रुंदीकरणाच्या मुद्दय़ावर निवडणूक लढवण्याचा निर्णय

ठाणे महापालिकेने शहरात काही महिन्यांपूर्वी राबवलेली रस्ता रुंदीकरण मोहीम ठाणेकरांना दिलासा देणारी ठरली असली तरी ऐन निवडणुकीच्या तोंडावर शहरातील व्यापाऱ्यांनी मात्र रस्ता रुंदीकरणाच्या मुद्दय़ावरून सत्ताधारी शिवसेना आणि भाजपविरोधात शंख फुंकण्यास सुरुवात केली आहे. रस्ता रुंदीकरणासाठी दुकाने मागे हटवली, पण त्या जागांवर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले. मात्र या अतिक्रणांवर महापालिका प्रशासन कारवाई करीत नसल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. या पाश्र्वभूमीवर सोमवारी व्यापाऱ्यांनी  बैठक घेऊन यंदाची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.

गेल्यावर्षी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी स्थानक परिसरात रस्ता रुंदीकरण मोहीम राबविली. त्यामध्ये अनेक व्यापाऱ्यांच्या दुकानांची जागा रुंदीकरणामध्ये गेली. मात्र, रुंद झालेल्या रस्त्यांवर फेरीवाल्यांनी ठाण मांडण्यास सुरुवात केली आहे. या फेरीवाल्यांविरोधात तक्रारी करूनही पालिकेकडून कारवाई होत नसल्याने व्यापाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे.

शहराच्या मध्यवर्ती भागातील पाच प्रमुख रस्त्यांच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव पुढे आला होता. त्यामध्ये गोखले रोड, शिवाजी पथ, राम मारुती रोड, लाल बहादूर शास्त्री मार्ग आणि खोपट या रस्त्यांचा समावेश आहे. या प्रस्तावामध्ये दुकानांसमोरील ‘मार्जिनल स्पेस’ ताब्यात घेऊन रस्ते रुंद करण्यात येणार आहेत. मात्र, त्यास व्यापारीवर्गाचा विरोध असल्यामुळे शिवसेना-भाजपने निवडणुकीच्या तोंडावर हा प्रस्ताव स्थायी समितीमध्ये फेटाळून लावला. असे असले तरी निवडणुकीनंतर हा प्रस्ताव पुन्हा पुढे येऊ शकतो, अशी भीती व्यापाऱ्यांमध्ये आहे. या सर्वाच्या पाश्र्वभूमीवर सोमवारी झालेल्या बैठकीत व्यापाऱ्यांनी यंदाची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असून या बैठकीला तीनशेहून अधिक व्यापारी उपस्थित होते.

रस्ता रुंदीकरण मोहिमेला आमचा विरोध नसून अशा मोहिमेमुळे शहराचा विकास होत आहे. परंतु रुंदीकरणानंतर त्या ठिकाणी फेरीवाल्यांवर कोणतीच कारवाई होत नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाला सभागृहात वाचा फोडण्यासाठी व्यापारीवर्गातून निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार उभे करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. त्यासाठी कोणत्या पक्षाची तयारी असेल तर त्यासोबत व्यापारी जातील अन्यथा अपक्ष म्हणून निवडणूक लढविली जाईल, अशी माहिती व्यापारी समाज संघटनेचे मितीश सहा यांनी दिली.

सेनेला धसका

ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या नौपाडा, राममारुती रोड, शिवाजी पथ आणि स्थानक परिसरात मोठय़ा प्रमाणात दुकाने आहेत. त्यामुळे हा परिसर शहराचा व्यावसायिक केंद्र म्हणून ओळखला जातो. या भागातील व्यापारीवर्ग शिवसेनेचा परंपरागत मतदार म्हणून ओळखला जातो. गेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र व्यापारीवर्गाने भाजपच्या पारडय़ात मते टाकल्याने शिवसेनेला पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र, रस्ता रुंदीकरणाच्या मुद्दय़ावर शिवसेना व भाजपच्या नेत्यांनी व्यापाऱ्यांना पाठबळ दिले नाही.  त्यामुळे महापालिकेत व्यापाऱ्यांची बाजू मांडण्यासाठी प्रतिनिधित्व असावे म्हणून यंदाच्या निवडणुकीत व्यापारीवर्गातून उमेदवार उभे करावेत, असा आग्रह काही व्यापाऱ्यांनी धरला आहे.