संपादकीय
- अग्रलेख
- विशेष लेख
- अन्वयार्थ
- चैतन्य चिंतन
- लाल किल्ला
- कलाभान
- सह्याद्रिचे वारे
- राखेखालचे निखारे
- व्यक्तिवेध
- गल्लत , गफलत , गहजब !
- राजधानीवर मराठी मोहोर
- जमाखर्च राजकारणाचा
- आज..कालच्या नजरेतून
- बुकमार्क
- वार्ता ग्रंथांची
- बुक-अप!
- बुक - वर्म
- लोकमानस
- अन्यथा
- रविवार विशेष
- भवताल
- रुजुवात
- आकलन
- वाचावे नेटके
- पसायधन
- प्रसार-भान
- ग्रंथविश्व
- आनंदयोग
- ई-लोकमानस
- अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक
मोस्ट कमेन्टेड
- ओबीसी समाज धर्मातराच्या वाटेवर
- पीएच.डी. सर्वात सोपी!
- हे राज्य ही तो बिल्डरांची इच्छा!
- सचिन चालिसा!
- वापरलेलं...
मोस्ट रीड
अफझल गुरूला राजकीयदृष्टय़ा सोयीच्या वेळी फासावर लटकावले म्हणजे मोठी कामगिरी केली असे काँग्रेसजनांनी मानण्याची गरज नाही आणि अफझल गुरूची फाशी हेच राष्ट्रासमोरचे उद्दिष्ट आहे असा ताठरपणा विरोधकांनी दाखवल्याने आता विरोधकांच्या कंपूत एकदम रितेपण आले असल्यास ते नैसर्गिक समजायला हवे.
कोणाचाही मृत्यू साजरा करणे हा असंस्कृतपणाच. दहशतवाद्याचादेखील. त्यामुळे कसाब असो वा अफझल गुरू, त्यांना फासावर लटकावल्यानंतर राजकीय पक्षांनी, नागरिकांनी एकमेकांना पेढे भरवणे वा फटाके फोडून आनंद साजरा करणे हे केवळ त्यांच्यातील प्रौढतेचा अभावच दाखवते असे नाही, तर राजकीय समजाचा अभावदेखील अधोरेखित करते. अमेरिकी गुप्तहेर यंत्रणेच्या सूत्रधारांनी जेव्हा यशस्वीपणे ओसामा बिन लादेन याचा माग काढून पाकिस्तानातील अबोताबाद येथे त्यास टिपले, तेव्हा त्यांना ओसामाच्या मरणाचा उत्सव साजरा करावा असे वाटले नाही. या मोहीम सूत्रधाराची जेव्हा खात्री झाली की मारला गेला तो ओसामाच होता, तेव्हा त्याला रडू आवरले नाही. याउलट वागणे होते काही कनिष्ठ अमेरिकी सैनिकांचे. अफगाणिस्तान वा इराक, जेथे जेथे अमेरिकी सैनिकांनी कथित शत्रुपक्षाकडील दहशतवाद्यांना ठार केले तेव्हा त्यांच्या मृत्यूनंतर हे अमेरिकी सैनिक हे विजयोन्मादात होते आणि त्यांचे वागणे हे असंस्कृतपणाचेच निदर्शक होते. त्याची छायाचित्रे प्रसिद्ध झाल्यावर इस्लामी जगातील वातावरण अधिकच अमेरिकेविरोधात गेले. गेल्याच महिन्यात पाकिस्तानी जवानांनी भारतीय सैनिकास ठार मारून त्याच्या देहाची विटंबना केली, त्यामागेदेखील हीच असंस्कृत मानसिकता होती. तेव्हा कसाब वा अफझल गुरू यांना फाशी देणे हा कायद्याच्या अंमलबजावणीचा भाग जरी असला तरी ती फाशी साजरी करणे अयोग्य आहे. त्यामुळे अफझल गुरूच्या फाशीनंतर काहींना विजयक्षण साजरा करावा असे वाटत असेल तर ते असंस्कृतपणाच्याच जवळ जाणारे आहे. अलीकडच्या काळात काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सरकारने अशा असंस्कृत उत्सवप्रेमींसाठी दोन संधी दिल्या. पहिल्यांदा अजमल कसाब या पाकिस्तानी दहशतवाद्यास फासावर लटकावून आणि आता अफझल गुरू यास अल्लाघरी पाठवून. ज्यांनी या दोघांच्या मरणाचे पेढे वाटले त्यांना या दोघांच्या कृत्यांमागील फरकदेखील समजावून घ्यावासा वाटला नाही, हे दुर्दैव.
२६/११ चा वेडा आणि नृशंस नरसंहार आणि संसदेवरचा ११ डिसेंबर २००१ चा हल्ला या दोन भिन्न घटना आहेत. या दोन्ही घटनांमागील प्रेरणांना पाकिस्तानातून फूस होती. हा त्यातील एकमेव समान धागा. २६/११ चा मुंबईतील हल्ला हा पाकिस्तानी नागरिकांकडूनच झाला होता, तर संसदेवरील हल्लेखोर हे भारतीय होते. गेल्या महिन्यात फासावर लटकलेला कसाब हा पाकिस्तानी होता, तर अफझल गुरू भारतीय. त्यामुळेच या दोघांच्या प्रेरणा भिन्न होत्या. त्यांचा विचार करताना आपल्याच एका प्रदेशातील एखाद्यास देशाविरोधात युद्ध का पुकारावेसे वाटले, याचाही विचार व्हायला हवा. तो केल्यास या दहशतवादामागील भावनांची जाणीव होईल. कोणताही दहशतवाद जन्माला येतो आणि फोफावतो तो प्रस्थापित व्यवस्था स्थानिक भावनांचा आदर करण्यास कमी पडल्यावर. अमेरिका आणि अन्य पाश्चात्त्य देश इस्लामी मूलतत्त्ववादाविरोधात कंठरव करीत असतात, पण त्यांनाही या वास्तवाची जाणीव आताच होऊ लागली आहे. याआधीचे अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी हुच्चपणाने सर्वच इस्लामींना दहशतवादी ठरवण्याचा अगोचरपणा केला; परंतु त्यामागील प्रेरणांचा विचार करण्याचे बौद्धिक कष्ट त्यांनी कधी घेतले नाहीत. कदाचित त्यांच्या तो कुवतीचा प्रश्न असावा; परंतु त्यांनी दहशतवादामागील प्रेरणांचा विचार केला असता तर त्यांनाही हेच जाणवले असते की, या दहशतवादामागे आहे तो व्यवस्थेविरोधातील असंतोष. ज्या भूभागांतील नैसर्गिक साधनसंपत्तीवर अमेरिका आणि पाश्चात्त्य जगाच्या प्रगतीचा डोलारा उभा आहे तो प्रदेश मात्र किमान प्रगतीपासूनदेखील वंचितच ठेवला जात असेल तर अमेरिका आणि पाश्चात्त्य देशांविरोधात तेथे नाराजी असणारच हे समजून घ्यायला हवे. पुढारलेल्या देशांच्या प्रगतीमागे आहे पश्चिम आशियायी देशांतील वाळवंटात दडलेले तेल. या तेलाने विकासाला इंधन दिले, पण जेथून ते मिळाले त्या प्रदेशातील जनतेसाठी विकास हे मृगजळच राहिले. परिणामी त्या परिसरातील नागरिकांच्या मनातील नाराजीने हिंसक रूप घेतले आणि पाश्चात्त्य जग त्यास दहशतवाद म्हणू लागले. धर्माचा शिरकाव यात नंतर झाला. इस्रायल आणि पॅलेस्टाइन याबाबतही हेच म्हणता येईल. पॅलेस्टिनींना राग याचा आहे की, अमेरिका इस्लामी देशांतून नैसर्गिक साधनसंपत्ती शोषून घेते आणि त्यातलाच काही वाटा इस्रायलला आपल्याच विरोधात कारवाईसाठी पुरवते. या मायभूमिहीन पॅलेस्टिनींची परवड त्यामुळे संपतच नाही. दहशतवाद जन्माला येतो तो या अस्वस्थांच्या वाढत्या गर्दीतून. पाकिस्तानला हवी आहे ती ही अस्वस्थता. जम्मू काश्मीरचा प्रश्न पॅलेस्टिनच्या धर्तीवर धगधगता ठेवण्याचे पाकिस्तानचे प्रयत्न असून त्या प्रयत्नांना हाणून पाडणे हे आपले कर्तव्य असायला हवे. याचे कारण असे की, पाकिस्तानसाठी जम्मू काश्मीरची फारकत ही वाहती जखम असून भारताला या मुद्दय़ावर धडा शिकवणे हा एककलमी कार्यक्रम त्या देशाचा असतो. पाकिस्तानातील एकाही राजकारण्यास जम्मू काश्मीरचा प्रश्न सोडून देणे परवडणारे नाही. खेरीज पाकिस्तानात या प्रश्नात जसे राजकीय हितसंबंध गुंतले आहेत तसेच लष्करीही. हा प्रश्न सतत खदखदता ठेवून लष्कराची शस्त्रसज्जता वाढवण्याचा आभास निर्माण करायचा, त्यासाठी अधिकाधिक आर्थिक तरतूद करून घ्यायची आणि राष्ट्रप्रेमाच्या नावावर स्वत:चे भले करायचे हा पाकिस्तानी लष्कराचा कार्यक्रम आहे. ज्येष्ठ पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांचा या सगळ्यांत थेट हात आहे आणि मिळेल त्या मार्गाने हा प्रश्न चिघळवत ठेवणे हे त्यांच्यासाठी आवश्यक कर्तव्य आहे. भारत-पाकिस्तान प्रेमगीते गाणारे भोजनभाऊ त्याकडे दुर्लक्ष करतात आणि राजकारणी अनावश्यक त्वेषाने हा प्रश्न धगधगत ठेवतात.
हे वास्तव आहे. त्यामुळे ते लक्षात घेऊन अफझल गुरूला फाशी दिले म्हणजे काही मोठी कामगिरी केली असे काँग्रेसजनांनी मानण्याची गरज नाही आणि विरोधकांनी समस्त राष्ट्रवादाची भावना त्याच्या फाशीभोवती जिवंत ठेवण्याचीही गरज नाही. त्याला जिवंत ठेवण्याचे आणि राजकीयदृष्टय़ा सोयीच्या वेळी फासावर लटकावण्याचे राजकारण काँग्रेसजनांनी केले आणि त्याला फाशी देणे हेच एकमेव राष्ट्रासमोरचे उद्दिष्ट आहे असा ताठरपणा विरोधकांनी दाखवला. तेव्हा अफझल गुरूच्या फाशीनंतर विरोधकांच्या कंपूत एकदम रितेपण आले असल्यास ते नैसर्गिक समजायला हवे. एखाद्या दहशतवादय़ास फाशी न देणे वा देणे हा देशातील दोन मुख्य राजकीय पक्षांचा प्रमुख मुद्दा असेल तर ते राजकारण प्रौढतेच्या पातळीवर अद्याप पोहोचायचे आहे, असेच मानायला हवे. यातील मोठा दोष हा काँग्रेसच्या पदरात घालायला हवा. याचे कारण असे की, अफझल गुरूच्या गुन्हय़ावर सर्व पातळ्यांवर शिक्कामोर्तब होऊनही त्या पक्षाने केवळ राजकीय कारणांसाठी हा प्रश्न आणि अफझल गुरू या दोघांना जिवंत ठेवले. जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमार अब्दुल्ला आणि अन्यांचा या फाशीस विरोध होता. आताही काँग्रेसच्या गुलाम नबी आझाद आदींनी याबाबत प्रतिक्रिया दिलेली नाही, हे सूचक म्हणावयास हवे. आम्ही कायद्याचे पालन केले, असे काँग्रेसजन आता सांगत आहेत. परंतु मुद्दा हा आहे की, ते इतके दिवस का गेले नाही. तसे ते केले असते तर तो प्रश्न चिघळला नसता, परंतु महत्त्वाचे प्रश्न मिटवण्याऐवजी ते चिघळवत ठेवण्याचे आणि दोन्ही बाजूंनी राजकीय फायदा उठवण्याचे काँग्रेसजनांचे कौशल्य वादातीत आहे. ते आताही दिसून आले.
तेव्हा फाशीच्याच नव्हे तर सर्वच महत्त्वाच्या प्रश्नांना बसलेला राजकारणाचा फास आधी सुटायला हवा. योग्य वेळी फास आवळण्याइतकेच राजकारणाचा फास सोडवणे हेदेखील महत्त्वाचे आहे. त्याची आज जास्त गरज आहे.



















आपण लोकसत्ता सारख्या प्रगल्भ वर्तमानपत्राचे संपादक , म्हणजे आपण तसे “बुद्धिजीवी ” आम्ही आपले पामर वाचक. त्या मुळे आपल्या विचारात अंतर असणारच . आपला सुसंस्कृतपणा आपल्याला लखलाभ. राक्षसांना मारल्यावर दसरा – दिवाळी साजरी करणारे आम्ही. पाकिस्तानी मेंदूतून जन्माला आलेला कसाब किवा हिंदुस्तानी म्हणणारा आणि हिंदुस्तान च्या संसदेवर हल्ला करण्याची योजना आखणारा अफजल गुरु हे आमच्या दृष्टीने राक्षसच. त्या मुळे आम्ही दिवाळी साजरी करणारच.अमेरिकन लोकांनी लादेनला मारल्यावर काय करायचं तो त्यांचा प्रश्न आहे, पण आपण त्याची तुलना करून अजून गोऱ्यांचीच प्रेरणा आपल्या डोक्यात आहे हे सिद्ध केले.राहता राहिला प्रश्न काश्मीरचा , घटनेतील ३७० कलम काश्मीर आणि काश्मिरी मुस्लीम युवक , जनता यांच्या विकासातील अडसर आहे , हे त्यांना जेवढ्या लवकर समजेल त्या नंतर तेथील विकास जलद गतीने होईल.पण हे कोणी त्यांना प्रामाणिकपणे समजावण्याचा प्रयत्न केला तर त्याचे अवडंबर माजवण्यात येईल.त्या मुळे भारत-पाकिस्तान मैत्रीचे गोडवे गाणारे भोजनभाऊ, बिर्याणी बहाद्दर यांनी प्रथम काश्मीर भारतात कसं राहील या साठी प्रयत्न करावा .
सुसंस्कृतपणाचे नियम हे काळानुसार बदलत असतात ते लक्षात आणून दिल्याबद्दल लेखकाचे आभार. उदा: मागील काळात विधवा स्त्रियांनी सती जाणे सुसंस्कृत मानले जायचे परंतु आज ते विकृत मानले जाते. परंतु जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री यांनी फाशीनंतर भारतीय न्यायव्यवस्थेवर प्र्श्नचिन्ह उमटवणारे व जणू त्यांच्या राज्यावर अन्याय होत असल्याप्रमाणे जे काही विचार मांडले (की तारे तोडले) तसेच इतर कोणी व विशेष करून कॉंग्रेस राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जर मांडले असते तर दिल्लीतील आघाडी केंद्र सरकारच्या श्रेष्ठ व्यक्तींनी चालवून घेतले असते का ?
चांगला आणि संतुलित अग्रलेख आहे. या वृत्तपत्राच्या माजी संपादकांना या बातमीने एवढे अस्वस्थ केले आहे की त्यांनी चक्क लिहिले आहे “अमेरिकेतील 9/11च्या हल्ल्यात जे दहशतवादी सामील होते त्यात भाजप कारकीर्दीत भारताने ‘पाठवणी’ केलेले काही अतिरेकी होते, असे अमेरिकन गुप्तहेर खात्याचे म्हणणे आहे”. काय ही आंतरराष्ट्रीय समज आणि माहिती? असल्या संपादकीय बेशरमपणाच्या पार्श्वभूमीवर असले संतुलित अग्रलेख म्हणजे खरोखरच पत्रकारांची संतुलित मनोवृत्ती दाखवते.
सध्याच्या राजकारणाचा फास सोडवण्यासाठी तर ह्या दुबळ्या युपीए सरकारने अजमल कसाब आणि आता अफझल गुरु ह्या दोघांना फासावर चढवले.
भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून रोज होणारी टीका,बदनामी टाळणे,नरेंद्र मोदींच्या संभाव्य पंतप्रधानपदाच्या उमेदवारीस खो घालणे,येणाऱ्या एनडीएच्या सरकारला रोखणे ही सारी करणे त्या फाशीमागे आहेत हे लक्ष्यात घ्यावयास हवे. नाहीतर अजून ५-१० वर्षे फाशी प्रकरण काही मार्गी लागले नसते.
जर केंद्र सरकारची, त्यांच्या मंत्र्यांची टीव्हीवरील देहबोली नीट निरखून पाहिली तर त्यामध्ये बराच आक्रमकपणा आलेला दिसतो आहे. अर्थात त्याला जागतिक मंदीचेही कारण आहे म्हणा!
शेवटी उशिराने का होईना केंद्र सरकारला जाग आली म्हणायची!