प्रवीण तोगाडिया वा तत्समांची कर्कश धर्माधता ज्याप्रमाणे आणि जितकी धोकादायक होती वा आहे त्याचप्रमाणे आणि तितकीच मदानी यांची मुस्लीमलिगी वा चर्चची धर्मातरकेंद्रित धर्माधता धोकादायक होती आणि आहे हे काँग्रेसने कधीही जाणले नाही.. त्या संदर्भात अँटनी जे बोलले, ते अभिनंदनीय ठरते.
निवडणूकपूर्व वातावरणाचा कानोसा घेण्यासाठी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मुंबईत काही निवडक पत्रकारांशी चर्चा करताना काँग्रेसच्या निधर्मीवादाचा उद्घोष करीत आमचा पक्ष कदापिही हिंदू धर्मवाद्यांशी हातमिळवणी करणार नाही असे विधान केले होते. त्यावर मुस्लीम लीगसारखा पक्ष आपणास कोणत्या दृष्टिकोनातून निधर्मी वाटतो, असे आम्ही विचारता त्यावर त्या वेळी उत्तर देणे राहुल गांधी यांनी टाळले. आज हाच प्रश्न काँग्रेसचे गांधीघराणेतर असूनही आदरणीय असलेले नेते ए के अँटनी यांनी जाहीरपणे विचारला आहे. आपल्या सदोष निधर्मीवादामुळे काँग्रेस हा पक्ष काही विशिष्ट अल्पसंख्याकांनाच जवळचा वाटतो, परिणामी बहुसंख्याक मोठय़ा प्रमाणावर आपल्यापासून दूर गेले आहेत, अशा प्रकारची कबुली अँटनी यांनी दिली आहे. ती खरी आहे. अँटनी यांना असे म्हणावेसे वाटले याचे मूळ काँग्रेसच्या निधर्मीवादाच्या विकृतीकरणात आहे. भारतासारख्या अठरापगड जातिधर्माच्या देशात बहुसंख्याकांकडून आपल्या आकाराच्या जोरावर अल्पसंख्याकांवर अन्याय होण्याची शक्यता असते, याबाबत कोणाचेही दुमत असणार नाही. अशा वेळी कल्याणकारी राज्याच्या व्याख्येत अल्पसंख्याकांवर अन्याय होणार नाही, अशी व्यवस्था निर्माण करणे आवश्यकच असते. परंतु याबाबत काँग्रेसचा सदसद्विवेकाचा मुदलातच अशक्त असलेला लंबक एकदम दुसऱ्या टोकास गेला. अल्पसंख्याकांना जवळ करणे याचा सोयीस्कर अर्थ काँग्रेसने बहुसंख्याकांचा दुस्वास करणे वा त्यांना नाकारणे असा घेतला. या सोयीच्या राजकारणामुळे अल्पसंख्याकांचेही भले झाले नाही आणि बहुसंख्याकांचे ते होणारच नव्हते. परिणामी दोन्हीही घटक काँग्रेस गमावून बसला. अल्पसंख्याकांचे लालनपालन केल्यामुळे ते आपल्यामागे एकगठ्ठा उभे राहतील आणि त्यामुळे बहुसंख्याकांची फिकीर करण्याचे काहीच कारण नाही, असे काँग्रेसजनांना वाटू लागले. त्यातून तयार झाले ते लांगूलचालनाचे राजकारण. ते इतक्या थरास गेले की बहुसंख्याकांना आपण बहुसंख्य आहोत म्हणजे आपण काही पाप केले आहे असेच वाटू लागले. धर्म आणि/वा जात या मुद्दय़ावर अल्पसंख्याकांच्या समूह गौरवगायनात जे आपल्यासमवेत नाहीत त्या सर्वास हिंदू अतिरेकी ठरवण्यापर्यंत काँग्रेसची मजल गेली. काँग्रेसच्या या पापास हातभार लावला तो माध्यमांतील अर्धवटरावांनी. हिंदू बहुसंख्याकांसाठी काही करणे हे बौद्धिकदृष्टय़ा अधम आणि प्रतिगामी आहे. याउलट, अल्पसंख्याकांसाठी काही करणे आणि त्याहीपेक्षा काही केल्यासारखे दाखवणे म्हणजेच पुरोगामित्व, अशी कमालीची निर्बुद्ध मांडणी या माध्यमांतील अर्धवटरावांनी केली आणि काँग्रेस त्यात उत्तरोत्तर फसत गेली. हे असे करणे ही माध्यमांची लबाडी होती. या अशा अर्धवट आणि सुमार माध्यमवीरांचा डोळा परदेशांकडे होता आणि ताजा बाटलेला ज्याप्रमाणे अधिक उंच बांग देतो तसे त्यांचे वागणे होते. या मातीशी, भारत नावाच्या प्रेरणेशी काहीही देणेघेणे नसलेले हे माध्यमांतील अर्धवटराव हे सर्वार्थाने निवासी अभारतीय आहेत. हे काँग्रेसला कधीही कळले नाही. तसे वागण्यात या अर्धवटरावांचा स्वार्थ होता आणि केवळ राजकीय स्वार्थाने भारल्या गेलेल्या काँग्रेसकडून माध्यमांच्या स्वार्थाकडे सातत्याने कानाडोळा होत गेला. त्यामुळे प्रवीण तोगाडिया वा तत्समांची कर्कश धर्माधता ज्याप्रमाणे आणि जितकी धोकादायक होती वा आहे त्याचप्रमाणे आणि तितकीच मदानी यांची मुस्लीमलिगी वा चर्चची धर्मातरकेंद्रित धर्माधता धोकादायक होती आणि आहे हे काँग्रेसने कधीही जाणले नाही. या पापाचे जनकत्व नि:संशयपणे काँग्रेसकडेच जाते. त्याचमुळे शहाबानो प्रकरणात पुरोगामी राजीव गांधी यांनी अश्लाघ्यपणे कायदा वाकवला नसता तर अयोध्येतील राम मंदिराचे दरवाजे उघडण्याची प्रतिगामी वेळ त्यांच्यावर आली नसती. हे कटुकठोर वास्तव आहे. ते काँग्रेसने जाणले असते तर ज्याप्रमाणे रामसेनेसारख्या वेडपट माथेफिरूंशी जशी सत्तेसाठी हातमिळवणी करणार नाही त्याचप्रमाणे मुस्लीम लीगसारख्यांशीही आघाडी करणार नाही, इतकी नि:संदिग्धता काँग्रेसच्या राजकारणात आली असती. तशी ती असती तर काँग्रेसवर विश्वार्साहता गमावण्याची वेळ आली नसती. अँटनी यांच्यासारख्या निरलस नेत्याने नेमके त्यावर बोट ठेवले आहे. संरक्षणमंत्री म्हणून अँटनी यांची कामगिरी सुमारच होती आणि त्या वेळी आम्ही त्यांच्यावर टीकेचे आसूडही ओढले होते. परंतु राजकारणी म्हणून ते सेंट अँथनी आहेत. इतकी वर्षे सत्तेच्या राजकारणात राहूनही अँटनी यांच्यावर भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही, ही बाब निश्चितच कौतुकास्पद म्हणावी अशी. या मुद्दय़ावर मनमोहन सिंग यांच्याशी स्पर्धा व्हावी असा त्यांचा लौकिक आहे. सतत अल्पसंख्याकवादी राजकारण हे काँग्रेसच्या मुळावर उठत असून बहुसंख्याकांना हा पक्ष आता आपला वाटत नाही इतके स्पष्ट मत अँटनी यांनी नोंदवले असून मुस्लीम लीगने काँग्रेसच्या या मानसिकतेचा कसा गैरफायदा घेतला ते सांगण्यासही ते कचरलेले नाहीत. या निर्भीडपणाबद्दल ते अभिनंदनास पात्र ठरतात.
या आदरास दिग्विजय सिंग पात्र नसले तरी त्यांचेही विधान दखल घ्यावे असे आहे. राहुल गांधी यांची मानसिकता सत्ताकारणास योग्य नाही असे प्रांजळ मत दिग्विजय सिंग यांनी व्यक्त केले आहे. दिग्विजय सिंग हे अलीकडेपर्यंत काँग्रेसमध्ये राहुल गांधी यांचे गुरू मानले जात. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्रिपद दोन वेळा भूषविलेल्या, दिल्लीच्या राजकारणात आणि माध्यमांच्या लबाड जालात परस्पर सोयीस्कर ऊठबस असलेल्या या नेत्याचे बोट धरून राहुल गांधी यांनी आपल्या राजकारणाचा प्रारंभ केला. वस्तुत: ते काँग्रेसच्या श्रेष्ठींपैकी नाहीत. तरीही त्यांच्या मतास वजन होते. याचे कारण राहुल गांधींशी त्यांची असलेली जवळीक. सोनिया गांधी यांच्या चरणी निष्ठा वाहिलेले जुनेजाणते काँग्रेसजन आणि राहुलच्या नवथरपणाचा पारा पकडू पाहणारे नवकाँग्रेसजन यांच्या तागडीतील बरोबर मध्यबिंदूवर दिग्विजय सिंग यांचे स्थान आहे. त्यामुळे नवेजुने काँग्रेसजन त्यांना वचकून असतात. त्यांचे राहुल गांधी यांच्या संदर्भातील ताजे विधान दखलपात्र ठरते ते या पाश्र्वभूमीवर. सत्तेचे सर्व गुलगुलीत फायदे घेत विरोधी अवकाशाचे केंद्रदेखील बळकावण्याचा राहुल यांचा प्रयत्न आतापर्यंत अनेकदा उघड झाला. मग ते त्यांचे सत्ता हे विष आहे हे विधान असो वा काँग्रेसची पक्षीय पुनर्रचना करण्याचा त्यांचा प्रयत्न असो. राहुल गांधी हे नेहमीच सत्ताधारी विरोधीपक्षीय राहू पाहत होते. असे केल्याने सत्ताधाऱ्यांची पापे अंगास चिकटत नाहीत आणि विरोधकांच्या पुण्याईवरही हात मारता येतो. राहुल गांधी तेच करीत गेले. त्याचमुळे स्वपक्षीय पंतप्रधान मनमोहन सिंग वा पृथ्वीराज चव्हाण यांचा जाहीर पाणउतारा करण्याचा अगोचरपणा त्यांनी केला. सत्ताधारीपणाची सर्व सुखे ओरपून ‘मी नाही बुवा त्यातला..’ असा विरोधी पक्षनेत्याचा आव आणण्याचे त्यांचे राजकारण अगदीच बालिश होते. दिग्विजय सिंग यांच्यासारख्या काँग्रेसजनांना ते आता तरी जाणवू लागले, ते बरे झाले. यातील हास्यास्पद विरोधाभास हा की सत्ताधाऱ्यांतील विरोधीपक्षीय असलेल्या राहुल गांधी यांचे हातपाय खरोखरच विरोधी पक्षात राहण्याची वेळ आल्यावर मात्र नेतृत्व करताना गळपटताना दिसतात. आता ते सत्ताधारी असल्यासारखे वागू पाहतील, असे दिसते.
काहीही असो. काँग्रेसजनांना या जाणिवा होऊ लागल्या हे महत्त्वाचे. जय पराजय हे व्याधींसारखे असतात. ते होतातच. अशा वेळी वेळच्या वेळी औषधाच्या मात्रा घेणे गरजेचे. त्या घेऊनही औषधाचा गुण न आल्यास प्रसंगी वैद्यही बदलावा लागतो. तेथे बोटचेपेपणा करणे जिवावर बेतते. समर्थ रामदासांनी म्हटल्याप्रमाणे-
वैद्याची प्रचीती येईना । आणि भीडही उलघेना ।
तरी मग रोगी वाचेना । ऐसें जाणावे ॥