कामोठे गावाने आपली ‘गाव’ ही ओळख मागे टाकली आहे. अनेक विकास प्रकल्पांमुळे या गावाने ‘आजची नियोजित वसाहत’ अशी नवीन ओळख निर्माण केली आहे.

हार्बर रेल्वेमार्गावरील मानसरोवर व खांदेश्वर ही दोन स्थानके कामोठे वसाहतीला लाभल्याने मुंबईकरांनी राहण्यास आपली पसंती कामोठेला दिली आहे. दोन लाख लोकवस्तींच्या कामोठे वसाहतीमध्ये लवकरच सरकारी बससेवा सुरू होणार आहे. त्यामुळे येथील तीन आसनी रिक्षांव्यतिरिक्त अन्य पर्याय येथील प्रवाशांना उपलब्ध होणार आहेत. खांदेश्वर रेल्वे स्थानक ते दुधे कॉर्नरमार्गे ही बस वसाहतीमधील मुख्य चौकांच्या मार्गावरून शीव-पनवेल महामार्गालगत मानसरोवर रेल्वे स्थानक या पल्यावर रिंगरूट पद्धतीने धावणार आहे. या सर्व विकास कामांमुळे कालचे कामोठे गाव ते आजची नियोजित वसाहत असा नवीन चेहरा कामोठेला मिळत आहे.
जिल्हा परिषदेच्या विद्यालयांखेरीज येथे खासगी शिक्षण संस्था, यशवंतराव चव्हाण विद्यालय आणि इंग्रजी शिक्षण देणारी एमएनआर संस्थेसारखी विद्यालये आहेत. सिडकोने येथे फुटपाथ मोकळे करून ग्राहकांना मॉल संस्कृतीचा फील देण्यासाठी येथील सेक्टर २४ मधील भूखंड २ वर मिनी हॉकर्स झोन ही एक मजली इमारत खांदेश्वर रेल्वे स्थानकाजवळ उभारली आहे. याचे बांधकाम अंतिम टप्यात आहे. या झोनमध्ये ५७ गाळे व २२ कार्यालयांची सोय करण्यात आली आहे. लवकरच हा मिनीमॉल सुरू होईल. या वसाहतीची भविष्याची ओळख ही उद्यानांचे शहर असे होण्यासाठी कामोठे येथे १४ उद्यानांची कामे सुरू केली आहेत. त्यापैकी ७ उद्यानांची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. मॉर्निग वॉकसाठी पॅथ वे, अ‍ॅम्पी थिएटर व लहान मुलांची खेळणी या उद्यानात असणार आहेत. तसेच जेष्ठांच्या विरंगुळ्याची तरतूद काही ठरावीक उद्यानांमध्ये करण्यात आली आहे. अशी ही उद्याने तीन महिन्यांत लोकार्पण करण्याचा सिडकोचा मानस आहे.
सात वर्षांपूर्वी या वसाहतीमध्ये अल्प लोकवस्तीमुळे घर विकत घेतलेल्या मुंबईकरांना वसाहतीमध्ये येण्याअगोदर महामार्गावरून घरी येताना मागे-पुढे कोणी आहे का, याची विचारपूस करावी लागायची. मात्र आता प्रशस्त रस्ते, पथदिवे याचसोबत शीव- पनवेल महामार्गाहून कामोठे वसाहतीमध्ये येण्यासाठी थेट प्रवेशद्वार अशी सोय सिडकोने अलीकडच्या काळात केली आहे. वाहनचालकांची वाढती मागणी लक्षात घेऊन वसाहतीमध्ये नव्याने पेट्रोलपंपांची सोय करण्यात आली आहे. तशी निविदा पेट्रोलियम कंपन्यानी नुकतीच काढली आहे. वसाहतीमध्ये तीन ठिकाणी मुख्य चौकांमध्ये स्वच्छतागृहांची सोय करण्यात आली आहे. खांदेश्वर रेल्वे स्थानकासमोर प्रस्तावित एसटी डेपो, पदवी महाविद्यालय व प्रशस्त मॉलच्या जागेसाठी भूखंड आरक्षित ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे भविष्यात कामोठे हे महत्त्वाचे शहर होणार आहे. मेट्रो प्रकल्पामुळे खांदेश्वर ते कळंबोली परिसरातील नागरिक २१ व्या शतकाची खरी हवाईसफर येथे अनुभवणार आहेत. सिडकोने मेट्रो प्रकल्पाच्या अंतिम टप्यात खांदेश्वर ते कळंबोली, कळंबोली ते पडघे या पल्ल्यावर प्रस्तावित मेट्रो मार्गाच्या कामाला सुरुवात करण्याचा विचार केला आहे. विमानतळाशेजारील वसाहत अशी कामोठे वसाहतीची ओळख असल्याने येथील लोकवस्तीचा विचार करून सिडकोने येथे पुरेपूर विजेचे स्वतंत्र उपकेंद्र उभारले आहे. तसेच या वसाहतीच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करून येथील मलनिस्सारण केंद्र हे पुढील २० वर्षांची वाढ लक्षात घेऊन त्या क्षमतेचे केंद्र येथे सिडकोने उभारले आहे. येथे पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटीया हे स्वत: पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे सात वर्षांपूर्वी ५०० रुपयांनी चौरस फुटांचे घर आजच्या घडीला सहा हजार रुपयांनी विकले जात आहे.

खांदेश्वर रेल्वे स्थानकासमोर प्रस्तावित एसटी डेपो, पदवी महाविद्यालय व प्रशस्त मॉलच्या जागेसाठी भूखंड आरक्षित ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे भविष्यात कामोठे हे महत्त्वाचे शहर होणार आहे.