राज्य शासनाच्या तलाव संवर्धन योजनेंतर्गत ठाणे शहरातील सहा तलावांचे संवर्धन आणि सुशोभीकरण करण्याच्या प्रस्तावास नुकतीच मान्यता मिळाली. पण, त्यापैकी जेल तलाव, नार तलाव आणि हरिओम तलाव या तिन्ही तलावांचे प्रस्तावामध्ये काही त्रुटी असल्याचे समोर आले आहे. यामुळे या तीन तलावांचे फेर प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना सुकाणू समितीने महापालिकेला केल्याने या तलावांचा विकास तूर्तास रखडला आहे. त्यामुळे महापालिकेवर तलावांचे दोन टप्प्यांत संवर्धन व सुशोभीकरण करण्याची नामुष्की ओढावली आहे. पहिल्या टप्प्यात कावेसर, तुर्केपाडा व मासुंदा तलावाचा विकास करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती पालिकेतील विश्वसनीय सूत्रांनी दिली.
ठाणे महापालिकेने शहरातील ३५ तलावांचे संवर्धन आणि सुशोभीकरण करण्याचे प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविले होते. यापूर्वी शहरातील काही तलावांवर अतिक्रमणे झाली असून ती बुजविण्यात आली आहेत. त्यामुळे उर्वरित तलावांच्या बचावाकरिता शहरातून अनेकदा ओरड होत असते. या प्रस्तावाच्या निमित्ताने तलावांचे शहर ही ओळख टिकविण्यासाठी ठाणे महापालिकेने उशिरा का होईना ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
राज्य शासनाने पहिल्या टप्यात सहा तलावांचा आराखडा तयार करण्याचे आदेश दिले होते. महापालिकेने शहरातील सहा तलावांचा प्रस्ताव पाठविला. त्यास शासनाने नुकतीच मान्यता दिली. त्यामुळे या तलावांचे संवर्धन आणि सुशोभीकरण होईल, अशी आशा व्यक्त होत होती. मात्र तीन तलावांच्या प्रस्तावात त्रुटी आढळल्याने त्यात सुधारणा करून ते पुन्हा पाठविण्याच्या सूचना सुकाणू समितीने महापालिकेला केल्या आहेत.

* या तलावांचे संवर्धन
कावेसर, तुर्केपाडा, मासुंदा
* यांचे संवर्धन रखडले
जेल, नार, हरिओम तलाव
* असे असेल संवर्धन..
कावेसार तलावासाठी ४ कोटी २६ लाख ७१ हजार ३०१ रुपये, तुर्केपाडासाठी १ कोटी ८१ लाख २६ हजार ९१६ रुपयांचा अणि मासुंदा तलावासाठी ५० लाख रुपये निधी खर्च केला जाणार आहे. यामध्ये तलावातील गाळ काढणे, तलावाचे संवर्धन, पाणी शुद्धीकरण करण्यासाठी वनस्पती लावणे, तलावातील पाण्याची वारंवार गुणवत्ता तपासणे, संरक्षक भिंत उभारणे आदी कामे असतील.