चालकांची मुजोरी रोखण्याला मर्यादा असल्याचे सबब; वाढत्या गुंडगिरीची जबाबदारी प्रशासनावर

Citizens object to concreting works at unnecessary places in navi mumbai
नको तेथे काँक्रीट रिते! अनावश्यक ठिकाणी काँक्रीटीकरणाच्या कामांना नागरिकांचा आक्षेप, शहरभर वाहतूककोंडी
After the Kanker encounter in Chhattisgarh the police claim that the Naxalites supply system has been hit
नक्षलवाद्यांच्या पुरवठा यंत्रणेला धक्का; छत्तीसगडमधील कांकेर चकमकीनंतर पोलिसांचा दावा 
Men travel in womens coaches Safety of women passengers of air-conditioned local at risk
मुंबई : महिला डब्यातून पुरुषांचा प्रवास, वातानुकूलित लोकलच्या महिला प्रवाशांची सुरक्षा ऐरणीवर
Versova Koliwada, facilities Versova koliwada,
वर्सोवा कोळीवाड्याला सोयी-सुविधांची प्रतीक्षा

सुटय़ा पैशांच्या मुद्यावरून ठाण्यात मंगळवारी रिक्षाचालकांनी एका प्रवाशाला मारहाण केल्याच्या घटनेनंतर रिक्षाचालकांच्या मुजोरपणाबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे. मध्यंतरी ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि त्यानंतर ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने कडक कारवाई मोहीम राबवूनदेखील रिक्षाचालकांच्या गुंडगिरीच्या घटना उजेडात येत आहेत. परंतु, एरवी रिक्षाचालकांचे नेते म्हणवून घेणाऱ्या रिक्षा संघटनांनी अशा रिक्षाचालकांना रोखण्यात असमर्थता दर्शवली आहे. उलट अशा घटनांना प्रशासन जबाबदार असल्याची उलटी बोंबही त्यांनी सुरू केली आहे.

वाहतुकीचे साधे नियम मोडीत काढत बेशिस्त पद्धतीने वाहन चालवणे, गणवेशाचे नियम न पाळणे, रिक्षा थांबा सोडून भर रस्त्यात रिक्षा उभ्या करणे, प्रवाशांशी अरेरावी असे प्रकार रिक्षाचालकांकडून सातत्याने होत आहेत. ठाणे स्थानक परिसरात तर रिक्षाचालकांच्या बेशिस्त वर्तनामुळे कमालीची वाहतूक कोंडी होते. या पाश्र्वभूमीवर ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी स्थानक परिसरातील रिक्षाचालकांच्या बेकायदा पार्किंगविरोधात धडक कारवाई सुरू केली होती. वाहतूक नियमभंग करणाऱ्या रिक्षाचालकांचे परवाने रद्द करण्याची मोहीम वाहतूक विभागाकडूनही राबवण्यात आली. परंतु, या कारवाईचीही जरब रिक्षाचालकांत नसल्याचे मंगळवारच्या घटनेतून दिसून आले. या संदर्भात ठाणे शहरातील रिक्षा संघटनांशी संपर्क साधला असता, बहुतांश संघटनांनी रिक्षाचालकांची मुजोरी आवरण्यात असमर्थता दर्शवली.

दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या या अंसवेदनशील घटनांच्या पाश्र्वभूमीवर रिक्षा चालकांचा सविस्तर तपशिल उपलब्ध करुन देणारे परवाने रिक्षात बसवणे बंधनकारक असल्याचे ठाणे वाहतूक विभागातर्फे कळवण्यात येत आहेत.  रिक्षा चालकांच्या मागील बाजूस रिक्षा क्रमांक, परवाना धारकाचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, परवाना क्रमांक, परवान्याची मुदत, चालकाचे नाव आणि पत्ता, वाहन चालक परवाना क्रमांक आणि वैधता, वाहन चालकाचा मोबाईल क्रमांक, पोलीस मदत क्रमांक, आरटीओ हेल्पलाईन क्रमांक इत्यादी तपशील प्रवाशांना सहज दिसेल, अशा तपशिलासह प्रदर्शित करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

सविस्तर तपशिल उपलब्ध करुन न देणाऱ्या रिक्षाचालकांकडून ५०० रुपये दंड आकारण्यात येणार आहे. चुकीची माहिती दर्शवणाऱ्या रिक्षा चालकाला एक महिना कैद किंवा ५०० रुपये दंडाची शिक्षा निश्चित करण्यात आली आहे.

रिक्षा संघटना म्हणतात..

प्रवाशाला झालेली मारहाण निश्चितच वाईट घटना आहे. मात्र रिक्षा संघटनांच्या कामालाही मर्यादा आहेत. रिक्षाचालकांवर अन्याय होऊ नये, रिक्षाचालकांची परवाना संबंधीची कामे जलद गतीने व्हावीत यासाठी रिक्षा संघटना आहेत.  समाजात वाढणाऱ्या या कृत्याला प्रशासनच जबाबदार आहे. रिक्षाचालकांचे प्रश्नही जाणून घेणे गरजेचे आहे. २०११ मध्ये पोलीस आयुक्त, रिक्षा संघटना, प्रवासी संघटना यांची एकत्रित समिती होती. सध्या अशी समिती अस्तित्त्वात नाही.

विनायक सुर्वे, एकता रिक्षा-टॅक्सी चालक मालक संघटना

रिक्षाचालकांच्या परवाने पडताळणी करताना संबंधित चालकांची सविस्तर माहिती घेणे, परवाने नसलेल्या रिक्षाचालकांना रिक्षा चालवण्यास बंदी घालणे अशी भूमिका घेण्यात आली आहे.

राजू सावंत, राष्ट्रवादी रिक्षा संघटना

दिवसेंदिवस घडत असलेल्या घटना निश्चितच वाईट आहेत. मात्र या घटनांना प्रशासनही जबाबदार आहे. काही दिवसांपूर्वी रिक्षाचालकांवर कारवाई करताना आयुक्तांनी रिक्षा चालकाला मारहाण केली. याबाबत आयुक्तांच्या विरोधात कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. शांतता निर्माण करण्याचे काम रिक्षा संघटनांचे आहे. मात्र प्रशासनाच्या सरसकट कारवाईमुळे रिक्षाचालकांवरही अन्याय होत आहे, याचीही नोंद घ्यायला हवी.

 –रवी रॉय, ठाणे रिक्षा मेन्स संघटना