प्रवासी महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; ठाण्यातील चौथी घटना

ठाणे येथील कापुरबावडी भागात शुक्रवारी सायंकाळी एका रिक्षाचालकाने प्रवासी युवतीचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने बचावासाठी चालत्या रिक्षेतून उडी घेतल्याने तिच्या पायाला मुका मार लागला आहे. या घटनेप्रकरणी शनिवारी गुन्हा दाखल होताच कापुरबावडी पोलिसांनी रिक्षाचालकाचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले आहे. असे असले तरी शहरामध्ये गेल्या काही वर्षांत अशा प्रकारची ही चौथी घटना  असून या घटनांमुळे महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

ठाणे येथील भांडुप परिसरात पीडित २८ वर्षीय युवती रहात असून ती घोडबंदर येथील मानपाडा भागात काम करते. शुक्रवारी सायंकाळी कामावरून सुटल्यानंतर घरी परतण्यासाठी ती मानपाडा येथील बस थांब्यावरून शेअर रिक्षामध्ये बसली. रिक्षामध्ये तिच्याव्यतिरिक्त अन्य कोणीच प्रवासी नव्हते. असे असतानाही दोन प्रवाशांनी हात दाखवूनही चालकाने रिक्षा थांबविली नाही. तसेच रिक्षाचा वेगही त्याने वाढविला. याबाबत पीडित युवतीने त्याच्याकडे विचारणा केली असता, त्याने तिला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. या गैरवर्तनामुळे ही युवती घाबरली आणि तिने चालत्या रिक्षेतून उडी घेतली. त्यामध्ये तिच्या उजव्या पायाला मुका मार लागला. उडी मारण्यापूर्वी तिने रिक्षाचालकाच्या आसनामागे लावलेल्या ओळखपत्राचे छायाचित्र मोबाईलमध्ये काढले होते.

या घटनेनंतर पीडित युवती घरी गेली आणि तिने घडलेला सर्व प्रकार कुटुंबीयांना सांगितला. दरम्यान, शनिवारी कुटुंबीयांसह तिने कापुरबावडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदविली. या तक्रारीच्या आधारे कापुरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात पोलीस उपायुक्त सुनील लोखंडे यांच्याशी संपर्क साधला असता, या प्रकरणातील रिक्षाचालकाला ताब्यात घेतले असून त्याची सविस्तर चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

बचावासाठी रिक्षेतून उडी

रिक्षाचालकाने प्रवासी युवतीचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला असता तिने बचावासाठी चालत्या रिक्षेतून उडी घेतल्याने तिच्या पायाला मुका मार लागला आहे. ठाणे शहरामध्ये गेल्या काही वर्षांत अशा प्रकारची ही चौथी घटना  असून या घटनांमुळे महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.