नामदेव चंद्रकांत कांबळे यांचा ‘बळी’ हा कथासंग्रह समाजव्यवस्थेवर कोरडे ओढणारा आहे. या कथासंग्रहातील विविध कथांच्या माध्यमातून आर्थिक, मानसिक, नैतिक आणि वैचारिक कोंडीत सापडलेल्या आणि या कोंडीवर मात केलेल्या व्यक्तींचे चित्रण करण्यात आले आहे. रोजच्या जगण्यातल्या समस्या आणि त्यांचा दैनंदिन जीवनावर होणारा परिणाम लेखकाने अधोरेखित केला आहे.
१९९४ ते १९९७ या काळात काही दिवाळी अंकांमधून या कथा प्रकाशित झालेल्या आहेत. समाजव्यवस्था आणि राजकीय व्यवस्था अनेकांचे बळी घेतात. फरक असला तर एवढाच असतो, की काही स्वेच्छेने बळी जातात, काहींना अनिच्छेने बळी जावे लागते. अशाच काही बळींच्या कथा लेखकाने या पुस्तकात दिल्या आहेत. ‘बाईमाणूस’ ही केवळाची कथा आहे. केवळाच्या पतीला टीबी झाल्याचे निदान झाल्यावर त्याच्यावर उपचार करण्यासाठी केवळाला करावा लागणारा संघर्ष या कथेत मांडला आहे. पतीला उपचारासाठी दवाखान्यात दाखल केल्यावर घरी परतताना ओढवलेल्या अतिप्रसंगाचा केवळाने धैर्याने सामना केला. ‘नाते’ या कथेत स्त्री-पुरुष यांच्याकडे समाज कोणत्या नजरेतून पाहतो, याचे विदारक वास्तव मांडण्यात आलेले आहे. भाऊ-बहीण, मित्र-मैत्रीण या नात्यांचा समाजाला पडलेला विसर चपखलपणे टिपला आहे. त्यामुळे मनोरमा या शिक्षिकेची समाजात वेळोवेळी कुचंबणा होत असते. शेवटी एका डॉक्टरशी तिने जोडलेले भावाचे नाते समाजाला चोख प्रत्युत्तर देणारे ठरते.
स्वत:ची सामाजिक कार्यकर्ते अशी प्रतिमा निर्माण करून हे कथित समाजसेवक लोकांची कशी लूट करतात आणि त्यामुळे भागासारख्या वयस्कर व्यक्तीवर भीक मागण्याची वेळ येते हे ‘ओढ’ या कथेतून स्पष्ट होते. पुरामुळे नातू आणि नातसून यांचे प्राण गेल्यावर भागाला सरकारी मदतीपासून वंचित ठेवण्यात येते आणि तो सरकारी व्यवस्थेचा बळी ठरतो. मात्र, अखेर गावचे पाटील त्याला पुन्हा गावाकडे घेऊन जातात.
गावामध्ये आजही शिक्षणव्यवस्था कशी आहे, शाळेत विद्यार्थी येतात का, शिक्षकांवरती काय बंधने आहेत, शिक्षणाबाबत समाजाची मानसिकता काय आहे याबरोबरच इतरही असंख्य मुद्दय़ांचा ‘आशेचा किरण’ या कथेत विचार करण्यात आला आहे. पटसंख्या कमी असल्यामुळे गावातील शिक्षकांना नेहमीच नोकरी गमावण्याची भीती वाटत असते. वसंता या शिक्षकाला चौथी पास मुलांचे दाखले मिळविण्यासाठी आमदाराच्या घरापासून शैक्षणिक अधिकाऱ्यांपर्यंत सर्वाकडे खेटे घालावे लागतात. नोकरी वाचविण्याची चिंता आणि त्यावर त्याला उमगलेला उपाय म्हणजेच आशेचा किरण.
‘निर्धार’ या कथेत दारूमुळे कुटुंबाची कशा प्रकारे होरपळ होते हे अचूकपणे अतिशय बारकाव्यांसह टिपलेले आहे. घरात रोज दारू पिऊन येणारा सुरेश पत्नीसह मुलांनाही मारहाण करत असतो. त्यामुळे शारदा घर सोडून निघून जाते. परत घरी येते तो सुरेशची दारू बंद करण्याच्या निर्धारासह. त्यानंतर स्वत:च दारू पीत असल्याची बतावणी करून ती सुरेशची व्यसन दूर करून कुटुंबाचे रक्षण करते.
भानुदास पोलीसात भरती झाल्यापासून एस.पी. साहेबाच्या बंगल्यावर घरकाम करायचा. त्यानंतर त्याची बदली डी.वाय.एस.पी. साहेबांकडे झाली. पण मोठय़ा साहेबांकडे पोलीस पोशाखात घरकाम करणे भानुदासला रुचत नव्हते. अखेर त्याला वाहतूक पोलीस म्हणून काम करण्याची संधी मिळाली. मात्र, ते करत असताना साहेबाने मागेल तितके पैसे देणे भानुदासला अशक्य होते. कारण त्यासाठी ट्रक, टेम्पोचालकांची लूट करणे त्याला पटणारे नव्हते. बदली वाचविण्यासाठी डी.वाय.एस.पी. साहेबाने मंत्रालयात तीन लाख रुपये भरले होते. आणि हे पैसे त्याला जमादारांकडून (वाहतूक पोलीस) वसूल करायचे होते. मात्र, असे पैसे जमविताना एका ट्रकचा पाठलाग करण्यास गेलेल्या भानुदासला अपघातात प्राण गमवावे लागतात. प्रशासकीय आणि राजकीय यंत्रणेचाच भानुदास बळी ठरला. ‘निमित्त’ या कथेत दंगलींमुळे समाजावर आणि सामाजिक बांधिलकीवर कशा प्रकारे आघात होतात यावर बोट ठेवण्यात आले आहे. दंगलींच्या नावाखाली दुकाने, घरे लुटणारा जमाव हा हिंस्त्र पशूसारखा चालून येतो. तो कुठल्याही जात, पंथ, धर्माचा नसतो. मोलमजुरी करून पोट भरणाऱ्या रानूला या दंगलींमुळे दोन वेळा झोपडी गमवावी लागते. बाबरी मशीद पाडल्यावर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यावर रानूचे घर समाजकंटकांकडून जाळले जाते. मात्र, त्यामुळे त्याचा संसार उद्ध्वस्त झाला तरी स्वत:चे कुटुंब वाचविण्यात तो यशस्वी ठरतो.
‘मृगजळ’ या कथेत मोलमजुरी करणारी रेखा पतीच्या आग्रहामुळे पंचायत समितीची निवडणूक लढविते आणि सभापतीपदी निवडून येते. मात्र, पतीने दुसऱ्या अधिकाऱ्यासह केलेला भ्रष्टाचार रेखाला स्वस्थ राहू देत नाही. गावात विविध सुविधा आणण्यासाठी रेखाचा प्रयत्न असतो. व्यसनी आणि कामचुकार पती विजयमुळे रेखाचा संसार म्हणजे रोजचे मरणच होते. ‘कोंडी’ ही कथा आरक्षणावरती भाष्य करणारी आहे.
पुस्तकाचे नाव – बळी, लेखक – नामदेव कांबळे, पृष्ठे – १६०, किंमत – १५० रुपये.
उमेश जाधव – response.lokprabha@expressindia.com