येत्या जुलैमध्ये उद्घाटन; नक्षत्र उद्यान, फुलपाखरू उद्यान, निसर्ग माहिती केंद्राचाही समावेश

ठाणे, मुंबई, नवी मुंबईतील नागरिकांना जैवविविधतेचा अनुभव घेता यावा, यासाठी कळवा खाडीजवळ स्व.उत्तमराव पाटील निसर्ग संरक्षण व जैवविविधता उद्यान शासनाच्या वन विभागाच्या अंतर्गत तयार करण्यात आले असून या उद्यानाचे उद्घाटन जुलै महिन्यात करण्यात येणार आहे. ठाणे वन परिक्षेत्राच्या सामाजिक वनीकरण विभागामार्फत या उद्यान प्रकल्पाचे काम सुरूआहे. पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या स्थानिक वनस्पतींचे जतन या जैवविविधता उद्यानात करण्यात आले आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी नवग्रहांचे प्रतिनिधित्व करणारी वृक्ष, नक्षत्र आणि राशीनुसार वृक्षांची लागवड, फुलपाखरू उद्यान, निसर्ग माहिती केंद्र, ध्यानधारणा केंद्र असे वेगवेगळे प्रकल्प या उद्यानात राबवण्यात आले आहेत. ऐरोली येथील जैवविविधता केंद्रापाठोपाठ नव्याने उभ्या राहत असलेल्या या उद्यानातून पक्षी निरीक्षक, पर्यावरण प्रेमींना निसर्गाचा आणखी नवा अनुभव घेता येणार आहे.

Nagpur, Maherghar, safe delivery
नागपूर : सुरक्षित प्रसूतीसाठी चार माहेरघर कधी?
Kandalvan, Kandalvan belt,
ज्वलनशील पदार्थांद्वारे कांदळवनावर घाला, सिडकोकडील २३० हेक्टर कांदळवन पट्टा हस्तांतरीत करण्यास टाळाटाळ कशासाठी ?
Traffic Routes Altered as Nashik s CBS to Canada Corner Road Undergoes 18 Month Concreting Work
काँक्रिटीकरणासाठी नाशिकमधील आठ रस्ते बंद – सीबीएस- कॅनडा कॉर्नर मार्गावर एकेरी वाहतूक
water scarcity, Pimpri chinchwad , shortage of water supply, Andhra Dam
पिंपरी : आंद्रा धरणातून मिळणाऱ्या पाण्यात घट…उपनगरांमध्ये पाणीटंचाई

साकेत मैदानाजवळील रस्त्यालगतच वनविभागामार्फत या जैवविविधता उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे.

५.२६ हेक्टर क्षेत्रावर पसरलेल्या या उद्यानासाठी सात कोटी रुपये खर्च करण्यात आला असून जैवविविधतेविषयक अनेक उपक्रम या केंद्रात राबवण्यात येत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या महिन्याच्या अखेरीस या केंद्राचे काम पूर्णत्वास येईल. तसेच बालोद्यान, फुलपाखरू उद्यान या केंद्रात तयार करण्यात आले आहे.

स्थानिक वन प्रजाती, पक्षी, औषधी वनस्पतींची शास्त्रीय नावे यांची ओळख पर्यटकांना व्हावी, यासाठी उद्यानात निसर्ग माहिती केंद्र उपलब्ध करून देण्यात येणार आहे. उद्यानातील वृक्षलागवडीचे काम सुरू असून जैवविविधतेची वाढ होण्यासाठी फुलपाखरू  उद्यानात वड, पिंपळ, बेल, आंबा, जांभूळ, आवळा या वृक्षांची लागवड उद्यानात करण्यात आली आहे. लागवड करण्यात आलेल्या विविध वृक्षांची, फुलपाखरांविषयी माहिती देणारे फलक लावण्यात आले आहेत.

याखेरीज पर्यावरणाचा समतोल राखणाऱ्या बेल, पिंपळ, अशोक, खैर, कन्हेर, द्रोणपुष्पी, तुळसी, शंखपुष्पी, दुर्वा आणि रुई या वृक्षांची लागवड उद्यानात करण्यात येणार आहे

सीमेंट, दगडी यांचा भराव या जागेत पूर्वी टाकण्यात येत असल्याने आजूबाजूला असलेल्या कांदळवनांचे नुकसान होत होते. या पाश्र्वभूमीवर हे जैवविविधता केंद्र नागरिकांना पर्यटनाच्या दृष्टीने उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला.

– सतीश फाळे, विभागीय वनअधिकारी – सामाजिक वनीकरण विभाग

उद्यानात आणखी काय?

वाचनालय

या उद्यानात २२५ चौरस फूट क्षेत्रावर वाचनालयाची उभारणी करण्यात येणार आहे. वन्यजीव, पर्यावरण, कांदळवन, स्थानिक वनस्पतींच्या प्रजाती, सामाजिक वनीकरणाची माहितीपत्रके अशा माहितीचा संग्रह ई-बुक्सच्या माध्यमातून वाचनालयात ठेवण्यात येणार आहे.

कांदळवन विहार मार्ग

जैवविविधता उद्यानात खाडीकिनाऱ्यालगतच कांदळवनाच्या विविध प्रजाती अस्तित्वात आहेत. उद्यानास भेट देणाऱ्या विविध पर्यटकांना कांदळवनातील वृक्षांवर निर्माण करण्यात आलेल्या लाकडी विहार मार्गावर खाडीकिनारी भटकंती करता येणार आहे.

ध्यानधारणा केंद्र

नागरिकांना ताणतणावापासून मुक्ती आणि निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालविण्यासाठी उद्यानात पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून वयोवृद्ध नागरिक, महिलांसाठी ध्यानधारणा केंद्रांची निर्मिती करण्यात येणार आहे.

खडक उद्यान

जैवविविधता केंद्रातील तयार करण्यात येणाऱ्या खडक उद्यानात विविध आकाराचे, रंगांचे दगड यांची आकर्षक रचना करून कॅक्टस उद्यान तयार करण्यात येणार आहे. या उद्यानाच्या काही भागात निवडुंग वनस्पतींची लागवड करण्यात येणार आहे.

नक्षत्रवन

या उद्यानात नक्षत्र आणि राशी वनांची निर्मिती करून तेथे खैर, जांभूळ, उंबर, आवळा, कुचला, मोहा, कडुनिंब, आंबा, कदंब, शमी, रुई, फणस, नागचाफा, सांबर अशा झाडांची लागवड करण्यात येत आहे.