बेकायदा रिक्षा थांबे, फेरीवाले, टीएमटी प्रशासनाचा नाकर्तेपणा यांचा प्रवाशांना फटका
अडवणुकीचे – लोकमान्यनगर, किसननगर, वर्तकनगर
मुख्य शहरांपासून लांब अंतरावर असलेल्या ठाण्यातील लोकमान्यनगर, किसननगर आणि वर्तकनगर परिसरातील रहिवाशांना रेल्वे स्थानक परिसरात येजा करण्यासाठी रिक्षांशिवाय पर्याय नाही. अशा परिस्थितीत फेरीवाल्यांच्या गर्दीतील रिक्षाचे थांबे, वाहतुकीचे किमान नियम न पाळणारे रिक्षाचालक आणि जागोजागी होणारी वाहतूक कोंडी यामुळे प्रवासी अगदी मेटाकुटीला आले आहेत. या भागातील प्रवाशी संख्या लक्षात घेता ठाणे परिवहन उपक्रमाला (टीएमटी) या भागात जास्त बससेवा चालवता येतील. मात्र, व्यवस्थापनाच्या नाकर्तेपणामुळे प्रवाशांची पूर्ण भिस्त रिक्षांवर आहे. मुख्य शहरापासून लांबचा पल्ला असल्याने मीटर रिक्षांऐवजी प्रवासी शेअर रिक्षाकडे वळतात.

फेरीवाल्यांच्या गर्दीतील रिक्षा स्थानक
रस्त्यावर फेरीवाल्यांची गर्दी, दाटीवाटीने उभ्या असलेल्या इमारती, चिंचोळ्या मार्गामुळे एकाच वेळी दोन वाहने जाणे शक्य नाही. या ठिकाणीच ठाण मांडून बसलेले रिक्षाचालक यामुळे किसननगर परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी होते. यात भर म्हणून रिक्षा असलेल्या जागेतच परिवहन महामंडळाच्या बस उभ्या असतात. रिक्षाचालक रांगेचे पालन करत नसल्याने मुजोरी करत हवे तेव्हा प्रवासी रिक्षात बसवून ठेवतात. परीणामी एकाच वेळी प्रत्येक रिक्षात जेमतेम एकच प्रवासी बसलेला दिसतो आणि उरलेल्या प्रवाशांची प्रतीक्षा करत असतो. किसननगर येथून तीन हात नाका परिसर, सोळा नंबर रोड या ठिकाणी पोहोचण्यासाठी त्यामुळे प्रवाशांचा दुप्पट वेळ खर्ची पडतो.

रस्ता रुंदीकरणावर अतिक्रमण
वर्तकनगर परिसरात प्रशासनाने रस्ता रुंदीकरणाच्या कामाला जोरदार प्रारंभ केला असला तरी या परिसरात चारही बाजूंना उभ्या असणाऱ्या रिक्षांनी रुंदीकरणावरच अतिक्रमण केल्याचे दिसून येते. रस्ता रुंदीकरणासाठी वर्तकनगर येथील अर्धा रस्ता खोदण्यात आला आहे. रस्ता रुंदीकरण करण्यासाठी खोदण्यात आलेल्या रस्त्याच्या बाजूलाच रिक्षाचालकांनी बेकायदा रिक्षा उभ्या केल्याने या रस्त्यावरून मार्गक्रमण करणाऱ्या प्रवाशांना अडथळा निर्माण होत आहे. वर्तकनगर मुख्य नाक्यावरून पोखरण रोड, भीमनगर, लोकमान्यनगर आणि कॅडबरी जंक्शन अशा चार ठिकाणी रस्ते आहेत. यांपैकी पोखरण रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतुकीच्या मार्गातच रिक्षा उभ्या केल्या जातात.

रांग आम्हाला कळेना.
लोकमान्यनगर परिसरात परिवहन महामंडळाच्या मुख्य बस आगाराबाहेर शेअर रिक्षाचे थांबे आहेत. बस आगाराबाहेरच्या चौकात शेअर रिक्षा उभ्या असतात. या रिक्षा रस्त्याचा जवळपास अर्धा भाग व्यापतात. येथे शेअर रिक्षांची रांगही लागत नाही. त्या कशाही कुठेही उभ्या केल्या जातात. याच ठिकाणी मुंबईहून येणाऱ्या बेस्ट बसचाही थांबा असल्याने बस आणि रिक्षांच्या गर्दीमुळे येथे मोटी वाहतूक कोंडी होते. विशेष म्हणजे, या ठिकाणी एकही वाहतूक पोलीस नसतो.