गुलाबराव पाटील यांचा शिवसैनिकांना सल्ला
एखाद्या राजकीय पक्षाचा नेता वा कार्यकर्ता व्हायचे असेल तर तो स्वच्छ चारित्र्याचा असावा, त्याच्यावर कोणत्याही गुन्हय़ांची नोंद नसावी, अशी अपेक्षा असते. मात्र शिवसेनेला हे मान्य नाही. शिवसेनेत जर शाखाप्रमुख हे पद मिळवायचे असेल तर नावावर गुन्हय़ांची नोंद आवश्यक आहे. कारण शिवसेनेचे नेते आणि सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनीच शिवसैनिकांना तसा सल्ला दिला आहे.
‘‘शिवसेना कार्यकर्त्यांची पदवी म्हणजे बॅचलर ऑफ जेल. त्यामुळे ज्यांच्यावर गुन्हे दाखल नाहीत, त्यांनी शिवसेनेचे शाखाप्रमुख पद घेऊच नये,’’ असा अजब सल्ला गुलाबराव पाटील यांनी शिवसैनिकांना भाईंदर येथे दिला आहे. मीरा-भाईंदर महापालिकेच्या येऊ घातलेल्या निवडणुकीसाठी शिवसेनेचे पदाधिकारी आणि गटप्रमुख यांना मार्गदर्शन करण्यासाठी भाईंदर पश्चिम येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी मार्गदर्शन करताना गुलाबराव पाटील बोलत होते. भाजपचे नेते अफवा पसरवण्यात आणि पैशांचा वापर करण्यात पहिल्या क्रमांकावर असली तरी शिवसेना मारामारी करण्यात पहिल्या क्रमांकावर आहे. त्यामुळे भाजपला मीरा-भाईंदरमधून हद्दपार करा आणि महापालिकेवर भगवा फडकवा, असे आवाहन पाटील यांनी सेना पदाधिकाऱ्यांना केले. या मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेनेने शक्तिप्रदर्शने केल्याचे मानले जात आहे. गुलाबराव पाटील यांच्यासह, ठाण्याचे पालकंत्री एकनाथ शिंदे, उपनेत्या नीलम गोऱ्हे, उपनेते शरद पोंक्षे, प्रा. नितीन बानुगडे पाटील, वाहतूक सेनेचे अध्यक्ष हाजी अराफत शेख, खासदार राजन विचारे, आमदार प्रताप सरनाईक अशी नेत्यांची फौजच या मेळाव्यासाठी आमंत्रित करण्यात आली होती.
या वेळी सर्वच नेत्यांनी भाजपवर टीकेची झोड उठवली. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिकेच्या परिवहन सेवेच्या कंत्राटदाराकडून नुकत्याच घडलेल्या २५ लाख रुपयांच्या लाच प्रकरणावरदेखील यानिमित्ताने बोट ठेवले. जो माणूस बांधकाम व्यावसायिकांकडून फुटामागे पैसे घेतो, तो २५ लाख रुपये नाकारतो हे न पटण्यासारखे असल्याचा टोला त्यांनी हाणला. शिवसेनेला निवडणुकीची तयारी करावी लागत नाही. त्यामुळे मीरा-भाईंदर महानगरपालिकेवर शिवसेनेची एकहाती सत्ता येईल, असा विश्वास शिंदे यांनी या वेळी व्यक्त केला.