कल्याणमध्ये भाजीपाल्याची खरेदी-विक्री लिलाव पद्धतीने

कल्याण तसेच आसपासच्या परिसरातील कृषी मालाच्या घाऊक बाजारापेठेत मंगळवारी प्रथमच भाजीपाल्याचा उघड बोलीने लिलाव करण्यात आला. नववर्षांच्या पूर्वसंध्येला बाजार समिती आवारात प्रारंभ झालेल्या या उघड बोली लिलावात शेतक ऱ्यांना पहिल्याच दिवशी बाजारभावापेक्षा किलोमागे एक ते दीड रुपयांचा वाढीव दर मिळाला.

[jwplayer gLyhqAeU-1o30kmL6]

ठाणे जिल्ह्य़ासह बाहेरच्या भागातून बाजार समितीत शेतमाल घेऊन येणाऱ्या शेतक ऱ्यांच्या शेतमालाला साखळी पद्धतीने व्यवहार करणारे व्यापारी सहभागी करून घेत नव्हते. त्यामुळे असंघटित शेतक ऱ्यांना शेतमाल विकण्यासाठी अन्य ठिकाणी जावे लागत होते. कल्याण, मुरबाड, शहापूर, भिवंडी परिसरात अनेक शेतकरी भाजीपाला लागवड करून शेतमाल कल्याणमध्ये विकण्यासाठी आणतात. मात्र, घाऊक बाजार आवारातील ठरावीक बडे व्यापारी या शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी मज्जाव केला जात असे. त्यातही जर कोणी शेतकरी या बडय़ा व्यापाऱ्यांच्या विरोधात जाण्याचे धाडस करत असे तर ‘हत्ता’ पद्धतीने शेतमालाचा भाव पाडून तो खरेदी केला जात असे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला पुरेसा भाव मिळत नसल्याने वर्षोनुवर्षे व्यापाऱ्यांच्या या एकाधिकारशाहीपुढे शेतकऱ्याचे काही चालत नसे. यामुळे नववर्षांचे स्वागत करताना कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवींद्र घोडविंदे यांनी  भाजीपाल्याची खरेदी विक्री लिलाव पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, नववर्षांचे औचित्य साधून मंगळवारी प्रथमच लिलाव पद्धतीने माल खरेदी-विक्रीचे व्यवहार बाजारात पार पडले. यावेळी शेतकऱ्यांनीही बाजार समितीच्या या लिलाव पद्धतीचे स्वागत केले  असून जिल्हा उपनिबंधक दिलीप उडाण, सभापती घोडविंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत उघड बोलीने लिलाव योजनेचा प्रारंभ झाला.

[jwplayer pqdTtL1f-1o30kmL6]