सहा महिन्यांत राज्यातील ३० टक्के शाळा प्रगत करण्याच्या सूचना

राज्यातील साधारण ३० टक्के शाळा एप्रिल, २०१७ पर्यंत ‘प्रगत’ करा अशी सूचना शिक्षण विभागाकडून शिक्षणाधिकारी आणि शाळांना देण्यात आली आहे. त्यामुळे पहिल्या सत्रात जमले नाही, ते अवघ्या चार महिन्यांत करून दाखवण्याची किमया शाळांना साधावी लागणार आहे. दरम्यान, आतापर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना शासकीय व्याख्येनुसार प्रगत होण्यासाठी धडपड करावी लागत होती. मात्र, आता ‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’ ही योजना सर्व माध्यमांच्या आणि खासगी शाळांसाठीही लागू होणार आहे. त्यामुळे आता एप्रिलअखेपर्यंत खासगी शाळांनाही शासनाच्या ‘प्रगत’ या व्याख्येनुसार स्वत:ला सिद्ध करावे लागणार आहे.

राज्याने ‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’ हा कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार एप्रिल, २०१७ पर्यंत राज्यातील ५० टक्के प्राथमिक शाळा (पहिली ते पाचवी) आणि २५ टक्के उच्च प्राथमिक शाळा (सहावी ते आठवी) ‘प्रगत’ करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या योजनेचा ऑक्टोबर अखेपर्यंतचा आढावा शिक्षण विभागाने घेतला. त्यानुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांपैकी साधारण २० टक्के शाळांनीच उद्दिष्ट पूर्ण केल्याचे दिसत आहे. राज्यातील २०.९३ टक्के प्राथमिक शाळा आणि १८.७४ टक्के उच्च प्राथमिक शाळा प्रगत असल्याचा दावा शिक्षण विभागाकडून करण्यात येत आहे. त्यानुसार आता एप्रिलअखेपर्यंत शाळांना राहिलेली उद्दिष्टपूर्ती करावी लागेल.

विशेष म्हणजे अधिक सुविधा असणाऱ्या पुणे, मुंबईला मागे टाकून सोलापूर, गोंदिया, नगर, भंडारा या जिल्ह्य़ांनी ‘प्रगत’ शाळांचे ठरवलेले उद्दिष्ट गाठले आहे. सोलापूर आणि भंडारा जिल्ह्य़ात ५० टक्क्य़ांपेक्षा अधिक शाळा प्रगत आहेत, तर सोलापूर, नगर, गोंदिया या जिल्ह्य़ांमध्ये २५ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक उच्च माध्यमिक शाळा प्रगत आहेत, असे शिक्षण विभागाचे म्हणणे आहे. प्रयोगशील शिक्षण देणाऱ्या शाळा ज्या सातारा जिल्ह्य़ात अधिक असल्याचा बोलबाला शिक्षण विभागाकडून करण्यात आला होता. त्या जिल्ह्य़ातही २० टक्क्य़ांपेक्षा कमी शाळा ‘प्रगत’ असल्याचे आता शिक्षण विभागच म्हणत आहे. नंदूरबार, सिंधुदुर्ग, नांदेड, गडचिरोली, नाशिक, मुंबई उपनगर, बृहन्मुंबई या ठिकाणी प्रगत प्राथमिक शाळांचे प्रमाण हे १० टक्क्य़ांपेक्षाही कमी आहे. उस्मानाबाद, औरंगाबाद, ठाणे, नंदूरबार, रत्नागिरी, बृहन्मुंबई या जिल्ह्य़ांत १० टक्क्य़ांपेक्षा कमी  प्रगत उच्च प्राथमिक शाळा आहेत.

प्रगत शाळा म्हणजे काय?

शिक्षण विभागाने ठरवून दिलेल्या २५ निकषांनुसार देण्यात येणाऱ्या गुणांपैकी ८० गुण मिळवणारी आणि शिक्षण विभागाकडून घेण्यात येणाऱ्या मूल्यमापन चाचणीत (नैदानिक चाचणी) ज्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना किमान ६० गुण मिळाले आहेत अशी शाळा ‘प्रगत’ समजण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांची उपस्थिती, शाळेची स्वच्छता, ज्ञानरचनावादी साहित्य उपलब्ध असणे, मुलांना शब्द दिल्यावर त्यापासून कविता करता येणे यांसारखे २५ निकष निश्चित करण्यात आले आहेत.