हजार प्रगणकांचीही नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या मदतीने हरकती ऐकून, प्रत्यक्ष जागेवर जाऊन त्याची खातरजमा करण्यात येणार आहे. त्यानंतरच अंतिम यादी जाहीर होणार आहे. मात्र कमी कालावधीमध्ये मतदार याद्यांमध्ये दुरुस्ती करण्याचे आव्हान प्रशासनापुढे असणार आहे.

पिंपरीत ७७२ नागरिकांच्या हरकती

पिंपरी महापालिकेच्या वतीने मतदार यादी संदर्भात हरकती मागवण्यात आल्या असता, निर्धारित मुदतीत ७७२ हरकती प्राप्त झाल्या आहेत, अशी माहिती निवडणूक विभागाचे सहायक आयुक्त डॉ. यशवंत माने यांनी पत्रकारांना दिली. िपपरी महापालिकेच्या निवडणुका २१ फेब्रुवारीला होणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार निवडणुकीसाठी मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर त्यावर हरकती मागवण्यात आल्या होत्या. त्यासाठी देण्यात आलेल्या मुदतीत ७७२ नागरिकांच्या हरकती महापालिकेला प्राप्त झाल्या आहेत, असे माने यांनी सांगितले.

सर्वाधिक हरकती ३८, ३९, ४० प्रभागात

शहरातील ४१ प्रभागांपैकी सर्वाधिक हरकती प्रभाग क्रमांक ३८, ३९ आणि ४० मधून आल्या आहेत. तर सर्वात कमी हरकती या येरवडा क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत प्रभाग क्रमांक एक आणि दोन आणि सहा मध्ये असल्याची माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली.