सत्ताधारी पक्षाचा पालिका प्रशासनावर गंभीर आरोप; आयुक्तांचे चौकशीचे आदेश

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या येत्या वर्षांच्या शालेय साहित्य खरेदीत ६० लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप सत्ताधारी शिवसेनेच्या सदस्यांनी केला. बाजारात स्वस्त किमतीला मिळणारे शालेय साहित्य चढय़ा दराने खरेदी करण्यात आले आहे. खरेदी केलेल्या शालेय साहित्यामधील दप्तर, बूट, रेनकोट साहित्य अतिशय निकृष्ट दर्जाचे आहे. पावसाळा संपला तरी विद्यार्थ्यांना रेनकोट देण्यात आले नाहीत, असा आरोप शिवसेनेने केला आहे.

कल्याण-डोंबिवली पालिकेच्या ७२ शाळा आहेत. सुमारे दहा हजार विद्यार्थी या शाळांमध्ये शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांना जून महिन्यात शाळा सुरू होताच शालेय साहित्य उपलब्ध करून द्यावे, असा आग्रह धरला जातो. महापालिका प्रशासनाकडून एप्रिल, मे महिन्यातच शालेय साहित्य खरेदीचे प्रस्ताव मंजूर केले जातात. मात्र, या खरेदीत गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत. निकृष्ट दर्जाच्या वह्य़ा, रेनकोट, कंपासपेटी, बूट खरेदी करून ते विद्यार्थ्यांच्या गळ्यात मारले जात असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला. विद्यार्थ्यांना जूनमध्ये पावसापासून संरक्षण करण्यासाठी रेनकोट देणे आवश्यक असते. चार महिने उलटले तरी अद्याप अनेक विद्यार्थ्यांना रेनकोटच दिले गेले नाहीत, अशी धक्कादायक माहिती शिवसेनेचे सचिन बासरे यांनी दिली. बाजारात सामान्य किमतीला मिळणाऱ्या वस्तूवर चढे दर लावून शालेय साहित्य खरेदी करण्यात आले आहे. या चढय़ा दरातून हा गैरव्यवहार करण्यात आला आहे, असे कैलाश शिंदे यांनी सांगितले.

बाजारातील दप्तराची प्रति नग किंमत १०० रुपये आहे. शिक्षण मंडळाने ती ३२९ रुपयांपर्यंत वाढवली आहे, अशी तक्रार करण्यात आली आहे. एक वही बाजारात १७ रुपये ५० पैशाला मिळते. हा दर शिक्षण मंडळाने ३२ रुपये इतका ठरविला आहे. एक कंपास ३० रुपयाला मिळत असताना, मंडळाने ती ९९ रुपयाला खरेदी केली आहे. एक रेनकोटची किंमत बाजारात १०० रुपये असताना मंडळाने हा रेनकोट ३९५ रुपयांना खरेदी केला आहे, अशी कागदोपत्री जंत्रीच शिवसेना नगरसेवकांनी उघड केली.

मागील दोन वर्षे शालेय साहित्य खरेदीसाठी जे दर निश्चित केले होते त्या दराने साहित्याची खरेदी शिक्षण मंडळाने केली आहे. या वर्षी शालेय साहित्य खरेदीसाठी कोणतेही नवीन दर प्रशासन किंवा शिक्षण मंडळाने प्रस्तावित केले नव्हते. त्यामुळे महापालिकेने निश्चित केलेल्या दराप्रमाणे शिक्षण मंडळाने शालेय साहित्याची खरेदी केली आहे. शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना आवश्यक शालेय साहित्य वाटप केले. जुलैमध्ये रेनकोटचे वाटप पूर्ण केले आहे. शालेय साहित्य खरेदीत कोणतीही अनियमितता नाही.

– जे. जे. तडवी, प्रशासनाधिकारी, शिक्षण मंडळ, कडोंमपा.

दोषींवर कारवाई होणार

विद्यार्थ्यांना दिलेले शालेय साहित्य जमा करून शिवसेनेच्या सदस्यांनी आयुक्तांची भेट घेतली. या वेळी शिक्षण मंडळाचे साहित्य, बाजारातील शालेय वस्तूंच्या किमती आणि शिक्षण मंडळाने लावलेले चढे दर सादर केले.त्यावर तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.