उतावळय़ा नेत्यांच्या ‘गुरूदेवां’ना आवरा :  ज्येष्ठ नेत्यांची मागणी

गेली जवळपास दोन दशके सत्तेत असूनही कल्याण-डोंबिवली शहरांना विकासाची दिशा देण्यास शिवसेनेला आलेले अपयश, निष्क्रिय काँग्रेस-राष्ट्रवादी, फारसा प्रभाव टाकू न शकलेली महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशा परिस्थितीत येत्या निवडणुकीत कधी नव्हे इतकी प्रभावी कामगिरी करून दाखविण्याची संधी भाजपला आहे. मात्र निवडणुकीच्या तोंडावर पक्षात आलेल्या काही आयारामांच्या अतिउत्साहामुळे ती संधी गमाविण्याची भीती कार्यकर्ते व्यक्त करू लागले आहेत. ‘गुरुदेव अ‍ॅनेक्स’ प्रकरणी अपक्ष आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांना एकीकडे तोंडघशी पाडले असताना याच काळात पक्षातील एका ज्येष्ठ नेत्याच्या घरात चहापानासाठी गेलेल्या मुख्यमंत्र्यांपुढील पंचपक्वान्नाचे छायाचित्र व्हायरल झाल्याने भाजपच भाजपची कशी कोंडी करत आहे, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

दरम्यान, राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असताना राष्ट्रवादीशी संग करून विधानसभा निवडणुकीत शिवसेनेशी जवळीक साधू पाहणारे अपक्ष आमदार गणपत गायकवाड महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या तंबूत दाखल झाले. मात्र ‘गुरुदेव अ‍ॅनेक्स’प्रकरणी त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच तोंडघशी पाडायला लावल्याने या गणपतरावांना आता आवरा अन्यथा हातातोंडाशी आलेला घास निसटेल, अशी भावना भाजपतील एका मोठय़ा गटाकडून व्यक्त होऊ लागली आहे.

राज्यात शिवसेना-भाजप युतीची सत्ता असली तरी या दोन्ही पक्षांचे विळ्याभोपळ्याचे सख्य सर्वश्रुत आहे. एप्रिल महिन्यात झालेल्या अंबरनाथ आणि बदलापूर महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेने विधानसभेतील अपयश धुऊन काढत आपणच ‘मोठे भाऊ’ असल्याचे दाखवून दिले होते. या दोन्ही पालिकांमध्ये शिवसेनेला निर्विवाद बहुमत मिळाले असले तरी भाजपलाही पूर्वीच्या तुलनेत चांगल्या जागा मिळाल्या आहेत. डोंबिवलीत भाजपला मानणारा फार मोठा वर्ग आहे. संघाचे नेटवर्क आणि सर्वसामान्यांचा पाठिंबा या बळावर निवडणुकीत सेनेशी दोन हात करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्याचाच एक भाग म्हणून एकीकडे युतीची बोलणी सुरू ठेवत आपली ताकद वाढविण्याचा प्रयत्न भाजप करीत आहे. त्यासाठी विविध पक्षातून आयारामांची खोगीरभरती केली गेली. सेनेची कोंडी करण्याच्या व्यूहरचनेचा एक भाग म्हणून ऐन निवडणुकीच्या तोंडावर २७ गावे पुन्हा महापालिकेतून वगळून सेनेची कोंडी करण्याचा अयशस्वी प्रयत्न भाजपने केला. स्थानिक नेत्यांचा हा उतावळेपणा भाजपला गोत्यात आणेल. आपणच आपल्याला हरविल्यासारखे तो होईल, अशी प्रतिक्रिया एका ज्येष्ठ संघ कार्यकर्त्यांने यासंदर्भात व्यक्त केली आहे.