पृथ्वीवरील निसर्गसृष्टी आणि मानवी जग यांच्यामागे जर खरेच कुणी एक ईश्वर असेल तर सबंध जगाचा तो एकच ईश्वर असेल. मग अशा त्या सर्वसमर्थ प्रेमळ ईश्वराने जगात एवढे धर्म, पंथ, संप्रदाय का निर्माण केले? किंवा का निर्माण होऊ दिले?

पश्चिम आणि मध्य आशियात निर्माण झालेल्या धर्मामध्ये सर्वात प्राचीन ज्यू धर्म, नंतर झरथ्रुष्ट्राचा धर्म व नंतर कित्येक शतकांनंतर स्थापन झालेले ख्रिश्चन आणि इस्लाम असे मिळून चार धर्म आणि भारतात उगम पावलेले हिंदू, बौद्ध, जैन व शेवटी शीख हे चार धर्म असे मिळून एकूण आठ धर्म हेच आजच्या जगभरातील मानवांचे महत्त्वाचे धर्म आहेत. सर्व आठही धर्म पुरुषांनीच स्थापन केलेले आहेत. या आठांपैकी फक्त भारतात निर्माण झालेले जैन व बौद्ध हे दोन धर्म ‘मूलत: ईश्वर न मानणारे’ धर्म असून त्यांच्याव्यतिरिक्त उरलेल्या सहाही धर्मात माणसाने मानसिक आधारासाठी कसला तरी ईश्वर मानलेला, कल्पिलेला आहे. ईश्वर मानणाऱ्या या सर्व धर्मातील मुख्य ईश्वर पुरुषच आहे, स्त्री नव्हे आणि हे धर्म सर्वार्थाने पुरुष ईश्वराधारितच आहेत. याचे कारण असे असू शकेल की, रानटी अवस्थेपासून माणसांची टोळी वगैरे जी काही समाजव्यवस्था असेल, त्यात शिकार मिळविण्यासाठी पुरुषाचे शरीरबळ जास्त उपयोगी पडत असावे. त्यातून पुरुषप्रधानता आली असणे शक्य आहे. सततच्या अन्न उत्पादन व पुरवठय़ाचा प्रश्न मात्र स्त्रियांनी घराच्या आजूबाजूला होऊ शकणाऱ्या शेतीचा शोध लावून सोडविला असावा. पण सर्वधर्म पुरुषस्थापित धर्म असल्यामुळे त्यांचे नियम पुरुषांना अनुकूल व स्त्रियांना अन्याय्य व दुय्यम स्थान देणारे असे बनविले गेले असे वाटते.
पूर्व आफ्रिकेत माणसाची ‘शहाणा मानव’ ही उत्क्रांती दीड-दोन लाख वर्षांपूर्वी झाल्यानंतर, ८५ हजार वर्षांपूर्वी येऊन गेलेल्या शेवटच्या हिमयुगानंतर केव्हा तरी अन्नशोधार्थ आफ्रिकेच्या वायव्य टोकाकडून आशिया खंडात प्रवेश करून चालत चालत, तात्पुरत्या वस्त्या करीत, शेवटची साठ-सत्तर हजार वर्षे ही मानवजात आशिया खंडभर आणि जगात इतरत्रही पसरत राहिली असावी. त्यांच्या वसाहतींना स्थैर्य मात्र जिथे तिथे, फक्त सुमारे आठ-दहा हजार वर्षांपूर्वी लागलेल्या शेती करण्याच्या शोधानंतरच आले. त्यानंतर केव्हा तरी म्हणजे माणसाला कल्पना रचायला स्वास्थ्य मिळाल्यावर, आजपासून सात-आठ हजार वर्षांपूर्वी, माणसाला कसल्या तरी ईश्वरांचा व धर्माचा शोध लागला असावा. त्यातले काही टिकले व काही नष्ट झाले असावेत. त्यात हेही शक्य आहे की, यातील अगदी सुरुवातीच्या ईश्वर कल्पना, भूमध्य समुद्राजवळील इस्रायल, सीरिया, जॉर्डन येथील भूभागांत (ज्याला आज बायबलची भूमी असे म्हणतात) तिथे सुचल्या असाव्यात. तिथून मेडिटरेनियन लोकांपैकी ‘द्रविड’ वंशाचे लोक इराक वगैरे भागांतून चालत येऊन, मग समुद्र ओलांडून, त्यांनी सुमारे सात-आठ हजार वर्षांपूर्वीच भारतात प्रवेश करून, सिंधू संस्कृतीची स्थापना केली असावी. हीच भारताची आर्यपूर्व संस्कृती होय. या लोकांचे इजिप्त, इराकमधील पुरातन धर्माशी-संस्कृतींशी आणि तेथील मानववंशांबरोबरसुद्धा मोठे साम्य आढळते. त्यांच्यात दळणवळणही होते. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी त्यांच्या ‘हिंदू धर्माची समीक्षा’ या ग्रंथात (पान १३३वर)असे म्हटलेले आहे की, इजिप्त, क्रीट, मेसापोटेमिया येथील संस्कृतींमध्ये शिव, विष्णू व काली या देवता असून.. नाईल, युफ्रेटिस, तैग्रिस व सिंधू यांच्या तीरावर वाढलेल्या या प्राचीन संस्कृतींचा वारसा हिंदू समाजाकडे अजूनही चालू आहे, इत्यादी. यावरून असे दिसते की, शिव आणि विष्णू हे हिंदूंचे आजचे प्रमुख देव, ज्यांना भारतातील आर्याच्या देवतामंडलात स्थान नव्हते व ज्यांचा फार उशिरा म्हणजे वेदोपनिषद काळानंतर हिंदू धर्मात समावेश झालेला आहे ते देव, आर्यपूर्व सिंधू संस्कृतीतून (जी हळूहळू नष्ट होतानाही शेकडो वर्षे तगून राहिली असावी तींतून) हिंदू धर्मात येऊन मान्यता पावले असावेत.
जगातील बहुसंख्य मानवजातीच्या पूर्वजांना ,सुचलेली देवाबाबतची मूळ कल्पना अशी असावी, की वनस्पती, अन्नधान्य व प्राणिमात्रांना जीवन देणारी ‘पृथ्वीमाता-निसर्गसृष्टी’ ही ‘मदर’ आणि फार महत्त्वाचा पाऊस, सूर्यप्रकाश वगैरे देणारा तिचा पुरुष सहकारी, आकाशात राहणारा ‘फादर’, ‘मानवाचा बाप’ हाच ईश्वर होय. यात भूमाता प्रत्यक्ष दिसते तरीपण आकाशातील बाप हा मात्र अदृश्य, स्वयंभू व सर्वशक्तिमान ईश्वर आहे, अशी ती कल्पना असावी. पुढे यांच्यातील द्रविड वंशीयांनी भारतात आल्यावर किंवा येण्यापूर्वी याच देवांविषयी जरा काव्यमय कल्पना करून त्यांना शंकरपार्वती (शिव आणि उमा) बनविले असावे. त्यांच्याबरोबर समृद्धीची देवता म्हणून लक्ष्मी आणि तिचा पुरुष सहकारी विष्णू अशी कल्पना केली असावी. इतर कुठल्याही धर्मात देवांच्या मूर्ती किंवा प्रतिमा दिसत नाहीत, पण हिंदू धर्मात मात्र त्यांना मनुष्यरूप देऊन, संसारी बनवून त्यांच्या मूर्तीही बनविण्यात आल्या आणि त्यांना फुले, पाने, फळे, दूध इत्यादी वस्तू देऊन त्यांच्या पूजा करण्यात येऊ लागल्या. या द्रविडांनंतर काबूलमार्गे भारतात पाच हजार वर्षांपूर्वी आलेल्या वेदरचित्या आर्यामध्ये अशा पूजा कधीच नव्हत्या. त्यांना फक्त अग्निपूजेचे यज्ञयाग व होमहवनच माहीत होते आणि त्यांचे यज्ञांतील इंद्रवरुणादी देव तर आज हिंदूंच्या विस्मृतीत गेलेले आहेत. ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम या अब्राहमिक धर्मातील आकाशातील बापाने अब्राहम, मोझेस, येशू ख्रिस्त, महंमद पैगंबर अशा त्याने निवडलेल्या प्रेषितांना, देवाच्या आज्ञा मनुष्याला समजावून सांगण्यासाठी पृथ्वीवर पाठविले आणि त्यांनी आपापले धर्म स्थापिले, असे मानले जाते. तर अब्राहमिक धर्मातील परमेश्वर (आकाशातील बाप) आणि हिंदू धर्मातील ब्रह्मा, विष्णू, महेश म्हणजे जगातील सगळेच देव स्वयंभू मानलेले, अशरीरी किंवा शरीरधारी सगळेच मनुष्याच्या कल्पक डोक्यातून निघालेले दिसतात. (डॉ. रवींद्रनाथ टोणगावकर, जि. धुळे यांच्या ‘माझी आध्यात्मिक वाटचाल’च्या आधाराने). त्यामुळे जगातील कुठला देव खरा व कुठला खरा नाही, असा प्रश्नच उरत नाही. सगळेच कल्पित.
यावर कुणी म्हणेल की, प्रेषितांना व कृषिमुनींना जे ज्ञान साक्षात्काराने मिळते ते साक्षात ईश्वराकडून त्यांना मिळालेले सत्यज्ञान असते व आपण सामान्य माणसे त्याविषयी शंका घेऊच शकत नाही, ठीक आहे. येशू ख्रिस्ताने सांगितले की, तो ईश्वराचा एकमेव पुत्र आहे, तर प्रेषित महंमदाने सांगितले की, ईश्वराचा पुत्र कुणीच नाही व ईश्वराला पुत्र असणे शोभत नाही. आता भारतात पाहा. श्रीकृष्णाने सांगितले की, तो स्वत:च ईश्वर आहे, ईश्वराचा अवतार आहे. तसेच शंकराचार्य, रामानुजाचार्य, मध्वाचार्य यांनी अनुक्रमे- १) केवलाद्वैतवाद व जगन्मिथ्यावाद २) विशिष्टाद्वैतवाद ३) द्वैतवाद अशी परस्पर भिन्न सत्ये सांगितली, ती कशी? तसाच दुसरा मुद्दा. कुणा हिंदू श्रेष्ठाने ध्यानाने मन केंद्रित केले, तर त्याला शिव, विष्णू, दत्ताचे दर्शन होते, होऊ शकते; परंतु ख्रिस्ती चर्चमधील कुणा ननने मन केंद्रित केले, तर तिला येशूचे दर्शन होते, होऊ शकते. यावरून दृष्टान्त, दर्शन, साक्षात्कार वगैरे गोष्टी आपल्याच मनबुद्धीची निर्मिती असावी असे दिसून येत नाही का? एवढा सर्वसमर्थ ईश्वर सर्व उपासकांना एकच दृष्टान्त देऊ शकत नाही का? प्रत्येकाला वेगवेगळा साक्षात्कार होतोच कसा? आजचे आधुनिक प्रगत मेंदूविज्ञान तर सांगते की, सगळे दृष्टान्त, साक्षात्कार हे मेंदूतून निघणाऱ्या रसायनांच्या परिणामाने होणारे भास (आभास) असून मेंदूमधून बाहेर पडणाऱ्या विद्युत कंपनांच्या मोजमापाने त्यांचे वैज्ञानिक स्पष्टीकरण मिळालेले आहे व ते सिद्ध झालेले आहे.
पृथ्वीवरील निसर्गसृष्टी आणि मानवी जग यांच्यामागे जर खरेच कुणी एक ईश्वर असेल तर सबंध जगाचा तो एकच ईश्वर असेल. नाही का? प्रत्येक धर्माचा वेगळा असे अनेक ईश्वर जगात किंवा जगामागे असणे असे तर काही शक्य नाही. मग अशा त्या सर्वसमर्थ प्रेमळ ईश्वराने जगात एवढे धर्म, पंथ, संप्रदाय का निर्माण केले? किंवा का निर्माण होऊ दिले? वेगवेगळ्या धर्मपंथांचे व वेगवेगळ्या श्रद्धांचे लोक अतिरेक करून एकमेकांचा छळ करतील, एकमेकांचे जीव घेतील, हे त्या ईश्वराला कळले नाही का? धर्माच्याच नावाने जगात दंगे, कत्तली आणि अत्याचार सातत्याने होत आहेत हे त्याला दिसत नाही का? की त्यासाठी तो स्वत:ला जबाबदार धरत नाही? ‘मरू देत या मूर्ख मानवजातीला’ असे त्याला वाटते की काय? की जगात सुख आणि न्याय निर्माण करावा असे त्याचे उद्दिष्टच नाही. बरे जगात पूर, वादळे, अपघात, भूकंप, सुनामी अशा नैसर्गिक दुर्घटना व दंगे, युद्धासारख्या मानवनिर्मित आपत्ती सातत्याने येतच राहतात. त्यात पापी आणि पुण्यवंत सारखेच भरडले जातात, ते कसे?
बरे आता दुसरा मुद्दा. जगनिर्माता व सांभाळकर्ता असा कुणी ईश्वर असेलच, तर त्याने प्रत्येक धर्माच्या प्रेषितांना, धर्मसंस्थापकांना वेगवेगळी व उलटसुलट माहिती का दिली? वेदान्तिक ऋषीमुनींना त्याने सांगितले की, माणसाला ‘अनेक पुनर्जन्म’ घ्यावे लागतात व माणसाच्या दु:खाचे कारण त्याच्या पूर्वजन्मातील संचित पाप-पुण्यात आहे. याउलट पश्चिम आशियातील प्रेषितांना त्याने स्पष्ट सांगितले की, ‘माणसाला एकच जन्म असतो’ व ‘माणसाला जे दु:ख सोसावे लागते त्याचे कारण सैतान नावाची एक दुष्ट व अमर शक्ती अस्तित्वात आहे तिच्या कारवायांत आहे’.  खरेच का त्या लोकांना पुनर्जन्म नसून फक्त एकच जन्म आहे व फक्त भारतातल्या लोकांनाच जन्म, मृत्यू व पुनर्जन्मांची साखळी अशी पुन:पुन्हा गर्भवासाची शिक्षा आहे? की स्वत: ईश्वराने ऋषी-प्रेषितांना मुद्दाम परस्परविरोधी माहिती देऊन मानवांमध्ये भांडणे, मारामाऱ्या होण्याची व्यवस्था केली आहे?
माझ्या अल्पमतीला असे वाटते की, आजच्या जगातील सगळे धर्म व त्यातील सगळे ईश्वर, जे मानवजातीने स्वत:च निर्माण केलेले आहेत ते व त्यांची आनंद, स्वर्ग, मोक्षांची सगळी ‘आश्वासने’ व त्यांच्या सगळ्या ‘धमक्या’ हे सर्व काही आपण विसरून जाऊ आणि ‘विज्ञान व मानवतावाद’ हा मार्ग पत्करू तरच मानवजात सुखी होईल. नाही तर या धर्मापासून व ईश्वरांपासून या मानवजातीची सुटका होणे फार कठीण आहे.

peter higgs marathi articles loksatta,
पदार्थ विज्ञानातील जादूगार…
survival of marine species in danger due to ocean warming
विश्लेषण : महासागर तापल्याने प्रवाळ पडू लागलेत पांढरेफटक… जलसृष्टीचे अस्तित्वच धोक्यात?
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
18 Months Later Shukraditya Rajyog in Mesh
दीड वर्षांनी शुक्रादित्य योग बनल्याने ‘या’ राशींना लाभणार पद, पैसे व प्रेम; २४ एप्रिलपासून जगण्याला मिळेल नवं वळण

शरद बेडेकर