जास्तीतजास्त मतदारांनी मतदान करावे, यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने नोव्हेंबरपासून मतदार जनजागृतीचे कार्यक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. पथनाटय़, फ्लेक्स, टोलनाक्यांसारख्या सार्वजनिक ठिकाणी फलक, एलईडी रथ, खासगी कंपन्यांचा सहभाग घेऊन जनजागृती अशाप्रकारे मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कलाकार तसेच महापालिकेचे कर्मचारी मतदारांकडे जाऊन जागृती करीत आहेत. डिजिटल साधने आणि समाजमाध्यमांचा वापर करून शहरातील प्रत्येक गल्लीतील मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी जागृत केले जात असल्यामुळे साडेबारा लाख लोकांपर्यंत पोहोचल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणूक विभागाने गेल्या दोन महिन्यांपासून जनजागृतीला सुरुवात केली आहे. डिसेंबर महिन्यात २५ डिसेंबर रोजी नाताळच्या निमित्ताने तसेच १ जानेवारी रोजी नववर्षांनिमित्त मतदारांना शुभेच्छा देण्यासाठी लावण्यात आलेल्या शुभेच्छा फलकांवरही मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले होते. तसेच मतदानाचे आवाहन करणारी पाच हजार पत्रके पाणीबिलांबरोबर पाठवण्यात आली आहेत. पथनाटय़ाच्या माध्यमातून कलाकारांमार्फत मतदानाचे महत्त्व मतदारांना समजावून देण्यात आले. तसेच सहकार विभागाच्या सहकार्याने सहकारी सोसायटय़ांमध्ये तीन हजार फलक लावण्यात आले आहेत. महाविद्यालये, चित्रपटगृह, शहरातील सर्व सायन्स पार्क, ऑटोक्लस्टर आदी ठिकाणी जाऊन मतदार जागृती करण्यात आली.

शहरातील सर्व १७० उद्यानांमध्ये जाऊन मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. बँकांच्या एटीएमवर आवाहनाचे स्टिकर्स लावण्यात आले आहेत. तसेच गॅस एजन्सीच्या माध्यमातून गॅस वितरण करणाऱ्यांमार्फत गॅस सिलिंडरवर मतदान जागृती करणारे स्टिकर्स लावण्यात आले आहेत. तसेच एलईडीच्या माध्यमातून चित्रफीत दाखवून मतदारांना मतदानाचे आवाहन करण्यात येत आहे. लोकशाहीर संभाजी भगत यांनी तयार केलेल्या गीतांच्या माध्यमातून मतदानाचे आवाहन करण्यात आले आहे. या विविध माध्यमांतून शहरातील सुमारे १२ लाख मतदारांपर्यंत पोहोचल्याचा दावा महापालिकेने केला आहे. शहरात १२ लाख ५० हजार मतदार आहेत. विविध क्षेत्रांतील नामवंतांच्या मतदानाचे आवाहन करणाऱ्या चित्रफिती तयार करण्याचे काम सुरू असून, त्या माध्यमातूनही जागृती करण्यात येणार आहे. विविध उद्यानांमध्ये सकाळी उद्यानामध्ये फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची भेट घेऊन तेथेही जागृती केली जाणार आहे. ही मोहीम २० फेब्रुवारीपर्यंत सुरू राहील.