मीरा-भाईंदर महापालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव; रहिवाशांना मनस्ताप
महापालिका अधिकाऱ्यांमध्ये परस्पर समन्वय नसेल तर त्यात सामान्य नागरिक कसे भरडले जातात याचा उत्तम नमुना मीरा रोड येथील कनाकिया परिसरात पाहायला मिळत आहे. या परिसरात गेल्या चार महिन्यांपासून खोदून ठेवलेला रस्ता स्थानिकांनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर दुरुस्त करण्यात आला. मात्र अवघ्या तीन दिवसांतच तो महापालिकेच्या दुसऱ्या विभागाकडून पुन्हा खोदण्यात आला आहे. महापालिकेच्या या अंदाधुंद कारभारामुळे रहिवासी मात्र चांगलेच त्रस्त झाले आहेत.
कनाकिया येथील जांगीड एन्क्लेव्ह या गृहसंकुलातील रस्ते महापालिकेने खासगी विकासकाला टीडीआरच्या बदल्यात सिमेंट-काँक्रीटचे बनवून देण्यास परवानगी दिली आहे. रस्ते सिमेंट-काँक्रीटचे बनविण्यासाठी ते गेल्या चार महिन्यांपासून खोदून ठेवण्यात आले होते. त्यामुळे परिसरातील रहिवासी चांगलेच त्रस्त झाले होते. रस्ते खोदलेले असल्याने या ठिकाणी रिक्षा व शाळेच्या बसही यायला तयार होत नव्हत्या. अखेर रहिवाशांनी महापालिकेकडे केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे काही दिवसांपूर्वीच त्याचे सिमेंट-काँक्रीट करण्याचे काम सुरू करण्यात आले. त्याचे प्राथमिक काम पूर्ण झाल्याने रहिवाशांना हा रस्ता वापरणे सोयीचे झाले. परंतु रहिवाशांचे हे समाधान अवघे तीन दिवसच टिकू शकले. पाण्याच्या जलवाहिनीसाठी हा रस्ता पुन्हा खोदण्यात आला आहे. या ठिकाणी जलवाहिनी स्थलांतरित करण्याचे काम बाकी होते. पाणीपुरवठा विभागाने ते काम सध्या सुरू केल्याने रस्ता पुन्हा एकदा खोदून ठेवण्यात आला आहे.
या विभागाने हेच काम सिमेंट-काँक्रीट करण्याआधी केले असते तर ही वेळ आली नसती. परंतु सिमेंट-काँक्रीटचे काम आम्हाला न विचारताच सुरू करण्यात आले असल्याचा खुलासा पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी आता करत आहेत. महापालिकेच्या विविध विभागांत समन्वय नसल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. परंतु या गोंधळात रहिवासी मात्र भरडले जात आहेत. आता पावसाळा अगदी तोंडावर आला आहे. त्यामुळे कमी अवधीत जलवाहिनी स्थलांतरित करून रस्ता पुन्हा सिमेंटचा बनविण्याचे काम पूर्ण होणे कितपत शक्य आहे याबाबत रहिवाशांना शंका वाटत आहे.

 

Pimpri, Kiwale, pimpri mnc,
पिंपरी : किवळेतील दुर्घटनेनंतर पालिकेला जाग; होर्डिंगधारकांना दिला ‘हा’ इशारा
heavy traffic jam for two hours in dombivli
डोंबिवली दोन तासांपासून अभूतपूर्व वाहतूक कोंडीत; रविवारी खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना फटका
Bail
अयोग्य स्पर्श केल्याने महिलेकडून एकाची हत्या; तीन वर्षांचा कारावास भोगल्यानंतर कोर्ट म्हणतं, “स्वसंरक्षणार्थ…”
dombivli ganesh nagar marathi news
डोंबिवलीतील गणेशनगरमधील रस्ता काँक्रीटीकरणासाठी बंद, नवापाड्यात जाण्यासाठी प्रवाशांचा वळसा घेऊन प्रवास