आपल्या आयुष्यात विजेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. तिचा तारतम्याने व सुरक्षित वापर कसा करावा याविषयी माहिती देणारं सदर..
अनेक शतकांपासूनचा मानवी जीवनाचा आलेख हा पूर्णपणे चढत्या क्रमांकाचा आहे. मानवी जीवनाच्या या संपूर्ण उत्क्रांतीच्या कालावधीमध्ये (The Evolution of mankind)) ‘ऊर्जा’ हे केंद्रस्थानी असल्याचे आढळते. त्या काळी मानव हा नैसर्गिक अवस्थेत रहात असे. त्याचे अन्न म्हणजे कंदमुळे, वनस्पती, लहान प्राणी इत्यादी असे. हे अन्न शिजविण्यासाठी त्याला अग्निरूपी ऊर्जा लागे. ती निर्माण करण्यासाठी दगडांच्या घर्षणातून अग्नी निर्माण करून त्या ऊर्जेवर अन्न शिजवण्यात येत असे किंवा शेकोटीसाठी वापरता येई.
आदिमानव हा गुहेत रहात असे. विज्ञानाच्या मदतीने मानवाच्या प्रगतीचा आलेख जसा उंचावत गेला, तसं अन्न, वस्त्र व निवारा या त्याच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी त्याला आधुनिक विज्ञानाची कास धरावी लागली. मानवाच्या वैज्ञानिक प्रगतीच्या या भरधाव प्रवासात विजेचा शोध लागला व पाहता पाहता ‘विद्युत’ ही मानवाची चौथी मूलभूत गरज होऊन बसली.
आपल्या देशाचा विचार करता मूलत: शेतीप्रधान असलेल्या भारत देशात जसजशी हरितक्रांती होत आहे, तसतशी विजेची मागणी वाढू लागली आहे. औद्योगिक क्षेत्रातील प्रगतीसुद्धा विजेच्या उपलब्धतेवर अवलंबून आहे. स्वातंत्र्योतर काळात अगदी दुर्गम भागातसुद्धा खेडोपाडी वीज पोहोचली अन् सामान्य जनतेचे जीवनमान उंचावले. आणि सध्या विकास हेच सूत्र अंगीकारलेल्या देशात प्रगती साधून आनंददायी जीवन जगण्यासाठी प्रत्येक क्षेत्रात हायटेक विजेचा वापर अपरिहार्य बनलेला आहे.
अशा या विजेने माणसाचे पूर्ण जीवन व्यापून टाकले आहे. विजेचा दिवा असो की पंखा, वातानुकूलित यंत्र, फ्रिज वा टी.व्ही., गिझर, मिक्सर, वॉशिंग मशीन इत्यादी उपकरणे असो किंवा पिठाच्या गिरण्या, दारावरची घंटी असो की बहुमजली इमारतीमधील लिफ्ट असो, विजेवर चालणारी रेल्वे असो की शॉपिंग मॉल्समधील सरकते जिने असो, अशी सर्व उपकरणे कार्यरत ठेवण्यासाठी विजेची आवश्यकता अनिवार्य आहे.
ही अत्यावश्यक विद्युतशक्ती सर्वसामान्यांना सहज उपलब्ध व्हावी, म्हणून तिच्या निर्मितीनंतर पारेषण व वितरण यासाठी तारमार्गाची व्यवस्था केलेली असते. वीज अगदी शेवटच्या ग्राहकाला मिळेपर्यंत ही सर्व यंत्रणा राबवणारे अभियंते, कंत्राटदार व वीज कंपनी यांना बंधनकारक असलेल्या विद्युत नियमावली व कायद्याविषयी सर्वसामान्य ग्राहकांना फारशी माहिती नसते. ती माहिती या सदरातून देण्यात येईल.
आपल्या देशास स्वातंत्र्य मिळाल्यापासून वीजनिर्मिती, त्याचे पारेषण व वितरण हे त्या त्या राज्याच्या वीज मंडळाच्या अखत्यारीत होते. १० जून २००३ ला लोकसभेत नवीन वीज कायदा मंजूर करण्यात आला. परिणामी संपूर्ण देशातील ऊर्जा क्षेत्रात खासगीकरणाचे वारे वाहू लागले. ज्यामुळे वीज मंडळाचे त्रिभाजन होऊन ‘महानिर्मिती’, ‘महापारेषण’ व ‘महावितरण’ या नावाच्या कंपन्या कार्यरत झाल्या. पूर्वीच्या विद्युत मंडळातील सर्व कर्मचारी, अभियंते, कामगार इ. या तीन कंपनींमध्ये विभागले गेले. त्यानंतर दिल्ली येथील केंद्रीय विद्युत प्राधिकरणाने २०१० मध्ये ‘सी. ई. ए. रेग्युलेशन २०१०’ संपूर्ण देशासाठी जारी केल्या आहेत.
आजकाल सर्व हाऊसिंग सोसायटय़ा, कार्पोरेट ऑफिसेस, शॉपिंग मॉल्स, मल्टिप्लेक्स इ. ठिकाणी उद्वाहन आणि एस्केलेटर्सचा सर्रास वापर होताना दिसतो. याचे नियमन करण्यासाठी व सुरक्षित वापरासाठी ‘महाराष्ट्र लिफ्ट अ‍ॅक्ट १९३९ व महाराष्ट्र लिफ्ट नियम १९५८’ संपूर्ण राज्यात लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार लिफ्टपाच्या सुरक्षेची काळजी घेण्यात येते.
मल्टिप्लेक्समुळे लोक पुन्हा चित्रपटगृहात जाऊन सिनेमा पाहात असून तो ओघ वाढला आहे. तेथील प्रेक्षकांची सुरक्षा हा मुद्दा ऐरणीवर आला, त्याला कारण घडले १९८६ साली दिल्ली येथील ‘उपहार’ या सिनेमास लागलेली आग. ज्यामध्ये नियमांचा भंग केल्यामुळे कित्येक लोकांचा हकनाक बळी गेला. त्यानंतर ‘महाराष्ट्र चित्रपटगृहे (विनियमन) नियम १९६६’मधील तरतुदींची पूर्तता पूर्णत: केल्यावरच चित्रपटगृहास ना हरकत प्रमाणपत्र (N.O.C.)  देण्यात येते. या सर्व बाबींची चर्चा पुढे मी करणारच आहे.
वर उल्लेख केलेल्या सर्व कायदेशीर बाबी, नियम, अधिनियम असतानासुद्धा वीज कंपनीमधील बेजबाबदार अभियंते/ कामगार व उदासीन विद्युत निरीक्षणालय यांच्या निष्काळजीपणामुळे विद्युत अपघात व शॉर्टसर्किटमुळे आग लागण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येते. अशा अपघातजन्य परिस्थितीत ग्राहकाने काय कारवाई करावी? ग्राहकावर अन्याय झाल्यास त्याच्या परिमार्जनासाठी कायद्याप्रमाणे त्याने कोणत्या मंचासमोर जावे? अशा प्रश्नांची चर्चा माझ्या पुढील तपशीलवार लिखाणातून होणार आहे.
याशिवाय शेतातून जाणाऱ्या वीजवाहक तारा जमिनीपासूनच्या नियमानुसार अंतरावर नसल्यामुळे आग लागण्याचे प्रकार, उद्योगांमध्ये योग्य व्होल्टेज न मिळाल्यामुळे होणारे उत्पादनाचे नुकसान, वीजबिल आकारणी व त्यामुळे वीजपुरवठा तोडण्याची बेकायदेशीर कार्यवाही अशा सर्व बाबींची चर्चा या सदरात करणार आहोत.   
प्रकाश कुलकर्णी -plkul@rediffmail.com
विद्युत सल्लागार आणि सदस्य,
राष्ट्रीय सुरक्षा परिषद,

china people punished for not paying debt
जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेही कठीण; कर्ज फेडू न शकणाऱ्यांना चीन कशी शिक्षा करत आहे?
sleep fundamental right
Right to Sleep : भारतात झोप हा खरंच मूलभूत अधिकार आहे का?
Loksatta explained Is Apple ReALM better than ChatGPT
ॲपलचे ReALM चॅटजीपीटीपेक्षा सरस? येत्या जूनपासून ‘एआय’ क्षेत्रात धुमाकूळ?
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…