नारायण राणेंचा सूचक इशारा

वृत्तपत्रात एखादी चूक झाली तर माफी मागण्यासाठी सुसंस्कृतपणा असावा लागतो. व्यंगचित्रासाठी उद्धव ठाकरे माफी मागण्यास तयार नसल्याने आता ‘सामना’तला शिपाई माफी मागणार आहे का, असा सवाल उपस्थित करीत काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी बुधवारी ठाण्यात शिवसेनेवर तोफ डागली. मराठे कधीच इतिहास विसरत नाहीत. जखम भरून येते, पण व्रण तसेच राहतात, असे सांगत त्यांनी शिवसेनेला सूचक इशारा दिला. तसेच मराठा आरक्षणासाठी शिवसेनेने कधीच प्रयत्न केले नसल्याचा आरोप करीत योग्य वेळी मराठा मोर्चात सहभागी होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ठाणे शहर काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा गडकरी रंगायतनमध्ये बुधवारी आयोजित केला होता. या मेळाव्यात बोलताना नारायण राणे यांनी शिवसेना-भाजपवर कडाडून टीका केली. गुजराती भाषेतील ‘जेणे काम तेणे करो..’ या उक्तीप्रमाणे राज्याचा कारभार चालविण्याचे काम मराठय़ांचे आहे. मराठय़ांनी कधीही जातीचे राजकारण केले नाही. राज्यात ९० टक्के मुख्यमंत्री आणि मंत्री मराठा समाजाचे होते. या सर्वानी अन्य समाजांसाठी आणि त्यांच्या आरक्षणासाठी काम केले. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मागणी जोर धरू लागली, त्या वेळी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माझ्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली. आरक्षण समितीकडे भाजपचे विनोद तावडे यांनी निवेदन दिले होते, मात्र शिवसेनेने एकदाही निवेदन दिले नाही, असा आरोपही त्यांनी या वेळी केला.

  • आगामी महापालिका निवडणुकीत ठाणे, मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार बाहेर काढणार असल्याचे सांगत नारायण राणे यांनी योग्य वेळी गौप्यस्फोट करणार असल्याचे स्पष्ट केले.
  • ठाण्यातील नगरसेवक व पदाधिकारी गळती थांबविण्याचा प्रयत्न करणार नाही, पण ठाण्यात ७० ते ७५ जागा जिंकेन, असा दावा राणे यांनी केला.

 

फडणवीसांना हटविण्यासाठी  मोर्चे – राऊत

नवी दिल्ली: मराठा मोर्चामागे राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे डोके असून त्याद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हटविण्याचे षड्यंत्र रचले जात असल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बुधवारी केला. शांततेत चाललेल्या मोर्चामध्ये हिंसाचार घडविण्याचा काहीजणांचा डाव असल्याचाही दावा त्यांनी केला. मराठी हीच आमची जात असल्याचेही त्यांनी ठणकाहून सांगितले.‘‘सत्तेत असताना ज्यांना मराठा समाजाचे हित करता आले नाही, ते आता केवळ जातीय विष पेरून महाराष्ट्र जातीपातीमध्ये तोडण्याचे षड्यंत्र रचत आहेत. अशाने महाराष्ट्र अखंड राहणार नाही. म्हणूनच मराठी हीच आमची जात असल्याचे आम्ही अभिमानाने सांगतो. आता मराठय़ांचा पुळका आलेल्यांची सत्तेत असताना नरडी दाबली गेली होती का?,’’ असा सवाल राऊत यांनी केला.