प्रवासी सुविधांच्या गप्पा मारणाऱ्या रेल्वे प्रशासनाकडून दलालांसाठी कसे ‘अच्छे दिन’ आणले जात असल्याचे धक्कादायक चित्र गेल्या काही महिन्यांपासून कल्याण रेल्वे स्थानकाच्या पार्सल कार्यालयात दिसू लागले आहे. एखाद्या प्रवाशाला अथवा व्यापाऱ्याला सामान पार्सल करायचे असल्यास ते फलाटावर आणण्यापासून ते गाडीत चढवण्यापर्यंत सगळी जबाबदारी प्रवाशांची राहील, असा फतवा कल्याण पार्सल कार्यालयातून काढण्यात आला आहे.सामानाचे नुकसान झाल्यास तसेच ते पोहचण्यास उशीर झाल्यास रेल्वे प्रशासन त्यास जबाबदार नाही, असा लेखी अर्ज संबंधित व्यापारी, ग्राहक आणि प्रवाशांकडून लिहून घेतला जात आहे. या फतव्यामुळे रेल्वेने सामान इच्छितस्थळी पोहोचवू पाहणारे प्रवासी अचंबित होत असून हेच काम करण्यासाठी दलालांना गाठणाऱ्यांना मात्र उत्तम व्यवस्थेचा अनुभव येऊ लागल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
या कार्यालयात पोहचल्यानंतर तेथील कर्मचारी साहित्याची जबाबदारी झटकतात, तर येथील दलाल मात्र पूर्ण खात्रीने साहित्य पोहचवण्याची हमी देतात. त्यामुळे रेल्वेच्या रामभरोसे कारभारापेक्षा दलाली कारभार बरा असे म्हणण्याची वेळ व्यापारी वर्गावर आली असून या दलालीमध्ये रेल्वेच्या कर्मचाऱ्यांचाही तितकाच मोठा हात असल्याचा आरोप प्रवाशांकडून केला जात आहे.  रेल्वे अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे सर्वसामान्य ग्राहकांना नाहक भरुदड पडत आहे.
‘टीप’ भरा!
अंबरनाथ येथे राहणाऱ्या सागर नरेकर आपले सामान पोहचविण्यासाठी कल्याण पार्सल कार्यालयात गेला असता तेथील दलालीचा फटका या तरुणाला सहन करावा लागला. नरेकर याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, पार्सलसाठीचे साहित्य कधी पोहचेल असे विचारल्यावर, प्रत्येक साहित्य १५ ते २० दिवसांत पोहोचेल, लवकर मिळण्याची आशा करू नका, असे उत्तर रेल्वे कर्मचाऱ्याकडून मिळाले. त्याचवेळी तेथे उपस्थित असलेला एक दलाल एकाच दिवसात सामान पोहोचवण्याची जबाबदारी घेण्यास तयार होता. कल्याण रेल्वे स्थानकाशेजारी असलेल्या पार्सल कार्यालयात नोंदणी करताना आपल्याला कार्यालयात नव्याने लावलेली टीप अर्ज भरताना लिहावी लागते. यामध्ये रेल्वे प्रशासन सामान इच्छितस्थळी पोहचविण्याची जबाबदारी झटकत असल्याचे चित्र दिसून येते.

जबाबदारी प्रवाशांची
‘मी पार्सल करत असलेल्या साहित्याची रेल्वे फलाटावर नेण्याची आणि ती रेल्वे डब्यात टाकण्याची पूर्ण जबाबदारी माझी राहील. तसेच, सामानाचे नुकसान झाल्यास आणि सामान उशिरा मिळाल्यास रेल्वे जबाबदार राहणार नाही, असे मी जाहीर करतो’ असे आपल्या स्वाक्षरीनिशी लिहून द्यावे लागते. मुळात रेल्वे प्रशासन जर साहित्याच्या संरक्षणाची जबाबदारी झटकत असेल तर त्याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक करत आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे कल्याण रेल्वे स्थानकातून हजारो टन सामान पार्सल केले जाते. या कार्यालयात रेल्वेचा एकही हमाल कार्यरत नाही. आधीचे सर्व हमाल निवृत्त झाले आहेत. त्यामुळे दलाल आणि खाजगी हमालांचे पार्सल कार्यालयावर वर्चस्व आहे. त्यामुळे या बोगस कारभारामुळे नागरिकांना मात्र नाहक भरुदड सहन करावा लागत आहे.

सामान पार्सल करण्याची संपूर्ण जबाबदारी रेल्वे कर्मचाऱ्यांची किंवा खासगी भाडेपट्टय़ाने घेणाऱ्या संस्थेची असते. त्यामुळे अशा प्रकारचा कुठलाही नवा फतवा रेल्वेने काढलेला नाही. सामान पार्सल करण्याची जबाबदारी कोणत्याही दलालांकडे सोपविण्यात आलेली नाही. अशा कार्यालयांमध्ये खासगी निविदा देण्यात आलेल्या आहेत. अशा ठेकेदार कंपनीमार्फत सामान लवकर पोहचविण्याचा दावा केला जाऊ शकतो. मात्र कार्यालयांमध्ये दलालांना प्रवेश नाही.
– नरेंद्र पाटील, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

श्रीकांत सावंत, संकेत सबनीस,  कल्याण