पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष, पर्यावरणप्रेमींकडून नाराजी

राज्य शासन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मदतीने राज्यभरात हरितपट्टे विकसित करण्यासाठी प्रयत्नशील असताना पालिका हद्दीमध्ये मात्र अस्तित्वात असलेल्या वृक्षांवर फुकटे जाहिरातदार आपल्या फायद्यासाठी खिळे ठोकून जाहिराती लावत आहेत. त्यामुळे वृक्षांचे आयुष्य कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गेल्या दोन वर्षांपासून राज्य सरकार कोटय़वधी वृक्षांच्या लागवडीसाठी जुलै महिन्यात मोहीम राबवत असते. त्यासाठी राज्यभरातील सर्वच शासकीय, निमशासकीय संस्था, खासगी कंपन्या, शाळा, महाविद्यालये अशा सर्वानाच त्यात सहभागी होण्यासाठी आग्रह केला जातो. त्यासाठी संपूर्ण शासकीय यंत्रणा राबत असते. नुकतेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हरित पट्टे विकसित करण्यासाठी एक कोटीचा निधीही जाहीर करण्यात आला आहे. मात्र हे प्रयत्न होत असताना शहरातील सध्या अस्तित्वात असलेल्या जुन्या वृक्षांना मात्र खिळे ठोकून जखमी केल्याचे समोर येते आहे. बदलापूर पूर्वेतील रेल्वे स्थानक ते कात्रप मार्गापर्यंत अनेक जुने वृक्ष आहेत. रस्ता रुंदीकरण आणि काँक्रिटीकरणानंतरही ही झाडे वाचवण्यात आली होती. मात्र सध्या याच झाडांवर काही फुकटे जाहिरातदार आपल्या जाहिराती लावत आहेत. त्यासाठी थेट मोठमोठे लोखंडी खिळे या झाडांना ठोकले जात आहेत. काही मोठय़ा वृक्षांचे संपूर्ण खोड या जाहिरातदारांनी खिळे ठोकून छिन्नविछिन्न केल्याचे पाहायला मिळते आहे. त्यामुळे या झाडांना इजा होण्याची शक्यता आहे. एखाद्या वृक्षाला खिळे ठोकल्यास त्या भागात जंतू तयार होण्याची शक्यता असते. तसेच वृक्षांना पडलेल्या भेगांमध्ये पाणी गेल्यासही वृक्ष हळूहळू मरू शकतो. त्यामुळे अशा प्रकारे वृक्षांना खिळे मारणे हे वृक्षांसाठी घातक असल्याचे पर्यावरणप्रेमी सांगतात. त्यामुळे या जाहिरातदारांवर कारवाईची मागणी होते आहे.

पुनरेपणाचे काय?

गेल्या काही वर्षांत बदलापूर सर्वच मोठय़ा रस्त्यांचे रुंदीकरण व काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. फॉरेस्ट नाका ते होप इंडिया, कर्जत महामार्ग अशा सर्वच रस्त्यांसाठी झाडे तोडण्यात आली होती. शेकडो वर्षे जुनी झाडेही तोडण्यात आली. मात्र त्यांचे पुनरेपण झाल्याचे अद्याप पाहायला मिळत नाही. त्यात प्रतिवर्षी पालिका लाखोंचे कंत्राट वृक्षलागवडीसाठी देत असते. त्यामुळे या सर्वाचे होते काय, असाही सवाल आता उपस्थित होतो आहे.