आपल्याकडे कोठल्याही राजकीय पक्षाचे कधी ना कधी काँग्रेसीकरण होतच असते! एकीकडे भाजपही त्याच वाटेवर जात असताना नवनवोन्मेषशाली ‘आप’लाही त्या वाटेची इतक्यातच भुरळ पडणे दुर्दैवी म्हणावे लागेल. अर्थात, याला केजरीवाल यांची महत्त्वाकांक्षा व हेकेखोरपणा कारणीभूत आहे.

आम आदमी पक्ष चळवळीतून जन्मला म्हणून त्याचे सामान्यजनांना कौतुक वाटत होते. अशी रणधुमाळी समाज स्वीकारत असतो. काही काळ त्यातून करमणूक होते. त्यातही भारतीय मध्यमवर्गाला त्यांचा वीज, पाणी, भ्रष्टाचाराविरोधातला आवाज कुणी तरी बुलंद करणारा हवा असतो. अरविंद केजरीवाल याच मध्यमवर्गाचे नेते म्हणून दिल्ली विधानसभा निवडणुकीत सर्वमान्य झाले. पण राजकारण नेहमी महत्त्वाकांक्षा व क्षमतांवर अवलंबून असते. सध्याच्या राजकीय परिस्थितीत एकही विरोधी पक्ष प्रभावी नसल्याने कमी क्षमतांच्या आधारावर आम आदमी पक्ष दिल्लीत स्थिरावला. त्यामुळे केजरीवाल यांची महत्त्वाकांक्षा वाढली आहे. आम आदमी पक्ष आपली ‘प्रायव्हेट प्रॉपर्टी’ आहे व त्यावर पहिला आपला हक्क असावा, या महत्त्वाकांक्षेपोटी केजरीवाल यांनी आपल्याच सहकाऱ्यांची पक्षातून गच्छंती केली. एखाद्या पक्षातून कुणाची तरी उचलबांगडी, गच्छंती वा हकालपट्टी(!) ही एक नियमित प्रक्रिया आहे. मग आम आदमी पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीतून (पीएसी) प्रा. योगेंद्र यादव व प्रशांत भूषण यांना वगळण्याच्या निर्णयाची एवढी चर्चा का? याचे उत्तर आम आदमी पक्षाच्या भंपक दाव्यांमध्ये आहे. आम्ही वेगळे, आमची भूमिका वेगळी, आमची धारणा वेगळी, आमच्याकडे लोकशाही वगैरै.. अशा भंपक बाता मारणाऱ्या आम आदमी पक्षातील सर्वच नेत्यांनी अरविंद केजरीवाल यांची पाद्यपूजा आरंभली आहे. लोकशाही म्हणतात ती हीच का? प्रा. यादव, प्रशांत भूषण असू द्या अथवा अन्य कुणीही; ज्याप्रमाणे त्यांना आम आदमी पक्षाच्या सामान्य नेत्या-कार्यकर्त्यांमध्ये ‘व्हीलन’ ठरवून त्यांचे प्रतिमाहनन अरविंद केजरीवाल समर्थकांनी चालवले आहे; त्यावरून तरी हा पक्ष काँग्रेस-भाजपपेक्षा वेगळा नाही. प्रा. यादव व प्रशांत भूषण यांना विरोध करण्यामागे भूमिकेपेक्षा अन्य कारणे महत्त्वाची आहेत. यास जशी अरविंद केजरीवाल यांची वाढलेली महत्त्वाकांक्षा कारणीभूत आहे; तशीच राष्ट्रीय राजकारणातील जातीय समीकरणांची अपरिहार्य किनार आहे.
बहुसंख्य उत्तर भारतीय मतदारांना ‘आपला’ वाटणारा नेता हवा असतो. त्यात गुणवत्तेपेक्षा जास्त महत्त्व असते ते त्या नेत्याच्या सामाजिक पाश्र्वभूमीला. प्रत्येक पक्षात हीच परिस्थिती आहे. अण्णा हजारे यांच्या आंदोलनांचा विचार केल्यास हा तर्क पटू शकतो. अण्णांचे आंदोलन दशावतारी असते. म्हणजे प्रत्येक आंदोलनादरम्यान एक अवतार प्रकटतो. काही ठिकाणी हा अवतार मध्यस्थ असतो! त्याचे ‘चिंतन’ केल्यास कुणाची ‘इमेज’ कशी तयार होते, हे वेगळे सांगायला नको! ‘जंतर-मंतर’वर प्रकटलेल्या अरविंद केजरीवाल यांचा स्वतंत्र संप्रदाय निर्माण झाला. हिंदूी पट्टय़ात अरविंद यांचे केजरीवाल असणे, हेही महत्त्वाचे ठरले. हा संप्रदाय सांभाळण्याचे कसब केजरीवाल यांच्याकडे होते. मात्र राजकीय पक्ष सांभाळणे ही एक तारेवरची कसरत असते. तिथे लहरीपणा कामाचा नाही. म्हणजे अण्णा हजारे यांनी ‘लोकपाल’साठी आंदोलन राळेगणसिद्धीत करायचे की आळंदीमध्ये यावर चर्चा करताना दिल्लीचे स्थानमाहात्म्य पटवून देताना सर्व जण सहमत होत नाहीत म्हणून बैठकीतून उठून जाण्याचा बालिशपणा राजकीय बैठकीत परवडत नाही. केजरीवाल यांच्या याच स्थायी(!) गुणदोषांवर पक्षातल्या अनेकांनी बोट ठेवले. त्यांच्याविरोधात केजरीवाल यांच्या स्वयंसेवी संस्थांमध्ये काम करणाऱ्या ‘पेड’ समर्थकांनी मोहीमच उघडली. ‘आप’चे चलनी नाणे राजकारणाच्या बाजारात खपणार म्हटल्यावर तिथे प्रचारक-विचारक लागणार या भावनेतून कविमनाचे हळवे नेते वृत्तवाहिन्यांवर विचारवंत म्हणून अवतरले. अशांनी ‘आप’चा अवकाश व्यापला आहे. अरविंद केजरीवाल यांना तुम्ही राष्ट्रीय स्तरावरचे नेते आहात, असे सांगणारेही हेच नेते आहेत. प्रा. यादव व प्रशांत भूषण हे केवळ अभ्यासू आहेत;  त्यांच्याकडून निवडणुकीच्या महायुद्धात लढण्याची अपेक्षा करणेच चूक असल्याचे वांरवार केजरीवाल त्यांचे भक्त इतर कार्यकर्त्यां-नेत्यांवर बिंबवत होते.
‘आप’मध्ये जे सुरू आहे ते भारतीय राजकारणाला नवे नाही. या निमित्ताने आम आदमी पक्षातील यादवी समोर आली. हा टप्पा ‘आप’च्या काँग्रेसीकरणाचा आहे. ज्याप्रमाणे गांधी परिवाराविरोधात कुणीही काँग्रेसच्या बैठकीत आवाज उठवल्यास त्याच्यावर सर्व भक्त तुटून पडतात;  तोच प्रकार ‘आप’च्या बैठकीत झाला. ही अपरिहार्यता होती की राष्ट्रीय स्तरावरची जुळवाजुळव? आम्ही पक्ष सोडलेला नाही, आमची निष्ठा कायम आहे, मिळेल ते काम आम्ही करू- असे फक्त योगेंद्र यादव हेच म्हणतात. पण केजरीवाल वा मनीष सिसोदिया यांनी असे म्हटल्याचे ऐकिवात नाही.  
आम आदमी पक्षातील नेत्यांची सामाजिक पाश्र्वभूमी पाहता राष्ट्रीय नेतृत्वासाठी सर्वाधिक सक्षम नेते प्रा. योगेंद्र यादव व अरविंद केजरीवाल हेच आहेत. त्यात दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली यश मिळाले. यश कधीच पोरके नसते. त्यामुळे या यशाचे श्रेय सर्वथा अरविंद केजरीवाल यांनाच त्यांच्या पक्षांतर्गत भक्तांनी दिले. प्रा. योगेंद्र यादव यांचा नेमका इथेच विरोध होता. अशा प्रकारे पक्षाचे नेतृत्व एकाच व्यक्तीभोवती केंद्रित होणे योग्य नसल्याचे सांगत त्यांनी केजरीवाल यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ‘आप’च्या संकेतस्थळावर ‘आम्ही इतरांपेक्षा वेगळे कसे?’ याची एक लांबलचक यादीच आहे. त्यात सर्वात वर- ‘पक्षात कुणीही केंद्रीय हायकमांड नाही’ असे लिहिले आहे. मग आत्ता आम आदमी पक्षात जे सुरू आहे, ते कशाचे प्रतीक आहे?   
काँग्रेसीकरणाच्या दिशेने जाणाऱ्या आम आदमी पक्षात अरविंद केजरीवाल यांचा एक मोठा संप्रदाय तयार झाला आहे. हा संप्रदाय केजरीवाल यांच्या व्यतिरिक्त कुणालाही मानत नाही. सरकार संचालन ही एक लोकशाही प्रक्रिया आहे. खरे कसब असते ते पक्ष चालवण्याचे. पक्षात येणारा प्रत्येक  जण सहेतूक येत असतो. प्रत्येक नेत्याच्या महत्त्वाकांक्षा असतातच. ज्याप्रमाणे काँग्रेसमध्ये राज्यस्तरावर पक्षांतर्गत मतभेद आहेत;  त्याचप्रमाणे ‘आप’मध्येही राज्यस्तरावर मतभेद आहेत. ‘आप’ला काँग्रेसच्या पंक्तीत बसवणे पक्षसमर्थकांना रुचणार नाही, परंतु भारतात कुठल्याही राजकीय पक्षाचे कधी ना कधी काँग्रेसीकरण होणारच! पक्ष म्हणून काँग्रेस जुनाच. भाजपही त्याच वाटेवरचा पक्ष. याच वाटेवरून ‘आप’ची वाटचाल सुरू झाली आहे. निवडणूक जिंकणे हा कोणत्याही राजकीय पक्षासमोरचा कायमस्वरूपी कार्यक्रम असूच शकत नाही. पक्षाला स्वतंत्र कार्यक्रम द्यावा लागतो, त्यासाठी पक्षाला विचारांमध्ये स्पष्टता आणावी लागते. प्रादेशिक ते राष्ट्रीय स्तरावरच्या महत्त्वाच्या समस्यांवर मत मांडावे लागते. ‘आप’मध्ये अद्याप हे सुरू झालेले नाही. निवडणूक प्रचारादरम्यान प्रसारमाध्यमांना दैवत मानणारे केजरीवाल शपथविधीच्या दिवशी, ‘आमच्या मागे लागू नका. काम करू द्या. जाब विचारण्याची घाई करू नका’, अशी विधाने माध्यमांना उद्देशून करीत होते. कारण त्यांच्या दृष्टीने प्रसारमाध्यमांची उपयुक्तता संपली होती. दिल्लीचे राजकारण दिल्लीबाहेरच्या दोन नेत्यांनी (नरेंद्र मोदी व अमित शहा) स्वत:भोवती केंद्रित केल्याने दिल्लीवर मालकी हक्क असल्याच्या आविर्भावात वावरणाऱ्या प्रसारमाध्यमांनी ‘आप’ला यश मिळवून देण्यासाठी भरघोस मदत केली. ही मदत अरविंद केजरीवाल इतक्या लवकर विसरले त्याला कारण योगेंद्र यादव हेच आहेत. आपल्या ध्येय-धोरणांची प्रसारमाध्यमे टीका/प्रशंसा करतील. पण राजकीय नेतृत्व म्हणून यादव यांना महत्त्व देतील; अशी अस्पष्ट भीती केजरीवाल यांच्या मनात होतीच.
‘आप’च्या काँग्रेसीकरणामुळे फारसे काहीही बिघडणार नाही. ‘आप’च्या विश्वासार्हतेला तडा वगैरे जाणार नाही. धोका आहे तो तुमचा-आमचा भ्रमनिरास होण्याचा. राजकीय पक्षांना दुहीचा शाप असतो. या शापाचे परिणाम ‘आप’मध्ये लवकर दिसू लागले. हीच चिंतेची बाब आहे. जनता दरबार, पक्षाला मिळालेला निधी आदी बाबी सार्वजनिक करण्याची घोषणा करणारे केजरीवाल ‘त्या’ बैठकीचा वृत्तांत सार्वजनिक करतील का? असा प्रश्नच केजरीवालविरोधी गटाकडून विचारला जाऊ लागला आहे. चळवळ, सामाजिक काम म्हणून केजरीवाल यांच्या क्षमतांविषयी प्रश्न उपस्थित करावे अथवा नाही, यावर चर्चा होऊ शकेल. पण सत्तेत असलेला राजकीय पक्ष चालवण्याचे कसब केजरीवाल यांच्याकडे नाही; याचे कारण त्यांच्या वाढलेल्या महत्त्वाकांक्षा व हेकेखोर स्वभावात आहे. पक्षावर ‘आप’लेच वर्चस्व कायम राहावे, ही महत्त्वाकांक्षा ‘आप’मध्ये मोठी दरी निर्माण करेल. ‘आप’च्या काँग्रेसीकरणाच्या पहिल्या प्रयोगातून याची सुरुवात झाली आहे.