नाव डॅनी असले तरी हा चित्रपटातील खलनायक नसून आमच्या घरातील श्वानहिरो आहे. माझा पुतण्या- अभिषेकच्या आग्रहास्तव माझ्या मिस्टरांनी एका काळ्या कुळकुळीत ग्रेटडेन नामक जातीच्या कुत्र्याच्या पिलाला आमच्या घरी आणले. ग्रेटडेन जातीचे कुत्रे धिप्पाड, उंच असतात. असेच वेगळेपण यांच्या पिलांमध्येही असते. इतर गावठी कुत्र्यांच्या पिल्लांपेक्षा उंच, काळा कुळकुळीत चमकता रंग तसेच पट्टा लावल्याने पावडर-तीट लावलेल्या बाळाप्रमाणे दिसणारा डॅनी घरातील सगळ्यांच्याच कुतूहलाचा विषय झाला होता.
नवोदित श्वानपिलाचे कोडकौतुक जोरात चालू होते. वापरात असणाऱ्या चादरी जुन्या मानून त्याच्या अंथरूण-पांघरुणाची अभिषेकने सोय केली. थंडी लागत असेल म्हणून स्वत:चे जुने टीशर्टही त्याला घातले. घरातल्या दुधात १ लिटरची वाढ केल्याने दूधवाल्याच्या धंद्यातही वाढ झाली. डॅनीसाठी डॉग फूड, डॉग सोप, पावडर, अशा वस्तूंनी डॅनीचे बालपण सुसज्ज झाले. काही दिवसांनी माझ्या मिस्टरांनी डॅनीसाठी एक ग्रिलचा पिंजरा तयार करून आणला. त्याची स्पेशल रूमच म्हणा ना! त्यातच रात्री आम्ही डॅनीला ठेवू लागलो, तर रात्रीच्या वेळी त्याच्या भुंकण्यामुळे आम्ही चिंताग्रस्त झालो.  मग मात्र त्याचे ‘डॅनी’ हे नाव विसरून ‘काय कुत्रा आहे, धड झोपू देत नाही.’ असे संवाद आम्हा घरातल्यांमध्ये होऊ लागले. माझे दीर म्हणजे अभिषेकचे वडील आणि अभिषेक अशा वेळी मध्येच उठून त्याला पिंजऱ्याआडून घरातील हॉलमध्ये ठेवत.
डॅनीला डास चावत असतील म्हणून डास निवारण कार्यक्रमांतर्गत कछुआ छाप अगरबत्तीची धूर काढून काढून राख जमा झाली; पण डॅनीचे रात्रीचे भुंकणे काही कमी झाले नाही. त्यानंतर आम्हाला कळले की, डॅनीला डासांची फिकीर नाही, तर आमच्या घराशिवाय करमत नाही. थोडे दिवस ठेवून बाहेरची सवय लावू म्हणून रात्री आम्ही त्याला हॉलमध्ये ठेवू लागलो. त्याची शी-सू घरात होऊ  नये म्हणून आळीपाळीने रात्री मधूनमधून उठून बाहेरून शी-शूचा कार्यक्रम उरकून आणावे लागत असे. त्यातही एखादा दिवस झोप लागली की, वर्तमानपत्र पसरायची वेळ यायचीच. आता तर ‘हाकलून द्या त्याला घराबाहेर, सोडून द्या कुठे तरी नेऊन’ असे संवाद सगळ्यांच्याच- विशेषत: त्याची देखभाल करणाऱ्याच्या तोंडी मोठय़ामोठय़ाने आणि तावातावानेच यायचे. मग डॅनीचा रात्रीचा मुक्काम हळूहळू घरातील हॉलपासून ओटीपर्यंत आणला. त्यामुळे तोच आता आपली नित्य क्रियाकर्मे स्वत:च बाहेर उरकून येतो. स्वावलंबी झाला म्हणा ना!
आमचा डॅनी मनमिळाऊ, प्रेमळ आहे; पण हट्टीही तितकाच आहे. जे पाहिजे तेच करणार. दिवसभर त्याला बांधून ठेवले तर त्याच्या ओरडण्याने कान बधिर होतील असा त्याचा आवाज. त्याला स्वत:ला बांधून घेणे आवडत नाही. त्याचे आपल्या कुळातील भटक्या कुत्र्यांशीही तितकेच जमते. त्यामुळे अन्य भटक्या कुत्र्यांचा वावरही आमच्या अंगणात सर्रास असतो. त्याचेही या भटक्या कुत्र्यांवर इतके  प्रेम की, गंमत म्हणजे आमच्या अंगणातील भटक्या कुत्र्यांना घराची राखण करण्याचे कॉन्ट्रॅक्ट त्याने दिले आहे जणू! कारण कोणी अनोळखी माणूस आला, की डॅनीचे मित्रच आधी भुंकतात. त्यानंतर डॅनीशेठ कॉन्ट्रॅक्टर बाकीचे निस्तरायला बाहेर येतात. खाण्याच्या बाबतीत म्हणाल तर ‘खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी’ असा नवाबी थाट. नाश्ता दूध-पोहे, बटर वगैरे आणि जेवणात उकडलेले चिकन असेल तरच खाणार. डॅनी अंघोळीच्या बाबतीत एकदम आळशी. अंघोळीसाठी पाइप लावला की याची धावाधाव चालू होते. डॉक्टरांकडून इंजेक्शन घेतानाही हाच प्रकार.
डॅनी घरातील माणसांवरही जिवापाड प्रेम करतो. घरातील कोणी आले, की आधी त्याच्या जवळ जाणार. आमच्यापैकी कोणी २-३ दिवस बाहेरगावी जाऊन आले, की गेटमधून आत शिरताच हा प्रेमाने अंगावर उडय़ा मारायला लागतो.
 माझी मुलगी ३ महिन्यांची होती. घरात नणंदेचे लग्न ठरलेले. एका महत्त्वाच्या कामासाठी मला तिच्या बरोबर थोडय़ा वेळासाठी बाहेर जावे लागले होते. त्या वेळेत नेमकी माझी मुलगी उठली आणि पाळण्यात खूप रडू लागली. घरातील सगळेच मी येण्याची वाट पाहतच होते; पण हा डॅनी सारखा पाळण्यात येऊन पाहायचा आणि गेटजवळ येऊन मी आले का ते पाहायचा. अशा त्याच्या खूप चकरा झाल्या. शेवटी मी गेटवर आले तेव्हा धावत जवळ येऊन जणू मला सांगू लागला, ‘‘अगं, तुझं बाळ रडतंय. कशाला गेलीस तिला टाकून?’’ त्या क्षणी आम्ही सगळेच डॅनीच्या वागण्याने भारावलो. असे बरेच भारावण्यासारखे प्रसंग डॅनीच्या वागण्यात येतात. पण हे सगळे प्रेम घरातल्या आणि ओळखीच्या माणसांसाठीच! अनोळखी माणसांशी याची कायम दुश्मनी. गेटची कडी जरी वाजली तरी गुरगुर चालू होते बसल्या जागी. कोणी येणार असले की आम्ही आधीच याला साखळीने बांधून ठेवतो; पण ‘कुत्र्यापासून सावधान’च्या पाटीवर दुर्लक्ष करून गेटची कडी न वाजवताच कोणी थेट आले की डॅनी त्याच्या दिशेने धावत गेलाच समजा. मग त्याला आवरताना नाकीनऊ  येतात.
अभिषेकसाठी तर डॅनी म्हणजे जिवलग मित्र. अभिषेक नववीत असताना डॅनीला आणला म्हणून अभिषेकची आई नाराज होती; पण डॅनीने तिच्या नाराजीवर प्रेमाने मात केली. अभिषेक शाळेतून आता कॉलेजविश्वात गेला; पण डॅनीसोबत खेळल्याशिवाय, त्याची चौकशी केल्याशिवाय अभिषेकला करमत नाही. इतका लळा आहे त्याला डॅनीचा. माझ्या मुली राधा-श्रावणी यांच्याही तोंडी डॅनीचे सतत नामघोष चालू असतात. सासूबाईंचीही दिवसभर घरच्याच सदस्याप्रमाणे डॅनीची विचारपूस चालू असते.
लहानपणी कुत्र्यावर निबंध लिहिलेला आठवतो-  कुत्रा हा पाळीव प्राणी आहे, तो घराची राखण करतो; पण आता उमगते की त्यापलीकडेही त्याला भावना, प्रेम, वेळप्रसंगी कठोरता, लळा, आपुलकी यांचीही जोड आहे.    
प्राजक्ता म्हात्रे- prajaktamhatre.77@gmail.com